अजिंठा डोंगररांगेतील दुर्गराज: किल्ले अंतुर
मराठवाड्यातील दुर्गसंपत्तीविषयी अभ्यास करतांना सुरुवात केली ती कंधार, धारुर, उदगीर आणि रामगड-माहुरसारख्या महामहीम दुर्गस्थानांपासून. औरंगाबाद जिल्ह्यातील एखादा किल्ला घ्यावा असा विचार करुन जिल्ह्यात शिरले. अभ्यास करताना लक्षात आले कि दुर्गश्रेष्ठ देवगिरीला दक्खनचे प्रवेशद्वार मानले तर जिल्ह्याची उत्तर सीमा असणाऱ्या अजिंठा-सातमाळा डोंगररांगा ह्या प्रवेशद्वाराची जणू संरक्षक भींतच आणि ह्या डोंगररांगेतील किल्ले म्हणजे भरभक्कम बुरुजांची साखळी. ही साखळी दक्खन भूप्रदेशाचा पहारा अविश्रांत करत आहे. त्यामुळे ह्या आपल्या अभ्यासात इतर भागांमधील ह्या किल्ल्यांची क्रमाक्रमाने दखल घेणे संयुक्तिक वाटले.
औरंगाबाद जिल्ह्यातील आपल्या ह्या लेखमालेतील हा पहिला किल्ला. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड़ तालुक्यात सुमारे २५ कि.मी. अंतरावरील नागापूर गावाच्या उत्तर दिशेला २०°२५’४३.५” उ. अक्षांश आणि ७५°१४’०७.५” पू. रेखांशांवर तसेच एका डोंगरावर अंतुर किल्ला वसलेला आहे. नागपूर गावाहून अंतुर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी मार्ग केलेला आहे तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्व आणि पश्चिम दिशेला असलेल्या दस्तापूर आणि नागद गावातूनसुद्धा चालत किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोचता येते.
इतिहास:
अंतुरचा किल्ला पंधराव्या शतकात कुणा एका मराठा सरदाराने बांधल्याचे सांगितले जाते. परिसरातील इतर किल्ल्यांप्रमाणे अंतुर किल्ल्यांच्या निर्मितीबद्दल ही आपल्याला ह्याहून अधिक माहिती मिळत नाही. नागापूरहून येताना दिसणाऱ्या दगडी खांबावरील दिशादर्शक फारशी शिलालेख, किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजावरील मलिक अंबरचा लेख आणि मशिदीवरील शिलालेख सोळाव्या शतकात आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीला अहमद नगरच्या निजामशाही राज्यात किल्ला होता हे दर्शवितात. पुढे अंतुरजवळ मुघल सरदार दिलेरखान आणि मराठे ह्यांच्यामध्ये मोठी लढाई झाल्याचे उल्लेखही इतिहासात सापडतात. परिसरातील इतर किल्ल्यांसारखी अंतुरवरील मुघल आणि पुढे हैदराबादच्या निझामकाळातील अधिक माहिती आपल्याला मिळत नाही. इसवी सन १८८४ मधील औरंगाबाद गॅझेटीयरमधील नोंदीमुळे मराठ्यांकडेसुद्धा किल्ल्याचा ताबा असल्याचे कळते. ह्या नोंदीनुसार इसवी सन १८२०च्या सुमारास मराठ्यांविरुद्ध शेवटच्या मोहिमेत ब्रिटीश आणि निझामाच्या संयुक्त सैन्यापुढे अंतुरच्या किल्ल्याने शरणागती पत्करली. मुघल काळापासून किल्लेदारी एका राजपूत घराण्याकडे असल्याचीही नोंद आहे.
