औरंगाबाद मनपा आयुक्त डी.एम .मुगळीकर यांची बदली करण्यात आली आहे. यावरुन औरंगाबादमध्ये पेटलेला कचरा प्रश्न भोवल्याचं म्हटले जात आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पालिकेचा अतिरिक्त पदभार सोपावण्यात आले आहे. तर दीपक मुगळीकर यांची वैधानिक विकास महामंडळात बदली करण्यात आली आहे.
गेल्या 28 दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर कच-याचे ढीग साचले आहेत. यावर महापालिकेच्या पदाधिकारी आणि आयुक्तांना तोडगा काढता आलेला नाही. 7 मार्च रोजी मिटमिट्यामध्ये महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांच्या आदेशाने कच-याची वाहने निघाली. यास नागरिकांनी विरोध केला. पोलीस आणि नागरिकांमध्ये दगडफेकीच्या घटना होऊन संघर्ष निर्माण झाला. यामध्ये पोलिसांनी नागरिकांनाच बदडून काढले.
नारेगाव येथील डेपोत कचरा टाकण्यासाठी परिसरातील नागरिकांना महापालिकेला चार महिन्यांची मुदत दिली होती. या मुदतीत महापालिकेचे आयुक्त, प्रशासन आणि पदाधिका-यांनी कोणताही तोडगा काढला नाही. कच-याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याचे गांभीर्य महापालिकेला नव्हते. चार महिन्यांची मुदत संपताच नारेगावकरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.कच-याची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांना धाडले. त्यांनी पंचसूत्री जाहीर केली. मात्र, या पंचसूत्रीचीही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. यामुळे कच-याच्या प्रश्नाआधी आणि नंतरही महापालिका गंभीर नसल्याचे दिसले. कचरा प्रश्न निर्माण करून हजारो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
GIPHY App Key not set. Please check settings