औरंगाबाद दि २९ (जिमाका)- मराठवाडा आणि खानदेशला जोडणारा आणि मराठवाड्याच्या विकासाला गती देणारा औरंगाबाद –सिल्लोड- अजिंठा- जळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण एका वर्षात पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
औरंगाबाद –सिल्लोड-जळगाव राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ७५३ एफ)या सिमेंट रस्त्याच्या कामाचा कोनशीला अनावरण समारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. या समारंभला विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री मदन येरावार, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आदि मान्यवर उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीला शहीद जवान संदीप जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले कि, राज्याचा विकास व्हावा हि सर्व जनतेची अपेक्षा आहे. हे लक्षात ठेवून मी राज्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी कायम प्रयत्नशील असतो. राज्यातील रस्ते विकासासाठी ३ लाख कोटी रुपयापेक्षा जास्तीची कामे करणार आहे. मराठवाड्यातील महामार्गासाठी आत्तापर्यंत ६५ हजार कोटी रुपये दिले असून अजून १० हजार कोटी रुपये देणार आहे. या रस्त्यामुळे मराठवाड्याचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा विकास होणार आहे. जनतेची सेवा माझ्या हातून होणार आहे हे माझे भाग्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
औरंगाबाद –सिल्लोड-जळगाव राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ७५३ एफ) विषयी बोलताना ते म्हणाले कि हा रस्ता पूर्णपणे सिमेंटचा असणार आहे. अत्यंत उत्कृष्ट अशा रस्त्यावर किमान २०० वर्ष एकही खड्डा पडणार नाही याची मी ग्वाही देतो. या रस्त्यावर ‘ब्रीज कम बंधारा’ बांधून पाणी आडविण्यात येणार असल्याने शेतकर्यांना शेतीसाठी आणि गावकर्यांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार आहे. अशा या महामार्गासाठी जनतेने देखील सहकार्य करण्याचे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनानी केलेल्या कामाविषयी बोलताना गडकरी म्हणाले कि, राज्य शासन अनेक लोक कल्याणकरी योजना यशस्वीपणे राबवीत आहे. जलयुक्त शिवार ही अत्यंत लोकोपयोगी योजना असून या योजनेचे आता दृश्य परिणाम दिसत आहेत. राज्यातील ५ लाख शेतकर्यांना वीज पंप देण्यात आले असल्याचेही यावेळी गडकरी यांनी सांगितले.
मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात येणार्या उपाय योजनेविषयी बोलताना गडकरी म्हणाले कि, मी नागपूर मध्ये नुकत्याच ५५ बसेस बायो इथेनॉलवर चालविणे सुरु केल्या आहेत. त्याच धर्तीवर औरंगाबाद –पुणे-मुंबई या मार्गावर डबल डेकर इलेक्ट्रीकल बसेस सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यावेळी म्हणाल्या कि या महामार्गामुळे मराठवाडा आणि खानदेश जोडला जाणार तर आहे शिवाय ऐतिहासिक अशा अजिंठा लेणीकडे येणाऱ्या पर्यटकाचा देखील ओघ वाढणार आहे. पर्यायाने रोजगराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने हा महामार्ग विकासात भर घालणारा ठरणार आहे.
यावेळी विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार अब्दुल सत्तार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.