एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारे
गतवर्षीची आलेले अपयश मागे सारत.. यावर्षी नव्याने केलेली तयारी.. याला अखेर आज यश आले. आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी औरंगाबादकर गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिने जगातील सर्वोच स्थान असलेले माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला.
२०१७ साली आखलेली माउंट एव्हरेस्टची मोहीम निसर्गाच्या अवकृपेने अर्धवट सोडून प्रा. मनीषा वाघमारे माघारी फिरली होती. शिखरमाथा अवघा १७० मीटर राहिला असताना माघारी फिरावे लागल्याची सल मनात कायम ठेवून मोहीम गुंडाळली गेल्यामुळे किंचित खचलेल्या मनीषा वाघमरेने ही मोहीम नव्याने आखली. प्रकृती ठणठणीत होताच तिने नव्याने डाव आखत जुळवाजुळव सुरू केली आणि एप्रिल २०१८ मध्ये पुन्हा एव्हरेस्टच्या दिशेने वाटचाल सुरू केली. इंडियन कॅडेट फोर्सची स्वयंसेवक आणि महिला महाविद्यालयाची शारीरिक शिक्षण विभाग संचालक असलेल्या मनीषाने एव्हरेस्ट परिसरातील शिखरांवर आपला सराव सुरू ठेवला होता. गुरुवारी (ता. १७) ती एव्हरेस्ट बेस कॅम्प सोडून कॅम्प १ कडे सरकली. त्यानंतर कॅम्प १, कॅम्प २, कॅम्प ३, ४ साऊथकोल मार्गे ती माउंट एव्हरेस्टच्या शिखर माथ्यावर (८८४८ मीटर) पोचली. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तिने समिट केल्याची माहिती आयसीएफचे जगदीश खैरनार यांनी दिली. त्यानंतर ती माघारी फिरली असून तिचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. साधारण २ ते ३ दिवसात ती बेस कॅम्पला परत पोचणार आहे.
GIPHY App Key not set. Please check settings