in

मराठवाड्याच्या रेल्वे प्रकल्पांना गती देणार ; रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे औरंगाबाद फर्स्टला आश्वासन

पर्यटन, उद्योग दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जाती. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण होईल, अशी शाश्वती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. ते औरंगाबाद फर्स्टच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्ली येथे सोमवारी (ता. दोन) आयोजित बैठकीत बोलत होते. त्याचबरोबर रेल्वे अधिकाऱ्यांसोबतही बैठक पार पडली. या शिष्टमंडळात औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, माजी अध्यक्ष ऋषी बागला, उपाध्यक्ष रविंद्र कोंडेकर, कोषाध्यक्ष अनिल माळी, हेमंत लांडगे आणि सुनित कोठारी उपस्थित होते.

श्री. गोयल म्हणाले, की औरंगाबाद ते मनमाडदरम्यान असलेल्या रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची करण्याची नितांत आवश्यकता आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली असून हे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे मंत्रालयाने ठेवले आहे. विद्युतीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच औरंगाबाद रेल्वे स्थानकावरून नव्या रेल्वे सुरू करता येणे शक्य आहे. नव्या रेल्वेने भारतातील महत्त्वाची शहरे जोडण्याचा आमचा मानस आहे. याच मार्गावर डबल लाईन करण्यात यावी, ही मागणी होत होती. त्यासंदर्भात अगोदर केलेले सर्वेक्षण आणि औरंगाबाद फर्स्टची आकडेवारीचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे डबललाईन संदर्भात पुन्हा एकदा सर्वेक्षण करून त्यावर निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये पिटलाईन टाकण्यासाठी चाचपणी करून काम सुरू केले जाईल. आतापर्यंत औरंगाबाद फर्स्टव्यतरिक्त पिटलाईन, दुहेरीकरण आणि नवीन रेल्वेकरिता शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी केलेली नाही, यावर श्री. गोयल यांनी आश्चर्य व्यक्त केले.

औरंगाबाद- पुणे रेल्वेमार्गासाठी प्रयत्न करणार
औरंगाबाद ते पुणेदरम्यान रेल्वे सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. मात्र ही दोन्ही शहरे रेल्वेने जोडण्याकरिता निम्मा खर्च राज्य सरकारने उचलण्याची आवश्यकता आहे, निम्मा खर्च निश्चितच केंद्र सरकार करेल. त्यामुळे राज्य सरकारने औरंगाबाद-पुणे रेल्वे सुरू होण्यासाठी एक पाऊल पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री. गोयल यांनी व्यक्त केले.

रेल्वेस्थानकाचा विकास करणार पीपीपीद्वारे
औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा विकास करण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाशी बोलणी पूर्ण झालेली आहे. त्याशिवाय जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक तयार करण्यासाठी पीपीपी मॉडेलद्वारे विकसित करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. प्रामुख्याने पायाभूत सुविधा उभारून व्यापारी संकुल उभारण्यासंदर्भात विचार केला जात आहे. या माध्यमातून मिळणारा पैसा हा औरंगाबादच्याच विकासासाठी वापरण्यात येईल, असेही ते म्हणाले.

रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोर मांडला लेखाजोखा
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना भेटण्यापूर्वी औरंगाबाद फर्स्टच्या शिष्टमंडळाने रेल्वे मंत्रालयातील प्रमुख अधिकाऱ्यांना भेट देऊन औरंगाबाद रेल्वेची सद्यस्थिती, प्रस्तावित कामे आणि अपेक्षित कामांचा लेखाजोखा आकडेवारीसह सादर केला. शास्त्रशुद्ध पद्धतीने सादर केलेल्या या मागणीचे रेल्वे अधिकाऱ्यांनीही स्वागत केले. या अधिकाऱ्यांमध्ये रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक (नियोजन) व्ही शंकर, कार्यकारी संचालक (बोगी) विनय श्रीवास्तव, कार्यकारी संचालक (पायाभूत सुविधा) आर.के. सिंग, संचालक (रेल्वेब्रीज) सुबोधकुमार, कार्यकारी संचालक (नवीन रेल्वे) मनदीपसिंग भाटिया, कार्यकारी संचालक (प्रकल्प संचलन) बी.के. गुप्ता, कार्यकारी संचालक (सर्वेक्षण) बी.एस. बोध यांचा समावेश होता.

या आहेत औरंगाबाद फर्स्टच्या मागण्या
– औरंगाबाद ते मनमाडदरम्यान रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण करणे.
– औरंगाबादमध्ये पिटलाईनची उभारणी करणे.
– औरंगाबादहून रेल्वेद्वारे महत्त्वाची शहरे जोडण्यासाठी नव्या रेल्वे सुरू करणे.
– औरंगाबादहून नवीन रेल्वेमार्ग उभारणे. त्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण, देशभरातील प्रमुख धार्मिक व तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. त्याशिवाय उस्मानाबाद, बीड, शिर्डी, बुलडाणा, नगर आणि अजिंठ्याचा समावेश आहे.
– हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणे.
– औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा विकास करणे.
– कोकण रेल्वेच्या धर्तीवर मराठवाडा रेल्वे महामंडळाची स्थापना करणे.

What do you think?

Written by Admin

CityKatta : Aurangabad's own social media platform

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

Rs 152.24 cr approved for road works in Aurangabad

Know The AURIC : Part 1