आस्था फाउंडेशन औरंगाबाद – आनंददायी वृद्धापकाळाच्या दिशेने एक वाटचाल
नवव्या वर्धापन दिनानिमित्त.
आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती, वैद्यक शास्रातील शोध याद्वारे मनुष्य जन्मदर तसेच मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे. परिणामी आयुर्मान वाढते आहे. एकूण लोकसंख्येत वृध्दांच्या प्रमाणात वाढ व त्यांचा सांभाळ करणाऱ्या तरुणांच्या प्रमाणात घट असे व्यस्त चित्र दिसते आहे. भारतातील कुटुंबसंस्थेची वीण पण सैल होत चालली आहे.
आजच्या तरुण पिढीवरील मानसिक ताण तणाव, नोकरी व्यवसायातील अस्थिरता, बदल्या, परदेशी वास्तव्य, महागाई, अर्थिक नियोजनासाठीची ओढाताण, त्यांची स्वप्ने, ध्येय, करिअर, संसार शिवाय स्त्रीचे अर्थार्जनासाठी घराबाहेर जाणे, त्यामुळे निर्माण झालेले कौटुंबिक प्रश्न, हे सगळं लक्षात घेतलं तर इच्छा असूनही तरुणांना घरातील वृध्दांसाठी वेळ देणे शक्य होत नाही. वृध्दांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. अपुरा पोषक आहार, तब्येतीची हेळसांड, परावलंबित्व, एकटेपणा, त्यांचा कुटुंबातील मान, त्यांना घरात मिळणारी वागणूक असे अनेक प्रश्न आहेत.
ह्या सगळ्या सामाजिक बदलाची जाणीव आठ वर्षापूर्वी कांही सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांना झाली. वृध्द लोकांची काळजी घेणारी यंत्रणा उभी करणे हा ह्या पुढील काळात भेडसावणारा प्रश्न त्यांच्या ध्यानी आला. मग त्यावर विचार सुरु झाला. ह्या विचारमंथनातून “आनंददायी वृध्दापकाळ” (Joyful Old Age) ही संकल्पना घेऊन ‘आस्था फाउंडेशन औरंगाबाद’ ह्या संस्थेची स्थापना झाली. ही समाजसेवी सेवाभावी संस्था सोसायटी व ट्रस्ट अॅक्ट अंतर्गत रीतसर रजिस्टर झाली. संस्थेच्या सर्व सभासदांनी/ कार्यकर्त्यांनी समाजातील वृध्दांचे उर्वरित आयुष्य आनंदात कसे जाईल व आनंददायी वृध्दापकाळ ही संकल्पना कशी राबवता येईल ह्या दिशेने पाऊले पुढे टाकण्यास सुरवात केली. सामाजिक बदल खूप वेगाने होत आहेत, जीवन मूल्येही त्याप्रमाणे बदलत आहेत. एक एकटे राहणारे वृध्द, घरी जागेचा प्रश्न असणारे किंवा घरच्यांशी जमवून घेणे शक्य नसणारे वृध्द अशांसाठी सहजीवनाची कल्पना पुढे आली.
आस्थाचेच एक विश्वस्त श्री सुनील अग्रवाल यांनी त्यांच्या आई वडिलांच्या स्मृति प्रीत्यर्थ आस्थास तीन एकर जागा दान केली. ह्याच जागेवर ‘बसंत प्रभा विसावा’ हा भव्य प्रकल्प उभारायचे आस्थाचे स्वप्न आहे. औरंगाबाद पासून १८ किलोमीटरवर, शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या समोर, जालना रोड पासून ३ किलोमीटर आत, जडगाव येथे आस्थाचे हे स्वप्न साकार होऊ घातले आहे. १०० वृद्धांसाठी निवासाची व्यवस्था येथे होणार आहे. आस्थाच्या नियोजित इमारतीचा नकाशा प्रसिध्द वास्तुशिल्पी श्री अजय कुलकर्णी ह्यांनी केला आहे. तो टाऊन प्लॅनिंग ऑफिस कडून मंजूर झाला आहे. प्रत्यक्ष जागेवर वीज कनेक्शन आहे, वाचमॅन ची रूम बांधून तयार आहे. संपूर्ण प्लॉटला तारेचे फेन्सिंग केले आहे. विहीर बांधली आहे. तिला पाणी पण भरपूर लागले आहे. बरीचशी झाडे लावली आहेत. येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सहजीवनाच्या उद्दिष्टाने एक भव्य वास्तू उभारायची आहे. तिथे ज्येष्ठांना आरोग्य सेवा, शारीरिक मानसिक आधार, उत्तम आहार विहाराची व्यवस्था. समवयस्कांची साथ, आपले छंद जोपासण्याची संधी, वाचनालय, ध्यान धारणा कक्ष, समुपदेशन, भोजन कक्ष, बाग बगीचा अशा सर्व सोई तर असणार आहेतच पण वृद्धांच्या सेवेसाठी प्रशिक्षित कर्मचारी असणार आहेत. असे कर्मचारी असणारी ही पहिलीच व्यवस्था असणार आहे.
