in ,

औरंगाबादः लॉकडाऊननंतरचा कल, आव्हाने आणि उपाययोजना (भाग-१)

कोरोना या आजाराबद्दल ऐकलं, वाचलं अथवा माहित नसलेला व्यक्ती जगात सापडणे अशक्य आहे. इतक या लहानश्या विषाणूने संपूर्ण जग व्यापून टाकलेलं आहे. या विषाणूमुळे आजवर अठरा लाखाहून अधिक लोकांना ग्रासलंय, तर एक लाख वीस हजारांच्या आसपास लोकांचा बळी घेतलाय. कोरोना विषाणूपासून स्वतःचा बचाव कसा करायचा, आटोक्यात कधी येईल, लस कधी येईल, उपचार कधी येतील आणि अर्थव्यवस्थेला किती फटका बसेल. यावर आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय संस्था, संघटना, शास्त्रज्ञ, संशोधक, अभ्यासक, अर्थतज्ज्ञ वगैरे वगैरे आपआपले मत व्यक्त करताहेत. प्रत्येकजण आपआपल्या आकलनानुसार कोरोनावर व्यक्त होतोय. लॉकडाऊनमुळे आर्थिक रेलचेल थांबल्याने असंख्य सर्वसामान्य नागरिकांना कोरोना एंझायटी या नव्या आजारानेही ग्रासलेलं आहे.

या सर्व धांडोळ्यात मनुष्यप्राण्याने कोरोना विषाणू सारख्या अनेक विषाणूंचा सामना करून आपले स्थान मजबूत केलेले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवरही मात करून पुन्हा उभारी घेऊ, या मतावर सर्वजण ठाम आहेत. भलेही काहींच्या मते आपण या संकटातून एक महिन्यात, तर काहींच्या मते काही महिने अथवा वर्षभरात सावरू असे असले तरीही मात नक्की करू हा आशावाद कायम आहे. जगभरात संपूर्ण उलथापालथ होत असताना पंधरा-सतरा लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबादकरांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. प्रामुख्याने लॉकडाऊननंतर संबंधित क्षेत्रातील कल, आव्हाने आणि उपाययोजना काय असतील, यावर या तज्ज्ञांशी चर्चा केली.

कोरोनानंतर सर्वप्रथम पहिला परिणाम लोकांच्या लाईफस्टाईलवर होईल हे निश्चित आहे. सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतेला अतिमहत्त्व मिळेल. त्याचा परिणाम उद्योग, व्यवसाय, नोकरी, व्यापार, शिक्षण आदी सर्व ठिकाणी प्रकर्षाने दिसून येईल. काहींच्या मते लॉकडाऊन संपल्यानंतर कार्यालयीन कर्मचारी असतील अथवा बांधकाम कामगार असतील त्यांचा आळस झटकून त्यांना पुन्हा पूर्वपदावर आणणे, हे सर्वात मोठे आवाहन असणार आहे. त्यासह त्यांच्या मनातील शंका, कुशंका बाजूला सारून पूर्वीपेक्षा त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कार्यालयात आल्यावर वैयक्ति स्वच्छता, हँडवॉश, सॅनिटायझर आदींसारखी साधने अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
उद्योजक मानसिंग पवार यांनी सांगितले, की कर्मचाऱ्यांना आलेला आळस झटकून त्यांना कामाला लावणे, त्यांच्या मनातील कोरोना विषाणूबाबतची भिती दूर करणे आणि येणाऱ्या काळात उद्योग, व्यवसाय अथवा नोकरीशिवाय पर्याय नाही, हे सर्वांनीच समजून घेण्यासारखी बाब आहे. कोरोनानंतर कामकाजाची पद्धत पूर्णतः बदलणार आहे. सध्या लॉकडाऊन असला तरीही कंपनीस्तरावरील बैठका आम्ही ऑनलाईन करतोय. हा ट्रेंड लॉकडाऊननंतरही कायम राहील. कारण, मनुष्यबळ कमी न करता खर्च कमी कुठे आणि कसा करता येईल यावर विचार करावा लागणार आहे. त्यात प्रामुख्याने कंपन्यांच्या बैठका, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदी बाबी ऑनलाईन कराव्या लागतील किंवा सवय लावून घ्यावी लागणार आहे. आतापर्यंत आम्ही ग्राहकांना थेट आमनेसामने बसून सेवा देत असू तर आता यापुढे हे अशक्य होऊ शकते. त्याऐवजी जास्तीत जास्त काम ऑनलाईन व्हिडीओ अथवा टेलेफोनिक कॉलद्वारे करावे लागणार आहे. ऑनसाईट सेवा देतांना फिजिकल डिस्टन्स साधण्याकरिता ज्याठिकाणी दोन अथवा तीन कर्मचारी जात होते तेथे एक कर्मचारी पाठवावा लागणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे आरोग्याबाबत समुपदेशन सातत्याने करावे लागणार आहे. सर्वांनीच आता मास्क, सॅनिटायझर, हँडवॉश आणि वैयक्तिक स्वच्छता पाळणे अत्यावश्यक होणार आहे. वर्क फ्रॉम होमची संकल्पना वाढविण्यासाठी आस्थापना आणि कर्मचारी दोघांनीही एकमेकांना सहकार्य करून पुढे न्यायला हवी. जितका जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून सोशल डिस्टन्सींग बाळगावे लागणार आहे.

