शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन दिवसात रोडमॅप तयार करा, कोणाचा दबाव असेल तर थेट मला फोन करा, पण आता दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा महापालिकाच बरखास्त करू, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना बुधवारी (ता. 18) दिली.
शहरातील कचराप्रश्न पाच महिन्यानंतरही संपलेला नाही. त्यामुळे बुधवारी नागपूर येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, उपमहापौर विजय औताडे, महापालिकेतील भाजप गटनेते प्रमोद राठोड, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बागडे यांनी पाच महिने झाले रस्त्यावरचा कचरा का संपत नाही, असा प्रश्न आयुक्तांना केला. त्यावर आयुक्तांनी आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचा कचरा कधी संपणार याचा रोडमॅप तयार आहे का? निविदा प्रक्रिया कधी संपणार? कचऱ्यावर प्रक्रिया कधीपासून सुरू होणार? याची माहिती जनतेला कळाली पाहिजे. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? एवढे दिवस काय केले? असा सवाल केला. दोन दिवसात रोडमॅप तयार करून सादर करा. वेळेवर कामे होत नसतील तर महापालिकाच बरखास्त करून टाकतो, अशी ताकीद मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिली.
शिवसेना पदाधिकार्यांची मातोश्रीवर बैठक
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीऐवजी ‘मातोश्री’वरच्या बैठकीला जाणं पसंत केलं. औरंगाबादच्या समांतर जलवाहिनी आणि कचराप्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.