शहरातील कचरा प्रश्नात सफाई मजूर, निरीक्षक चांगले काम करीत आहेत. कामचुकारपणा फक्त वरिष्ठच करीत असून, आज तातडीच्या बैठकीला गैरहजर राहणार्या अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रभारी मनपा आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. सुट्टीच्या दिवशी वरिष्ठ अधिकारी मुख्यालय सोडून बाहेरगावी जातात कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
रविवारी सुट्टीच्या दिवशीही प्रभारी आयुक्तांनी रात्री ७ वाजता मनपा मुख्यालयात एका बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला सर्व वॉर्ड अधिकारी, जवान, निरीक्षक उपस्थित होते. वॉर्डनिहाय कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला. सफाई मजूर आणि जवानांनी कर्मचारी अपुरे असल्याची ओरड केली. एका वॉर्डाची लोकसंख्या जवळपास ८ ते १० हजारांपर्यंत आहे. एका वॉर्डाला ७ ते ८ मजूर देण्यात आले आहेत. प्रत्येक घरातून वर्गीकरण केलेला कचरा गोळा करेपर्यंत दुपारचे दोन वाजतात. कर्मचारी वाढवावेत, अशी सूचना त्यांनी केली. प्रभारी आयुक्तांनी यावेळी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
शहरात ज्या ठिकाणी कचरा पडून आहे, त्याचे वर्गीकरण करण्यासाठी कचरा वेचकांची मानधनावर नियुक्ती करा. त्यांना ग्लोज, गमबूट आदी साहित्य द्या. सफाई मजुरांची संख्या वाढवा, ज्या वॉर्डांमध्ये पीट तयार केले आहेत, तेथे पावसाळ्यात भयंकर त्रास होईल. आतापासूनच तेथे शेड किंवा बांधकाम करण्यात यावे. प्लास्टिक बंदीसाठी सोमवारपासून पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येईल. ज्या वॉर्डांमध्ये कचर्याचे वर्गीकरण होत नाही, तेथे नागरिकांना समजावून सांगा. त्यांचे योग्य प्रबोधन करावे. व्यापारी भागात रात्री कचरा उचलण्याची पद्धत सुरू करावी. या कामामुळे दुभाजकांवर साचणारा कचरा साचणार नाही. शहरातील ३० टक्के वसाहतींमध्येच कचर्याचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: जुन्या शहरात. नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
अतिरिक्त आयुक्तांवर रोष
मनपातील अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग नगर जिल्ह्यातील आहेत. शनिवारी पालकमंत्री शहरात असल्याने त्यांना गावी जाता आले नाही. रविवारी सकाळी ते मुलाबाळांना भेटण्यासाठी निघून गेले. त्यामुळे बैठकीला ते हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे प्रभारी आयुक्तांनी कोणाचे नाव न घेता मुख्यालय सोडून बाहेरगावी जाणार्या आणि बैठकीला गैरहजर राहणार्या वरिष्ठ अधिकार्यांना नोटीस बजावण्याचे आदेशही सहायक आयुक्त विक्रम मांडुरके यांना दिले.
GIPHY App Key not set. Please check settings