in ,

१४ दिवस क्वारंटाइनचे ..

कोरोनाच्या थैमानाने सगळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पोलीस दलाला संचारबंदीसह सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याचे मोठे आवाहन लॉक डाऊन काळात आहे. अवैध धंदा करणाऱ्या एकाला अटक करून पोलीस ठाण्यात आणले असता, तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने पोलीस ठाण्यात खळबळ उडाली; अशीच एक घटना नुकती शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यामुळे बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट कराव्या लागल्या. सुदैवाने सर्वांच्याच टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले. परंतु त्यांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला. १४ दिवस क्वारंटाइनचे कसे निघाले याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेली आपबीती.

संचार बंदीमुळे हद्दीत पेट्रोलिंग सुरु असताना खबऱ्या मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम नशेच्या गोळ्यांची विक्री करत आहे. याबाबत माहिती वरिष्ठांना देऊन पथक त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले. ठरल्याप्रमाणे सापळा रचण्यात आला त्याला त्याच्या एका साथीदारासोबत अटक देखील करण्यात आली. काही दिवस पोलीस कोठडीत असल्यामुळे त्यांच्याशी निकटचा संपर्क आलाच होता. तुरुंगात ठेवण्याआधी मेडिकल टेस्ट करावी लागते म्हणून त्याला मेडिकलसाठी पाठवण्यात आले. सध्याचे वातावरण पाहता आरोपीची कोरोना टेस्ट देखील करण्यात आली. अटक केल्या पासूनच सुरक्षितता बाळगण्यात आली. त्यानंतर एका आरोपीचा अहवाल पोसिटिव्ह आल्याने मनात एकच धास्ती उडाली. कि, आता घरी कसा जाऊ, घरच्यांना काय आणि कसे सांगू इतर वेळी वेगळ्या घडलेल्या घटना या सर्वांची वाच्यता घरच्यांशी करताना कधीच दडपण नाही आले. परंतु हि बाब कशी सांगावी या साठी हिम्मत होत नव्हती. नुकताच मुलाचा वाढदिवस झाल्याने घरातले वातावरण लॉकडाऊनच्या ताणातून थोडे प्रफुल्लीत झाले होते. त्यातच हे सर्व घडल्याने थोड्यावेळ मन सुन्न झाले. त्यातच निरोप आला कि उद्या खबरदारी म्हणून कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे थोडा वेळ गांगरून गेल्यासारखे झाले. हिम्मत करत घरी पोहचून नित्याप्रमाणे वर्दी गरम पाण्यात घराबाहेर भिजवली, बुटासह संपूर्ण शरीर सायनेटायझरने निर्जंतुक केले. अंघोळ करून बाहेर पडल्यावर अचानक मुले समोर आली, त्यांच्या जवळ जायची हिंमत होत नव्हती; घरच्यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. पोलीस असल्यामुळे या गोष्टीला तोंड द्यावे लागेल असे सांगून घरच्यांनी वेगळी सकारात्मक हिंमत दिली. दुसऱ्या दिवशी उठून आवरून टेस्ट करण्यासाठी जावे लागले. टेस्ट झाली, अहवाल देखील निगेटिव्ह आला, मनातली एक मोठी धास्तीच निघून गेली परंतु डॉक्टरांनी १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला.

दवाखान्यातूनच घरी होम क्वारंटाइन म्हणजे काय करावयाच्या सुचना देण्यात आल्या, त्याची संपूर्ण माहिती घरी कळवली. घरच्यांनी बाहेरील खोली अलगीकरणासाठी तयार केली. घरातच कुटुंबासोबत राहून कुटुंबा जवळ राहता येत नाही. या प्रकारच्या यातनांनी सुरुवातीचे दोन – तीन दिवस मन सुन्न होऊन विचित्र विचारांनी रात्रीची झोप जड झाली. खोलीच्या दारातच जेवणाचे ताट, पिण्याचे पाणी जेवण झाल्यावर ताट स्वतः स्वच्छ धुणे त्यानंतर घरच्यांकडून त्याच्यावर सॅनिटायझरने निर्जंतुक करून घेणे हा रोजच्या दिनचर्येचा भाग झाला. सोशल मिडिया वरून रोज घडणाऱ्या घटनांचा आढावा घेत दिवस कसा बसा जाऊ लागला. पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे रोज वेगवेगळ्या माणसात वावरण्याची सवय, परंतु अचानक अलगीकरणात रहाव लागल्याने दिवसा कोणी बोलायला नसल्याने मन कावरे बावरे होऊ लागले. पोलीस ठाण्यातील सहकारी सोशल मिडया वर चर्चा करू लागलो. विविध कारवाया, शहराच्या शांततेसाठी तसेच पोलीस ठाण्यातील विविध कामासाठी सोशल मिडीयाच्या ग्रुपचा वापर करावा लागायचा तोच बहुतांश सहकारी अलगीकरणात असल्यामुळे त्या ग्रुपवर चर्चेचे विषय बदलून, जेवण झाले का ? घरच्यांपासून दूर आहेत ना ? काळजी घेण्याचे सल्ले, थोडीफार कार्माच्यार्यांची मस्करी यात दिवस निघून जाऊ लागले. कॉलेजच्या वयापासून वाचनाची आवड होती परंतु कर्तव्यामुळे वाचनाच्या आवडीला पूर्ण विराम लागला होता. या काळात चार वर्षापूर्वी अपूर्ण राहिलेल्या एका कादंबरीसह तीन कादंबरी १४ दिवसात वाचून काढल्या. क्वारंटाइन म्हणजे नेमके काय याची पूर्ण माहिती गावाकडील आप्तेष्टांना नव्हती, अनेकांनी घाबरून कॉल केले. १० वर्ष जुने मित्र ज्यांचा अक्षरशः संपर्क तुटला होता, त्याचे कॉल आल्याने मनाला वेगळे समाधान मिळाले. १४ दिवस झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन कर्तव्यावर हजर होतांना एखाद्या पक्षाला पिंजऱ्यातून मुक्त केल्यावर तो जशी गगन भरारी घेतो, तशीच प्रचीती १४ दिवसांनंतर वर्दी घातल्यावर झाली. सध्याचा काळ फार नाजूक आहे, नागरिकांनी स्वतःची, कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. १४ दिवस क्वारंटाइनचे हा अनुभव आज देखील अंगावर काटा आणतो. घरातील स्वच्छता, सोशल डीस्टनसिंग या महत्वाच्या बाबीचा अवलंब करण्याची गरज सध्या आहे.

What do you think?

Written by Amit Pujari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

जिल्ह्यात एकूण 823 कोरोनाबाधित, आज 74 रुग्णांची वाढ

आज दिवसभरात 93 रुग्णांची वाढ; औरंगाबादमध्ये आतापर्यंत एकूण 842 कोरोनाबाधित