आज एका दोन मजली भाडे तत्वावर घेतलेल्या बंगल्यात शिवाजी नगर येथे आस्था घर सुरु आहे. बारा वृद्धांची राहण्याची सोय येथे आहे. आज सात वृध्द इथे आनंदाने रहात आहेत. त्यात दोन स्त्रिया आहेत. सुंदर हवेशीर खोल्या. खाण्यापिण्याची योग्य सोय, टी व्ही , वर्तमानपत्र, वाचनालय, कॅरम अशा विविध सोयी. दर शुक्रवारी येथे स्मृति संजीवनी कार्यक्रम घेतला जातो. त्यात वृध्द व्यक्तींसाठी वेग वेगळे मेमरी गेम्स घेतले जातात. स्मृति चाचण्या, आहार, योगासने, मानसिक ताणतणाव वगैरे संबंधी तज्ञांची व्याख्याने ठेवली जातात. दर शुक्रवारी डॉक्टरही येत असल्याने वृद्धांना त्यांच्या वैद्यकीय समस्यांविषयी डॉक्टरांशी चर्चा करता येते.
बऱ्याच वृध्दांना घरी सोबत पाहिजे असते. कारणे अनेक असतात. कधी ते एकटे असतात म्हणून, कधी दोघांपैकी एक आजारी असतो म्हणून, दवाखान्यात थांबायला वेळ नसतो म्हणून वगैर वगैरे. आस्थाने, वृद्धांची सेवा कशी करावी ह्याचा एक कोर्स टाटा सामाजिक संस्थेच्या सहकार्याने औरंगाबादला सुरु केला. ह्या कोर्सच्या रोजच्या नियोजनासाठी औरंगाबादच्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ ह्या संस्थेचे सहकार्य लाभले. डॉ. हेडगेवार हॉस्पिटल येथे वार्ध्यक्य सेवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु आहे. चार बॅचेस होऊन आज पाचवी बॅच जानेवारी २०१८ मधे संपते आहे. १० वी पास व १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना ह्या कोर्स मधे प्रवेश दिला जातो. हा चार महिन्याच्या कोर्स मोफत आहे. ४५ मुले/मुली कोर्स करून बाहेर पडल्या आहेत. त्यातील बरेच जण वृध्दांच्या सेवेत आहेत. आज ५०च्या वर वृध्दांना याचा लाभ झाला आहे. मुलांनाही अर्थार्जनाचे एक नवे दालन उघडले गेले आहे. ह्या प्रकारे वृद्धांची काळजी घेणारी एक प्रशिक्षित यंत्रणाच तयार होते आहे.
आस्था वृध्दांसाठी इतरही विविध उपक्रम घेते. वृध्दांनी सध्याच्या परिस्थितीत येणाऱ्या ताण तणावाला कसे सामोरे जावे, वॉक विथ आस्था, वाढत्या वयामुळे होणाऱ्या अल्झायमर/डिमेंशिया सारख्या आजाराचे नियोजन कसे करावे, डिमेंशिया या आजारा विषयी जन जागृती, डिमेंशिया झालेल्या व्यक्तीला सांभाळणाऱ्यांसाठी कार्यशाळा, मोफत नेत्र तपासणी शिबीर, हाडाच्या ठिसुळते संबधी मोफत शिबिर, आस्थाने इतर सामाजिक संस्थांची माहिती औरंगाबादकरांना व्हावी यासाठी एक प्रदर्शन भरवले होते, वृद्धांसाठी कॉम्पुटरची ओळख, आनंददायी वृद्धापकाळ, न्युमोनिया मुक्त वृद्धत्व. समाजातील दुर्लक्षित विभागा मधे/गरीब वस्त्यांमध्ये जाऊन तेथील वृद्धांना न्युमोनियाची लस आस्था तर्फे मोफत दिली जाते. आस्थाच्या हितचिंतकांनी दिलेल्या देणग्यांमधूनच आस्थाने गेल्या आठ वर्षात जडगाव येथील प्रकल्पासाठी रु.२० लाख व इतर उपक्रमासाठी रु. ३० लाख आतापर्यंत गुंतवले आहेत.