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे म्हणाले, की व्यापार पूर्वपदावर येण्यासाठी बराच काळ जाणार आहे. विशेषतः ग्राहक बाजारपेठेत येण्यास धजावणार नाही. व्यापारी आणि ग्राहकांमध्ये न बोलताही शंका-कुशंका आणि भितीचे वातावरण राहील. लॉकडाऊन दरम्यान कर्मचाऱ्यांचे पगार, कर्ज व त्यावरील व्याज, वीजबील आणि इतर खर्चाचा बोजा व्यापाऱ्यांवर पडलेला आहे. लॉकडाऊननंतर या बाबींना तोंड देता देता नाकी नऊ येणार आहे. त्यानंतर ग्राहकांना सुरक्षित वातावरण देण्याचा विश्वास द्यावा लागणार आहे. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले आम्ही उचललेली आहेत. त्यांची अंमलबजावणीही लॉकडाऊननंतर निश्चितच होईल. प्रामुख्याने सोशल डिस्नटन्स पाळण्यासाठी पैठण गेटवर आम्ही पार्किंगचे नियोजन करीत आहोत. शोरुम अथवा दुकानात ग्राहकांना आल्यावर प्रशासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक काळजीही आम्ही नक्कीच घेऊ.

बांधकाम व्यवसायिक पापालाल गोयल म्हणतात की, लॉकडाऊननंतर बांधकाम कामगार व बांधकाम साहित्याचा तुटवडा होण्याची दाट शक्यता आहे. साहजिकच या दोहोंचा तुटवडा झाल्याने मागणी वाढून प्रत्येकाला जास्तीची किंमत मोजावी लागणार आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनपूर्वी बुकींग झालेली घरे ग्राहकांच्या ताब्यात देण्याचे मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक घर अथवा जमीन घेण्याला प्राधान्य देतात. कदाचित मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या सर्व परिस्थितीचा एकत्रित परिणाम म्हणून फ्लॅट, घरे, प्लॉट अथवा जमीनीच्या किंमती कमी होण्याची शक्यता नाही. त्याउलट किंमतीत वाढ होऊ शकते. बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगार अवलंबून असतात त्यामुळे चालणा देण्यासाठी स्टॅम्प ड्यूटीमध्ये सवलत देणे, पंतप्रधान योजनेची रक्कम वाढवावी आणि जीएसटी इनपुट क्रेडिट लागू करण्याची मागणी शासनाकडे केलेली आहे. त्याशिवाय असंघटित क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांसाठी पाच हजार रुपये देण्याची योजना शासनाने आणलेली आहे, ती निश्चितच स्वागतार्ह आहे. त्याशिवाय सर्वांगिण परिस्थिती जाणून घेऊन कोरोना व लॉकडाऊननंतर उपाययोजनांबाबत राज्य व राष्ट्रीय क्रेडाईच्या सातत्याने बैठका सुरु आहेत.

सराफा व्यवसायिक उदय सोनी यांनी सांगितले, की सोनं हा बाजारातील विश्वसनीय गुंतवणूकीचे साधन आहे. त्यामुळे सर्व स्तरातून सोन्याची मागणी कायम असते. एकीकडे शेअर बाजार व रिअल इस्टेट गटांगळ्या खात असतांना सोन्याची किंमत ४६ हजार रुपये प्रति तोळा एवढी झालेली आहे. लॉकडाऊननंतर नेमंक सराफा बाजार कसा असेल, याबाबत संभ्रम असला तरीही किंचित अप्स अँड डाऊन होऊन बाजार स्थिरावेल. यादरम्यान किंमती आणखी वाढू शकतात, मात्र थोडाबहुत बदल होऊन स्थिरावतील.

पर्यटन क्षेत्रातील व्यवसायिक जसवंत सिंह राजपूत यांनी सांगितले, की पर्यटन हे अत्यावश्यक बाबींमध्ये येत नाही. त्यामुळे या क्षेत्राबाबत लगेचच बोलणे घाईचे होईल. लॉकडाऊननंतर हा उद्योग जिवंत राहण्यासाठी धडपडावे लागणार आहे, त्यानंतर वाढण्यासाठी. लॉकडाऊननंतर चित्र स्पष्ट झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारकडे योग्य त्या मागण्या आम्ही निश्चितच करू. कारण, पर्यटन उद्योग हा दळणवळण, हॉटेल यांसारख्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. सुरुवातीला माझ्या मते देशांतर्गत पर्यटनावर अधिक भर देऊन टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय पर्यटनाकडे वळायला हवे.

What do you think?

Written by Abhijeet Hirap

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

डेटॉल, हार्पिक उत्पादन असलेला RB ग्रुप करणार ऑरीकमध्ये मोठी गुंतवणूक

Corona Update: आनंदवार्ता ; औरंगाबामध्ये आणखी एक महिला कोरोनामुक्त, दोन आठवड्याच्या उपचारानंतर आज रुग्णालयातून डिस्चार्ज