6 व्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे 9 ते 13 जानेवारी दरम्यान आयोजन

महोत्सवात भारतीय सिनेमा स्पर्धा विभागाचा समावेश, जगभरातील 40 फिल्म्सचे होणार प्रदर्शन

0
413

जगभरातील व देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. 9 ते रविवार, दि. 13 जानेवारी 2019 या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.

नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई – विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून, प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे व स्विडीश राजदूतावास यांचा विशेष सहभाग यंदाच्या महोत्सवात असणार आहे.

उद्घाटन सोहळा :
फिल्म फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा बुधवारी, दि. 9 जानेवारी 2019 रोजी सायंकाळी सहा वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार असून या प्रसंगी विविध मान्यवर कलावंतांची उपस्थिती असणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत नामांकन असलेली कोल्ड वार ही पोलंड भाषेतील जगभर गाजत असलेली फिल्म ओपनींग फिल्म म्हणून दाखविण्यात येईल.

औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजनामागील उद्देश :
सध्याच्या काळातील व इतिहासातील जगातील व भारतातील सर्वोत्त्कृष्ट चित्रपट औरंगाबादच्या रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्‍या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व औरंगाबादचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतीक पातळीवर पोहोचावे, औरंगाबाद शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यपटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.

भारतीय सिनेमा स्पर्धा :
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच आंतरराष्ट्रीय ज्युरी प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला एक लाख रुपये रोख रकमेचे गोल्डन कैलासा पारितोषीक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषीकांचा देखील समावेश असणार आहे. ज्युरी समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व तज्ज्ञ एन चंद्रा हे असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून मारियान बोर्गा या फ्रेंच अभिनेत्री, फैजल खान (आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक,दिल्ली), चित्रपट अभ्यासक शिराज सय्यद (मुंबई), मार्क लिंडले (इंग्लंड) हे मान्यवर असणार आहेत.

मास्टर क्लास व विशेष परिसंवाद :
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनाबरोबरच विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये शनिवार, दि. 12 जानेवारी रोजी ‘मोबाईल फोनने निर्माण केलेले फिल्ममेकर’ या विषयावर मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद संपन्न होणार आहे. तसेच तरूण पिढीतल्या चित्रकर्मीसाठी ‘शॉर्ट फिल्म कशी बनवावी’ या विषयावर प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी मास्टर क्लास घेणार आहेत.

मराठवाडास्तरीय लघुपट निर्मिती स्पर्धा :
यंदाच्या महोत्सवात प्रथमच मराठवाड्यातील लघुपट निर्मीती करणार्‍या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील अंतिम स्पर्धेसाठी निवडलेल्या शॉर्ट फिल्म ज्युरी कमिटीने निवडलेल्या नऊ शॉर्टफिल्म महोत्सवा दरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला रु. 25,000 रकमेचे रोख पारितोषीक व सिल्व्हर कैलासा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

विशेष सादरीकरण :
महात्मा गांधीच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त महात्मा आणि सिनेमा या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक प्रा. अमृत गांगर यांचा दृक श्राव्य स्वरूपातील सादरीकरण होणार आहे. याशिवाय स्विडनचे जगप्रसिद्द दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांच्या पाच अभिजात कलावंत दाखविण्यात येणार आहे. याप्रसंगी भारतातील स्विडन राजदुतावासाच्या कौन्सील जनरल पुलरिका सनबर्ग यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

कलाकारांची उपस्थिती व संवाद :
स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या खेळानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. या महोत्सवादरम्यान चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, शशांक केतकर, कल्याणी मुळे, प्रिया बापट, दिग्दर्शक प्रतिमा जोशी, लेखक संजय कुष्णाजी पाटील आदी चित्रपट सृष्टीतील नामवंत मंडळी उपस्थित राहणार आहेत.

विशेष पोस्टर प्रदर्शन :
महोत्सवादरम्यान ग. दी. माडगुळकर, पु. ल. देशपांडे, सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष पोस्टर प्रदर्शन प्रोझोन मॉलमध्ये पुण्याच्या नॅशनल फिल्म आर्काईव्ह ऑफ इंडियातर्फे मांडण्यात येणार आहे.

चित्रपट रसग्रहन कार्यशाळा :
फिल्म फेस्टिव्हलमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा याकरिता औरंगाबाद शहरात वीस महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन प्रसिद्ध चित्रपट समिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे.

समारोप सोहळा व जीवन गौरव पुरस्कार :
फेस्टिव्हलचा समारोप सोहळा रविवार, दि. 13 जानेवारी 2019 रोजी सायं. सात वाजता संपन्न होणार असून याच सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण ज्युरी समितीचे अध्यक्ष व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एन. चंद्रा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून त्याची घोषणा पुढील आठवड्यात एका विशेष पत्रकार परिषदेत करण्यात येईल. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सहाव्या आंतरराष्ट्रीय समारोपची फिल्म म्हणून ऑस्करच्या स्पर्धेत यंदा नामांकन झालेली जपानची शॉप लिफ्टर्र ही फिल्म दाखविण्यात येईल.

प्रतिनिधी नोंदणी :


फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरवात करण्यात आलेली असून जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे औरंगाबादच्या रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकांकरीता केवळ चारशे रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ दोनशे रुपयांत या फेस्टिव्हलचा आनंद घेता येणार आहे. सहा जानेवारी पासून प्रतिनिधी नोंदणी सुरवात होणार असून 1) आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल 2)नाथ सीड्स,पैठण रोड 3)एमजीएम फिम्स आर्टस् डिपार्टमेंट, एमजीएम परिसर 4) निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड 5) विशाल ऑप्टिकल्स, पवन गॅस एजन्सी समोर, उस्मानपुरा 6) हॉटेल स्वाद, उस्मानपुरा 7) हॉटेल नैवेद्य, सिडको बसस्टॅण्ड 8) साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा 9) जिजाऊ मेडिकल, टि.व्ही. सेंटर या केंद्रांवरती चित्रपट रसिकांना प्रतिनिधी नोंदणी करता येईल.

संयोजन समिती :
औरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्‍या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम,महोत्सवाचे संचालक अशोक राणे, सचिन मुळे,सतीश कागलीवाल,प्रोझोन मॉलचे व्यवस्थापक मोहम्मद अर्शद, उद्योजक उल्हास गवळी,आकाश कागलीवाल,बिजली देशमुख आदींनी केले आहे.

Previous articleDr Babasaheb Ambedkar Marathwada University signs pact with two Chinese institutes
Next articleजलसंपदा विभागाने औरंगाबादचा पाणी उपसा थांबविला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here