मागील चार वर्षात सिंचनाचा अनुशेष, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, बळीराजा शेतकरी संजिवनी योजना, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, ऑरिक सिटी, मराठवाडा वॉटर ग्रीड अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शासनाने मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची वाटचाल सुरू केलेली आहे. मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीकडे नेण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड मोहीम येथे प्रभावीपणे राबविली. यापुढेही मराठवाड्याला विकास, समृद्धीच्या दिशेने पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
येथील सिद्धार्थ उद्यान येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेशात श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी परिवहन, खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषद अध्यक्ष ॲङ देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, विनायक मेटे, प्रशांत बंब, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक आदींची उपस्थिती होती.
श्री.फडणवीस म्हणाले, मराठवाड्याच्या विकासाला पूरक असणाऱ्या सर्व योजना मराठवाड्यात राबविण्यासाठी शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, यासारख्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी येथे केली आहे. राज्यातील निर्मित शेततळ्यांपैकी मराठवाड्यात 35 टक्के शेततळ्यांची निर्मिती झाली. देशासाठी व राज्यासाठी महत्त्वाच्या अशा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून 14 प्रकल्पांचे पाणी एकत्रित करून पाईपलाइनद्वारे मराठवाड्यात सर्वत्र पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी भारतातील आधुनिक असे ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ तयार करण्यात येते आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून बळीराजा शेतकरी संजिवनी योजनेतून जवळपास 15 हजार कोटीपेक्षा अधिक निधी मराठवाड्याला देण्यात आलेला आहे. जलयुक्त शिवारचे मराठवाड्यातील काम राज्याला पथदर्शी असेच आहे. ‘मागेल त्याला शेततळी’ अंतर्गत 35 टक्के शेततळी मराठवाड्यात झाली आहेत. या माध्यमातून 60 हजार हेक्टरपेक्षा अधिक संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जंगलक्षेत्र कमी असल्याने मराठवाड्याच्या विकासासाठी वृक्षाच्छादन महत्त्वाचे होते. त्यानुसार मराठवाड्याने यंदा दोन कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिलेले असतांना पाच कोटी वृक्षलागवड करून विक्रमच केला आहे. दुष्काळ मुक्तीसाठी ही महत्त्वाचीच पावले आहेत.
नागपूर-मुंबई सुपर एक्सप्रेस वेचा सर्वाधिक फायदा मराठवाडा विभागाला होणार आहे. विशेषत: औरंगाबाद, जालना शहर मराठवाड्यातील उद्योगाचे मॅग्नेट ठरणार आहे. त्यातून मोठी गुंतवणूक होणार आहे. डीएमआयसीसारख्या केंद्राच्या महत्त्वाच्या योजनेतून भारतातील पहिले सर्वसमावेशक असे शहर औरंगाबादेतील (ऑरिक सिटी) शेंद्रा-बीडकीन होते आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले आहे. या योजनेत अकरा हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे. त्यातून तीन लाख रोजगार मराठवाड्यात निर्माण होणार आहे. मराठवाड्यात उद्योग यावेत यासाठी विजेचे दर देखील कमी ठेवण्यात आले आहेत. शासनाकडून मराठवाड्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य असल्याचे यावेळी श्री.फडणवीस यांनी सांगितले.
सुरूवातीला हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून श्री.फडणवीस व मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर पोलीस दलाकडून तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी श्री.फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर स्वातंत्र्यसेनानी, त्यांचे नातेवाईक यांची भेट घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छाही श्री.फडणवीस यांनी त्यांना दिल्या. दरम्यान, सुरुवातीला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्प वाहून हुताम्त्यांना अभिवादन केले.
महत्त्वाचे मुद्दे :
• राज्याच्या तुलनेत 35 टक्के शेततळी मराठवाड्यात : 60 हजार हेक्टरपेक्षा अधिक संरक्षित सिंचन क्षमता निर्माण
• बळीराजा कृषि संजीवणी योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याला 15 हजार कोटींचा निधी
• मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून विविध ठिकाणच्या 14 प्रकल्पांचे पाणी मराठवाड्याला मिळणार
• औरंगाबाद शहराला जागतिक दर्जाचे शहर बनवणार
• DMIC च्या माध्यमातून 11 हजार कोटींची गुंतवणूक : 3 लाख रोजगार निर्मिती.
• औरंगाबाद बनणार ‘उद्योगाचे मॅग्नेट’
GIPHY App Key not set. Please check settings