in , ,

पॅरासाईटांचा समाज

जीस रेल से जा न सके,
मर के उसी मे सवार थें हम
याद रखना ए दुनियावालो
तुम्हारे घर की निव रखनेवाले
मजदूर थे हम….

गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार हा पॅरासाईट या चित्रपटाला मिळाला आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली की पॅरासाईट म्हणजे कोण? अनेकांना याचं उत्तर सापडलं नाही, किंवा शोधलं नाही किंवा ते समजलं नाही. पण कोरोनाचा आऊटब्रेक, त्यामुळे होणारा लॉकडाऊन आणि त्यानंतर औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून 16 मजुरांचे गेलेले प्राण इथपर्यंत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता यावं लागनं ही खरं तर आपल्या संपत जाणाऱ्या संवेदनशीलतेचे उदाहरणच म्हणावे लागेल. खरं म्हणजे उत्तर एवढं कठीण नव्हतं, आपल्या समोरच होतं.

पॅरासाईट कोण असतं ?
पॅरासाईट ती व्यक्ती किंवा तो प्राणी असतो जो दुसऱ्यांच्या रक्तावर जगतो. त्यांचं शोषण करतो. ही झाली त्याची व्याख्या. म्हणजे जी व्यक्ती जिवंत राहण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असते, त्याच्याकडून काहीतरी घेतल्याशिवाय तिला जगता येत नाही तिला पॅरासाईट म्हणता येईल. प्रत्यक्षदर्शी कामगारवर्ग, मजूर , गरीब लोक पॅरासाईट आहेत असं वाटतं. करण मोठमोठ्या कंपन्यांच्या मालकांच्या दयेवर, त्यांच्या पैशावर ते जगतात. या उद्योगपतींनी जर त्यांना रोजगार दिला नाही, पैसे दिले नाहीत तर कदाचित हे गरीब मरतील म्हणून ते पॅरासाईट..बॉन जून हो च्या पॅरासाईट या सिनेमातसुद्धा गरीब किम कुटूंब अति श्रीमंत पार्क कुटुंबावर रोजगार, पैशांसाठी अवलंबून असतं अर्थात पॅरासाईट असतं.वरकरणी!

पण दिग्दर्शकाने चित्रपटात दाखविल्याप्रमाणे प्रत्यक्ष जीवनात सुद्धा या प्रश्नाला एका मोठ्ठया कॅनव्हासवर पाहण्याची गरज भासते आणि तेव्हा लक्षात येतं की खरा पॅरासाईट कुणीतरी वेगळंच आहे. खऱ्या अर्थाने पॅरासाईट आहेत उद्योगपती, अति श्रीमंत, उच्च मध्यमवर्ग, आणि संवेदना संपत असलेला नवा पांढरपेशी मध्यमवर्ग.
श्रमिकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळतो. पण तो खरंच त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला असतो का? तो मोबदला त्याचं आणि त्याच्या कुटुंबियांचं जीवनमान उंचावण्यासाठी पुरेसा असतो का? नाही. खरं म्हणजे हा मोबदला त्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी सुध्दा पुरेसा नसतो. म्हणजे त्याच्या मोबदल्यात कुचराई करून कुणाचे खिसे भरले जातात तर ते या अति श्रीमंत लोकांचे, उद्योगपतींचे. इकडे मजूर त्यांचं भाग्य पायदळी तुडवत असतांना कोरोना नंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लगेच उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश आदी राज्यांनी कामगार कायद्यात बदल केले. आता कामाचे तास 12, ओव्हर टाईम वाढ, कामगारांच्या आरोग्य विम्यात शिथिलता असे अनेक बदल होत आहेत ज्यामुळे आपला कामगार खऱ्या अर्थाने रिसोर्स बनणार आहे मशीन आणि इतर संसाधनांसारखा. म्हणजे उद्योगांना आकर्षित करायचं असेल तर त्यांचा खर्च कमी करायला हवा नफा वाढवायला हवा. तो कसा वाढेल? तर कामगारांकडून कमी मोबदल्यात अधिक काम करवून. अति श्रीमंत त्यांच्या राहणीमानात इंचभर बदल घडवणार नाही पण हातावर पोट असणाऱ्या मजुरांना अधिक गरीब नक्की बनवतील. म्हणजे या उच्चभ्रू लोकांची चैन या कामगार वर्गाच्या, श्रमिकांच्या शोषणावर अवलंबून आहे. या श्रमिकांच्या रक्त आणि भावनांच्या शोषणावर हे उच्चभ्रू जगत आहेत त्यामुळे तेच खऱ्या अर्थाने पॅरासाईट आहेत.

