एक नसलेला किल्ला : भांगशीगड
औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ल्यांची मालिका श्रेष्ठतम दुर्गवर देवगिरी किंवा किल्ले दौलताबादशिवाय अपूर्णच. तरीसुद्धा आपल्या ह्या लेखमालेत मराठवाड्यातील इतर दुर्गांची कहाणी सुफळ संपूर्ण झाल्यावर देवगिरीच्या सुरस गाथेची पोथी उघडावी असा विचार आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी सोडून इतर किल्ले पाहून आता दुसऱ्या जिल्ह्याकडे वळावे असा विचार केला आणि कुणीतरी म्हणले अरे आमचा भांगशीगड राहिला….
औरंगाबाद शहरातून दौलताबाद वेरूळच्या रस्त्यावर मिटमिटा गावानंतर डावीकडे चारी बाजूनी खड्या कडेकपारीमुळे खंदा वीर उभा राहिल्यासारखा एक डोंगर बऱ्याच वेळ आपले लक्ष वेधून घेत असतो. डोंगररांगांपासून फटकून उभा असणारा, थोडया अंतरावरच्या दौलताबादच्या डोंगरासारखाच एकलकोंडा असा हा भांगशीमातेचा डोंगर.
खूप वेळा एखादी दंतकथा इतिहासाचा मुखवटा घालून आपल्यासमोर येते आणि हळूहळू तोच आपण खरा इतिहास मानायला लागतो तसे काहीसे भांगशीगडाच्या बाबतीत झालेय. लहानपणापासून दौलताबादला गेल्यावर एक गोष्ट सांगितली जायची ती यादवांच्या सुखसंपन्न देवगिरीवर झालेल्या अल्लाउद्दीनाच्या हल्ल्याची. त्या गोष्टीची सुरुवात व्हायची ती भांगशीगडापासून. अल्लाउद्दिन मोजक्या फौजेला घेऊन देवगिरीवर हल्ल्यासाठी वायुवेगाने दौडत येत असताना त्याला एक भक्कम कडेकपाऱ्या असलेला डोंगर दिसला आणि तोच किल्ले देवगिरी असल्याची खात्री होऊन त्याने खऱ्या देवगिरीच्या आधी त्याच डोंगराला हल्ल्याच्या दृष्टीने वेढा घातला अशी ती गोष्ट. मात्र देवगिरीचा झालेला पाडाव आणि ह्या डोंगरावरील स्थापत्यरचनेचे अवशेष पाहता ही गोष्ट एका अर्थाने दंतकथाच.
[g-carousel gid=”4493″ height=”200″ per_time=”3″]
मात्र एका गोष्टीनुसार अल्लाउद्दिनला रोखायचा पहिला प्रयत्न लासूरच्या पंचक्रोशीत शूरवीर पण अयशस्वी झाला. तिथून देवगिरीकडे जात असताना अल्लाउद्दिनास भांगशी गड दिसला असेल ह्यात शंका नाही. असा हा भांगशीगड आज सर्वार्थाने किल्ला नाही पण त्याचे भौगोलिक स्थान टेहळणीसाठी योग्य असेच आहे. देवगिरीवर येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवायचे काम इथून नक्कीच झाले असेल. मग ह्याला गड का म्हणायचे.. तर आपल्याकडे अनेक देवीदेवतांच्या डोंगरावरील निवासस्थानाला गड म्हणण्याची पद्धत आहे.. जेजुरीचा गड, माहूर गड ही काही उदाहरणे… तसाच आपला भांगशी मातेचा गड.
ह्या डोंगराची छोटी मुरमाड घसरण चढून गेल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात. डोंगरमाथ्यावर काही पाण्याची छोटी मोठी टाकी आणि जमिनीत कोरलेली लेणी सोडून इतर कुठल्याही जुन्या काळातील मानवी अस्तित्त्वाच्या खुणा नाहीत. ह्या खोदकामाच्या प्राथमिक स्वरूपाकडे पाहून लेण्याचा काळ ठरवणे अवघड आहे. आज गडावर सिमेंट कॉंक्रीट वापरून बांधलेले भांगशी मातेचे मोठे मंदिर आहे. जत्रेच्या वेळी भाविकांची इथे मोठीच झुंबड उडते. अशा ह्या दौलताबादच्या वाटेवरच्या भांगशीगडाला भेट एकदा तरी देणे आवश्यकच.
अशा ह्या औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ले हिंडत असताना प्रकर्षाने ऐतिहासिक माहितीचा अभाव जाणवतो. दुर्गश्रेष्ठ देवगिरी आणि थोडी फार अंतुर किल्ल्याची माहिती सोडल्यास इतर किल्ल्यांचा लिखित इतिहास तर सोडाच पण स्थानिक दंतकथा, गोष्ट, परंपरा अशा स्वरुपातसुद्धा फार गोष्टी नाहीत. कुठल्या नरवीराचा ना त्यांना सहवास लाभला ना पाठबळ. पण त्यामुळे त्यांचे धोरणात्मक महत्त्व कमी होत नाही हे नक्कीच.
GIPHY App Key not set. Please check settings