नमस्कार, मी कचरा बोलतोय..
जगाच्या पाठीवर असे कोणतेच शहर अथवा गाव नाही जिथे माझे अस्तित्व नाही. प्रत्येक ठिकाणी माझे स्वरूप वेगळे आहे. घरातील कचरा, औद्योगिक कचरा, भाजीमंडईतील कचरा, व्यापारी पेठातील कचरा, हॉटेलमध्ये मधील कचरा आदी प्रत्येक ठिकाणी माझे स्वरूप वेगवेगळे आहे. पण कचरा होत नाही, असे एकही ठिकाण या पृथ्वीतलावर क्वचित पाहायला मिळेल. इतकेच काय बऱ्याचवेळा लोकांनाही एकमेकांचा ‘कचरा’ करतांना मी पाहिलंय.
मला बोलण्याचे निमित्त म्हणजे औरंगाबादमधील कचराडेपोचा प्रश्न. या प्रश्नाची चर्चा अर्थात माझीच चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. इतके महत्व मला यापूर्वी कधीही आले नव्हते. कारण, मागील चाळीस वर्षापासून मी निरंतरपणे नारेगावच्या ‘कचराडेपो’त न चुकता जातो. कधी-कधी महापालिकेचे कर्मचारी सुटीवर अथवा सुट्या हे अपवाद वगळता. माझा हा प्रवास सुरु होतो घरातून दारात, दारातून कचराकुंडीत अथवा नव्याने कचरा वाहून नेणाऱ्या रिक्षात, रिक्षातून शहरातल्या कचरा डेपोत, तेथून थेट मोठमोठ्या ट्रकमधून मला नारेगावला नेले जाते. तिथून पुढचा प्रवास विघटन अथवा पुनर्वापर करण्याकडे होतो. घरातील कागदाचे चिटोरे, पेपरचे तुकडे, भाजीपाल्याचा कचरा, शिळे अन्न, दुकानातील रिकामे खोके, कापडाच्या चिंध्या आणि अडगळीत पडलेले प्रत्येक साहित्य माझ्याच कुटुंबाचे भाग असतात. याचे विघटन केल्यानंतर मी खताच्या स्वरुपात शेतात जाऊन पडतो. तिथे खताच्या रूपाने शेतात मोठ्या अभिमानाने पिकांच्या भोवती गराडा घालतो. तेव्हा शेतातील धान्याच्या मुळाशी जाऊन दर्जेदार पिक उभ राहण्यास मदत करतो. एका अर्थाने पिकाच्या रूपाने माझा पुनर्जन्म होतो.
पण…
होय, मागील काही वर्षात माझ्या कुटुंबात माझ्या बिरादरीत समावेश झाला तो प्लास्टिक नामक भस्मासुराचा. या भस्मासुराने सगळीकडे स्वत:चे साम्राज्य निर्माण केले. इतके कि निम्माहून अधिक वाटा या प्लास्टिकने काबीज केलाय. त्याचा परिणाम म्हणजे प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने हा वर्षानुवर्षे तसाच पृथ्वीवर पडून राहतो… आता त्याने पृथ्वीच्या पोटात शिरायला सुरुवात केलीय. वाहते नदीनाले या प्लास्टिकने अडवून ठेवले. इतकंच काय मुक्या प्राणांच्या पोटात शिरून त्याने कित्येक जीवही घेतले. पण *‘माणूस’* नावाच्या प्राण्याने काहीही शिकवण घेतली नाही. गडकिल्ले, नदीनाले, समुद्र, टेकड्या, पर्वत, पठार आणि जंगल सगळकाही या जीवघेण्या प्लास्टिकने व्यापून घेतले. त्यामुळे कधीकाळी शेतकऱ्यांसाठी वरदान असलेला कचरा आता विषासमान झालाय. त्याच सर्वात मोठ दुख: होतंय. पण तुम्हा माणसांना हे दुख: कधी कळणार? बेफामपणे प्लास्टिकचा वापर सुरु केलाय. इतका कि त्यासाठी *‘नो प्लास्टिक’* असे अभियान राबविण्याची वेळ आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरण्यावर प्रतिबंध लावलेले आहेत. मात्र हे प्रतिबंध ना शासनाकडून पाळले जातात, ना लोकाकडून. सर्रासपणे फळे-भाज्या कॅरीबॅगमध्ये दिल्या जातात. त्याचे दुष्परिणाम माणसावरही होतातच ना. पण.. जोपर्यंत स्वत:ला त्याचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष फटका बसत नाही तोपर्यंत सुधारला तर तो मनुष्य कसला? असो.. बोलण्यासारखे बरेच काही आहे. तूर्तास इतकेच पुरे!
जाताजाता :औरंगाबादमध्ये मागील पंधरा दिवसापासून गेली चार दशके मी राहत असलेल्या ठिकाणी मला तेथील नागरिकांनी मज्जाव केलाय. तो त्यांच्या दृष्टीने योग्यही आहे. चार दशकापूर्वी तिथे मानव वस्ती नव्हती. त्यामुळे माझा कोणालाही त्रास झाला नाही. मात्र, आता तेथील लोकांचे आरोग्य माझ्यामुळे धोक्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून माझ्यासाठी नव्या घराचा शोध सुरु आहे. नव्या घरासाठी नेतेमंडळी राजकीय पोळी भाजून घेताहेत. त्यामुळे यादरम्यान शहरातच माझे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे १५ लाख लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. हे मलाही अपेक्षित नाही. त्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा. तोपर्यंत नागरिकांनी कमीतकमी कचरा करून स्वत:चे आणि इतरांचे आरोग्य सांभाळावे. या सर्व प्रकारावरून औरंगाबादकरांनी वेळीच धडे घ्यावे. तसेच कमीत कमी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करून तुमची-आमची सर्वांची वसुंधरा सांभाळ, ही विनंती.
तुमचाच,
कचरा.(राहणार : गेली चार दशके नारेगाव, नव्या घराचा शोध सुरु)
हल्ली मुक्काम : औरंगाबादमधील रस्ते, कचराकुंडी, चौक, मोकळ्या जागा, दुभाजक आदी
अभिजित हिरप
९४०४४८८९१२, ७७२००४४९१२
hirapabhijeet@gmail.com
GIPHY App Key not set. Please check settings