श्रमिक हा कधीच पॅरासाईट नसतो. तो श्रम विकतो पण त्याचा योग्य मोबदला त्याला दिला जात नाही. तो स्वावलंबी असतो. दुसऱ्यांच्या हक्काची रोटी तो पळवत नाही. त्याला कामाच्या ठिकाणी अनेकदा आरोग्याच्या सुविधा दिल्या जात नाही. त्याच्या आयुष्याची सिक्युरिटी नसते. त्याला कधीही कामावरून काढून टाकले जाते. त्याला अपघात झाला तर काय? असे हजारो प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभे असतात. म्हणूनच आपल्याकडे हा अति गरीब वर्ग कधीच वर येत नाही, आणि कधी आलाच तर मध्यम वर्गात येण्याची त्याची ही कसरत अत्यंत जीवघेणी असते. पॅरासाईट या चित्रपटात किम कुटुंब आणि जुनी कामवाली यांच्यातील संघर्ष ही कसरत दाखवतो. हा संघर्ष त्यांना अधिक खाली, अंधारात घेऊन जातो.

त्यामुळेच जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा आधी संसाधन असलेले मजूर एकाएकी मालकांसाठी पॅरासाईट बनले. अशा मालकांनी त्यांच्यावर कृपा न दाखवता त्यांना तसच सोडून दिलं. म्हणजे व्हाईट कॉलर लोकांमुळे आपल्याकडे आलेला हा आजार, विमानांनी उडणाऱ्या लोकांनी आपल्या देशात आणला आणि त्याचा सगळ्यात पहिला आणि मोठा फटका या गरीब लोकांना बसला. आता हे मजूर लॉकडाउन मुळे पुन्हा बेरोजगार झाले, बेघर झाले, यांना परत आपल्या घरी जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. हे लोकं हजारो मैल पायीच चालू लागले, आणि घराच्या दिशेने सुरू झालेली ही वारी जीवघेणी ठरली. ज्या रेल्वेचे तिकीट मिळाले नाही त्या रेल्वेमधून त्यांचे शव वापस गेले. अशावेळी या कामगारांसाठी दिलासादायक काहीतरी शासनाने करायला हवं होतं. कोरोना आटोक्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा उद्योगांकडे आकर्षित करण्यासाठी काहीतरी करणं अपेक्षित आहे पण तसं न करता उलट त्यांच्यावरच नव्याने शोषण करणारे बदल कामगार कायद्यात घडवण्यात आले. ज्या दळभद्री लोकांना दोन वेळ जेवण्याची शाश्वती नाही त्यांच्यावर अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा भार टाकण्यात आला. कारण राज्यकर्त्याना माहीत आहे पोटाची आग तडजोड करायला भाग पाडते. त्यामुळे पुन्हा या मजदूरांना शोषणाची ही व्यवस्था स्वीकारावी लागणारच. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असा हा प्रकार आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेला पुन्हा सुरळीत करण्यासाठी श्रमिकांचं शोषण अपरिहार्य आहेच. त्यामुळे कोरोनानंतरची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं पॅरासाईट ठरण्याची भीती नाकारता येणार नाही.

पण खरा धोका आहे तो असंवेदनशील होत चाललेल्या मध्यम वर्गाच्या मानसिकतेचा.आपण सगळे फक्त पॅरासाईटच नाहीत तर असंवेदनशील सुद्धा होत आहोत. ही वृत्ती वेळीच थांबायला हवी. पॅरासाईट बनणं हा रोग आहे जो एका असंवेदनशील वृत्तीसोबत येतो. आपण कोणाचं किती रक्त शोषतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे किती हाल होतात याकडे आपलं लक्षच राहत नाही. केवळ माझा फायदा हा एकमेव मंत्र हे पॅरासाईट सतत जपत असतात.

संत ज्ञानेश्वर म्हणतात, “अवघाची संसार सुखाचा करेन”. पण आपण काही वेगळं तर म्हणत नाही आहोत ना याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या सर्व व्हाईटकॉलर लोकांनी स्वतःमध्ये माणुसकी आणण्याची आणि स्वतःला पॅरासाईट होण्यापासून थांबवण्याची गरज आहे. – अनामिका

What do you think?

Written by Admin

CityKatta : Aurangabad's own social media platform

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – आरोग्य मंत्री राजेश टोपे

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सिपेटला दिली भेट; खबरदारीचा उपाय म्हणून कोविड रुग्णालय उभारणार