उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज सकाळी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील सिपेट (केंद्रीय प्लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था) इमारतीस भेट देऊन पाहणी केली.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने भविष्यातील आरोग्य सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीची संभाव्यता लक्षात घेऊन, खबरदारीचा उपाय म्हणून या भागात कोविड रुग्णालय उभारले जाणार आहे म्हणून या इमारतीची पाहणी आज श्री. देसाई यांनी केली. १०००० चौरसमीटर क्षेत्रफळात असलेल्या या इमारतीत 250 बेड्सचे रुग्णालय उभारले जाणार आहे. या इमारतीत असलेल्या सोयी सुविधांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी श्री.देसाई यांना दिली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, मनपाच्या जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदींची उपस्थिती होती.