मनपा कर्मचाऱ्यांनीच केली मनपा कारभाराची पोलखोल

राजकारणी मनपा कारभारात हस्तक्षेप करतात, निधींची उधळपट्टी करायला भाग पाडतात, उच्च अधिकाऱ्यांकडून काम करतांना तुच्छ वागणूक दिली जाते असे गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्तांसमोर मांडले.

0
319

महापालिकेचा कारभार कसा चालतो, भ्रष्ट्चाराला मिळणारे खतपाणी, वारीशांकडून होणारी वागणूक, राजकीय नेत्यांचा मनपा कारभारात होणारा हस्तक्षेप याचा पोलखोल मनपा कर्मचाऱ्यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांचासमोर केली. कर्मचाऱ्यांचे हे गाऱ्हाणे ऐकून मनपा आयुक्त सुद्धा अवाक झाले.

सिडको नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी मनपा आयुक्तांनी वर्ग-३ कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. मनपाचे उत्पन्न वाढविणे, मालमत्ता कर, कचरा, आरोग्य, ऐतिहासिक वारसा, खेळ आदी विषयांवर आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचे ग्रुप तयार केले. या ग्रुपमधील कर्मचाऱ्यांनी व्यासपीठावर येऊन आपले म्हणणे मनमोकळेपणे बोलावे. विशेष बाब म्हणजे आयुक्त स्वत:कर्मचाऱ्यांसोबत बसले होते. कर्मचाऱ्यांनीही संधीचे सोने करीत महापालिकेच्या संपूर्ण कारभाराची पोलखोल करून टाकली.

कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या व्यथा
1. नगरसेवकांच्या आदेशावरून अगोदर गट्टू बसवितात. नंतर डांबरी रस्ता, त्यानंतर परत सिमेंट रोड करण्यात येतो. ड्रेनेज लाईनचीही अशीच गत आहे. कोट्यवधी रुपयांची अशी उधळपट्टी केल्यास १ तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार कसा होईल. आडात नाही, तर पोहऱ्यात कसे येणार, तुम्ही सांगा आयुक्त साहेब??
2. अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेले की, राजकीय मंडळींचा त्वरित फोन येतो. त्यांची भाषा ऐकून काम करण्याची इच्छा होत नाही. चौथी आणि आठवी उत्तीर्ण कर्मचा-यांना पदोन्नती दिली जाते. तो निरक्षर व्यक्ती आम्हाला डबल पदवी असताना अरेरावी करतो.
3. 1975 मध्ये मनपाचे गाळे भाडे करारावर दिले. आजपर्यंत त्यांना २०० आणि ५०० रुपये भाडे आहे. हे भाडेही दरवर्षी वसूल होत नाही. शहरातील शेकडो सामाजिक सभागृह धूळखात पडले आहेत. हे भाडेतत्त्वावर दिल्यास मनपाला उत्पन्न मिळेल. मालमत्ता कर वसुली होत नाही, पाणीपट्टीचे रेकॉर्ड नाहीत. अशा पद्धतीने कामकाज सुरू राहिल्यास मनपाच्या तिजोरीत पैसे येणार कसे?
4. अग्निशमन विभागात तर अक्षरश: आंधळा कारभार सुरू आहे. किती रुग्णालयांना, मोठ्या इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिले याची नोंदच नाही. अनामत रक्कम रेकॉर्डवर का घेतली जात नाही.

महापालिका बळकट करा: मनपा आयुक्त
मला कर्मचाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. काही कर्मचारी चुकीचे काम करत असतील, त्यांच्यातही बदल आवश्यक आहे. शहरातील रहिवासी हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यांना दर्जेदार सेवा मिळणे हे मनपासाठी महत्वाचे आहे. सर्वांनी मिळून मनपा बळकट करणे आवश्यक आहे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी याप्रसंगी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here