यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई – विभागीय केंद्र औरंगाबाद, इंस्टाग्रामवरील ग्रुप कलर्स ऑफ औरंगाबाद व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत ‘अमेझिंग औरंगाबाद : द फोटोथॉन’ या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, दि. 18 मे 2019 रोजी, सायं. 6.00 वा. प्रोझोन मॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.
गंगाजमनी संस्कृतीचं औरंगाबाद शहर काळाच्या ओघात बदलतंय. औद्योगिक आणि वासाहतिक विकासाच्या प्रगतिपथावर असलेल्या या शहराचा ऐतिहासिक वारसा, स्थापत्य, रस्ते, खाद्यसंस्कृती आणि जीवसृष्टी या सार्यांत प्रचंड वैविध्य आहे. अनेक छायाचित्रकारांनी आपापल्या दृष्टिकोनातून पाहिलेल्या या शहराकडे आपण एकत्रित पहावे यासाठी आणि या सर्वच क्षेत्रांतलं ज्ञात-अज्ञात सौंदर्य टिपण्यासाठी जिवाचं रान करणार्या हौशी छायाचित्रकारांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी व नवीन छायाचिकारांना प्रोत्साहित करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शन शहराच्या विविध गर्दीच्या ठिकाणी पुढील दोन रविवारी भरविण्यात येणार आहे. मागील रविवारी सिद्धार्थ उद्यान व क्रांतीचौक येथील हुतात्मा स्मारक येथे हे प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी नागरिकांचा प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
550 हौशी छायाचित्रकारांनी या प्रदर्शनाकरिता आपले छायाचित्र पाठविले होते. त्यातील निवडक शंभरहून अधिक छायाचित्र प्रदर्शनाकरिता निवडण्यात आले आहे. यामध्ये स्ट्रीट, लॅण्डस्केप, वाईल्डलाईफ, पीपल्स अॅण्ड पोट्रेट यांसारखी विविध छायाचित्रांचा समावेश आहे. सदर प्रदर्शन रविवार, दि. 19 मे 2019 पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
उद्घाटन समारंभास व प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, विजय कान्हेकर, सुबोध जाधव, प्रदर्शनाचे संयोजक ज्ञानेश्वर पाटील, आदित्य दिवाण, अॅड. स्वप्निल जोशी, किशोर निकम, निखिल भालेराव आदींनी केले आहे.