ह्या सर्व उपक्रमात आस्थास इप्का लॅबोरेटरी, वासन आय केअर, एम.एस.सीआय टी, हेल्प एज इंडिया, सीपला फाउंडेशन, रेडीएंट इंडस केम प्रा. ली., सरस्वत बँक, बँक ऑफ महाराष्ट्रा, स्टेट बँक ऑफ हैदराबाद रिटायर्ड इम्प्लॉयीज फोरम, इंडिअन मेडिकल असोसिएशन, पंख फाउंडेशन , सी. एम. आय. ए., सुत्तट्टी एंटरप्राईझेस, पुणे, अपोलो हॉस्पिटल, इत्यादी बऱ्याच जणांनी मदत केली आहे.
आस्था IICA, Help Your NGO, Guide Star India, नीती आयोग-दर्पण, BSE सम्मान अशा अनेक मान्यवर संस्थांनी आस्थाला प्रमाणित केले आहे. तसेच आस्थाचे कार्य व व्यवहारातील पारदर्शीकते बद्दल ABP News, Credibility Alliance, बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज युनियन वगैरेनी प्रशंसा केलेली आहे.
टाटा इंस्टीटयूट ऑफ सोशल सायन्सेस-मुंबई, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, डॉ. हेडगेवार रुग्णालय, CMIA, देवगिरी इंस्टीटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, कॅनटॉनमेंट बोर्ड-औरंगाबाद, पं. जवाहरलाल नेहरू कॉलेज, जायंट्स क्लब, औरंगाबाद मेडिकल असोसिएशन, पंख फाउंडेशन अशा सुमारे चाळीस संस्था अस्थाच्या संपर्कात आहेत.
अस्थाच्या कार्यक्रमांना भारत रत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम, पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ.अनिल काकोडकर, पद्मविभूषण प्रा. एम एम शर्मा, पद्मभूषण प्रा. जी.डी. यादव, श्री भूजंगराव कुलकर्णी, डॉ. विजय पांढरीपांडे, श्री. वीरेंद्र सिंग, श्रमती रितू करिधाल, डॉ. शुभा थत्ते, इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे.
आज जे काम आस्था करत आहे त्यात आस्थाच्या सुमारे पाचशे देणगीदारांचा मोलाचा वाटा आहे. आस्थाचे हे कार्य निस्वार्थ कार्यकर्त्यांशिवाय केवळ अशक्यच. कार्यकर्ते व आस्थाचे स्नेही हे रोजच्या व इतर उपक्रमास तन मन धनाने मदत करीत असतात. आस्था च्या कर्मचाऱ्यांचा पण या वाटचालीत मोलाचा वाटा आहे. आज आस्थामध्ये पूर्णवेळ तिन व अर्ध वेळ पाच कर्मचारी काम करत आहेत.
आनंददायी वृद्धापकाळ हे ध्येय साध्य करण्याचा विडा आस्था ने उचलला आहे. ज्येष्ठांना त्याचा लाभ मिळावा व तरुणांनी पण ह्या सहजीवनातील विविध कार्यक्रमात सहभागी होऊन ज्येष्ठांचा आनंद द्विगुणीत करावा व त्यांची कुटुंब संस्थेशी नाळ जोडलेली ठेवावी ही अपेक्षा आहे. आजचे तरुण उद्याचे वृध्द आहेत. त्यामुळे हा उपक्रम तरुणांसाठीही आहे. समाजातील सर्वांनीच ह्याची निकड जाणली तर हजारो हात ह्या सत्कार्यासाठी पुढे येतील हा विश्वास आहे. ह्या प्रकल्पामुळे वृद्धांचे प्रश्न बऱ्या पैकी मार्गी लागतीलच पण तरुणांनाही आई वडिलांची चांगली व्यवस्था झाल्याचे समाधान मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: ९३२५२०२८९७
www.aasthafoundationaurangabad.org
Email: info@aasthafoundationaurangabad.org
GIPHY App Key not set. Please check settings