प्रभारी पोलिस आयुक्त म्हणुन पदभार घेतलेल्या विषेश पोलिस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांच्यासह शनिवारी (ता. 17) सकाळी सात वाजेच्या सुमारास अख्खे पोलीस दल शहर स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरवले.
गेल्या 29 दिवसांपासुन कचरा प्रश्न पेटलेला आहे. या आंदोलनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याने सर्वांनीच कचरा प्रश्न गांभिर्याने हाताळायला सुरुवात केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी प्रभारी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी पदभार घेतला असून, त्यांनी आज सकाळी शहरात स्वच्छता अभियान राबविले. यामध्ये नागरिकांसह पोलिसही स्वच्छतेसाठी रत्यावर उतरले. यामुळे प्रत्यक्ष कृती करत त्यांनी शहराला स्वच्छतेचा संदेश दिला.
यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे घाडगे, राहुल श्रीरामे, डॉ. अनिता जमादार, सहाय्यक आयुक्त शेवगण, यांच्यासह 400 पोलिस जवान, आठ पोलिस निरीक्षक, 20 अधिकाऱ्यांनी विद्यापीठ, बिबी का मकबरा, नागसेनवन परिसर, शहानुरमियॉं दर्गा परिसराची स्वच्छता केली. यात सीएसएमएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला. तर सहाय्यक पोलिस आयुक्त गोवर्धन कोळेकर, गायकवाड, नागनाथ कोडे, ज्ञानोबा मुंडे यांनी त्यांच्या प्रभागात स्वच्छता अभियान राबवले.
पोलिसांच्या हाती दंडा नव्हे झाडु
भारंबे यांनी शुक्रवारी सर्व पोलिसांना पोलिस आयुक्तालयात हजर राहण्यास सांगितले होते. इतरवेळी सुरक्षेसाठी बंदोबस्तात दिसणारे पोलिस शनिवारी सकाळी पाऊणे सातच्या सुमारास रस्त्यावर पहायला मिळाले. ते ही हातात पोलिसांचा दंडा नव्हे तर झाडु व कचरा गोळा करण्याचे साहित्य घेऊन. पदभार घेताच शुक्रवारी चार्ली पथक बरखास्त करत चार दंगा नियंत्रण पथक स्थापनेचा निर्णय भारंबे यांनी घेतला. त्यामुळे नवे प्रभारी आयुक्त अजुन कोणकोणते धडाडीचे निर्णय घेतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.