औरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न कृतीबध्द कार्यक्रमानुसार मार्गी लावण्याचे निर्देश मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी आज दिले.
औरंगाबाद शहर कचराप्रश्नासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
औरंगाबाद शहराच्या कचरा प्रश्नावर लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्याअनुंषगाने नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांनी औरंगाबाद येथे जाऊन कचरा प्रश्न सोडवण्यासाठी पंचसूत्री तयार केली आहे, त्यानुसार हा प्रश्न मार्गी लावावा. कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यानुसारच कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचऱ्यावर विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया करणे, ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करणे, सुका कचरा जमा करण्याचे केंद्र प्रत्येक प्रभागात सुरू करणे, यापुढे कचऱ्याचे कुठेही डंपिंग होणार नाही याची काळजी घेऊन या पंचसूत्रीनुसार औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही मुख्य सचिवांनी दिले.
औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना वेळावेळी राज्य शासनामार्फत मार्गदर्शन करण्यात येत असून शहरातल्या ९ विभागांसाठी ९ पथके तयार करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून झोनमध्येच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. देशात इंदौर सगळ्यात स्वच्छ शहर आहे, तिथे काम करणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची मदत औरंगाबाद जिल्हयाच्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी घेण्यात येत असल्याचे श्रीमती म्हैसकर यांनी सांगितले.
सध्या काही ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचे खत खड्डे (compositing pit) तयार करण्याचे कामकाज सुरु असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी सांगितले.
GIPHY App Key not set. Please check settings