स्थापत्य रचना:
सर्व बाजूंनी डोंगराच्या नैसर्गिक उभ्या कातळामुळे ह्या गिरीदुर्गाला भक्कम संरक्षण लाभले आहे. काही ठिकाणी हा कातळ मानवनिर्मित असावा असेही लक्षात येते. किल्ल्याची तटबंदी अजूनही बऱ्याच प्रमाणात उभी आहे. नागापुरकडून गाडी मार्गाने आले की तिहेरी तटबंदीने अभेद्य झालेला गोलाकार बुरुज आपल्याला दिसतो. डोंगर रांगेतून किल्ल्याला वेगळे करण्यासाठी खिंड खोदून त्यावर हा बुरुज बांधलेला आहे. मुख्य दरवाज्याकडे जाणारी वाट ह्या बुरुजाच्या उजव्या अंगाने जाते. एकमेकांशी काटकोन साधणारे तीन दरवाजे आणि त्या अनुषंगाने वळणावळणाने जाणारा मार्ग किल्ल्याच्या संरक्षण रचनेचा भाग आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक टेहळणी बुरुज आहे तोफा ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते.
प्रवेशाचा मार्ग चढून वर आल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा बंदिस्त तलाव आहे. तलावाच्या पूर्व दिशेला एक कमानीची बांधणी आहे. तलावाच्या उत्तरेला इमारतींचे अवशेष दिसतात. त्यांचे घुमटाकार छत १५-१६व्या शतकातील निझामकालीन वास्तुशैलींशी साधर्म्य दाखवते. किल्ल्यावरील तलावाच्या शेजारील मशीद, दर्गाह व काही थडगी अशा धार्मिक इमारती आहेत. किल्ल्यात प्रवेशापूर्वी ज्या मोठ्या बुरुजाला फेरी मारून आपण दरवाज्याकडे मार्गस्थ होतो त्या बुरुजावर जाण्यासाठी मार्गावर जाताना तळघर असलेल्या इमारतीचे अवशेष आणि एक भव्य दरवाजा पाहायला मिळतो. दक्षिणेच्या ह्या बुरुजामध्ये पहारेकऱ्यांसाठी देवड्या आणि एक पीराचा दर्गाह आहे.
त्याकाळी किल्ल्यावरील पाण्याची गरज मोठा तलाव आणि किल्ल्याच्या डाव्या अंगाला असलेली पाण्याची टाकी भागवत असणार. अनेक इमारतींचे आणि संरक्षण रचनेचे अवशेष इतक्या मोठ्या प्रमाणावर अजूनही अंगावर बाळगून असणारा ह्या किल्ल्याला अजिंठा-सातमाळा डोंगररांगांमधील दुर्गराज असे म्हणून नावाजले जाते.
आज पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या ह्या किल्ल्यात अलीकडेच अनेक संवर्धन आणि दुरुस्तीची कामे हातात घेण्यात आली. त्यात बुरुज व तटबंदीची दुरुस्ती, पायवाटा बांधणी, तलावाची दुरुस्ती, दर्ग्यासमोर फरसबंदी, दगडी पटांगण ही कामे प्रामुख्याने होती. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी तळामुळे किल्लेप्रेमींची बरीच सोय झाली आहे. सरकारने किल्ल्यांचे सुनियोजित पद्धतीने संवर्धन, देखभाल करायला हवी आणि आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात हे निश्चितच. पण त्याच बरोबर काही वर्षांपूर्वी घडलेली येथील तोफेच्या चोरीची आणि जवळच्या रानात ती तोफ अर्धी कापलेली मिळाल्याची घटना तसेच किल्ल्यावर विविध ठिकाणी कोरून ठेवलेल्या प्रेमवीरांच्या कथा, प्लास्टिकचा कचरा मात्र मनात प्रश्न उभा करतात. आपल्या सांस्कृतिक ठेव्याची काळजी फक्त सरकारलाच असावी का… चांगल्या सोयीसुविधा हव्यात हे आपल्याला कळते..पण फक्त सरकारला दोष न देता आपण सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊन वागायला कधी शिकणार….??
Google Map