in

कोरोनानंतरचे शिक्षण क्षेत्रातील कल, आव्हाने आणि उपाययोजनाः डॉ. सुधीर गव्हाणे

लॉकडाऊन भाग- २
‘कोविड- १९’ अर्थातच ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सबंध जगात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. डोळ्यांनी न दिसणाऱ्या एका विषाणू स्वतःला बुद्धिवान समजणाऱ्या मानवजातीचे जीवन असह्य करू शकतो, हे सिद्ध केले आहे. मानवाने निर्माण केलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान पूर्णतः थीट पडतांना दिसतंय. या स्थितीत कोरोनासारख्या विषाणूशी सामना करण्यासाठी या विषाणूचा अभ्यास, संशोधन, उपाय व लसीवर जगभरातील शास्त्रज्ञ हजारोंच्या संख्येने काम करताहेत. त्याला यश येईल हे नक्की. कोरोना विषाणूच्या अभ्यासात मानव जातीच्या आरोग्य संरक्षणाची ढाल म्हणून विद्यापीठ, तेथील संशोधन आणि तिथले संशोधक यांचेच खरे योगदान राहणार आहे. हे काम कोणत्या देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अब्जाधीश मालक करू शकत नाहीत. याठिकाणी संशोधक आणि संशोधन करणाऱ्या संस्था आणि विद्यापीठे यांचीच भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

जेव्हा-जेव्हा मानव जातीचा उत्कर्ष झालेला आहे, जेव्हा-जेव्हा मानवजातीवर महासंकट आलेलं आहे, तेव्हा-तेव्हा शिक्षण आणि संशोधन संस्थांनी मग त्या सरकारी असो किंवा खाजगी, आपले महान योगदान दिले आहे. आजवर सर्वक्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षण व्यवस्थेची स्थिती, आव्हाने आणि उपाययोजना काय असाव्यात, यासंदर्भात औरंगाबाद येथील शिक्षणतज्ज्ञ तसेच एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांची सविस्तर मुलाखत.

डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले, की कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य शास्त्रातील वैज्ञानिक व शास्त्रज्ञ यांचे योगदान आहे. त्याचप्रमाणे पुढील नियंत्रणासाठी व लसीच्या शोधामध्येसुद्धा शिक्षण व संशोधन क्षेत्राचेच काम आणि सिंहाचा वाटा राहणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाने या प्रकारच्या प्राणीजन्य विषाणू व त्यातून होणारे आजार प्राणीजन्य आजारांचा मानवाला असलेला धोक्याची कल्पना दिलेली आहे. मानवजातीवरील प्राणीजन्य आजाराचा धोका टळलेला नाही. यापूर्वीही मानवजातीने या प्रकारच्या विषाणूंचा सामना केलेला आहे. या प्रकारची असंख्य संकटे झेललेली आहेत. मग तो स्वाईन फ्लू असो अथवा कोरोना. यापुढेही अशा प्रकारच्या प्राणीजन्य आजारांची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे विषाणू व त्यापासून उद्भवणारे आजार नवनवे असणार आहेत. ते मानवी समाजाच्या अस्तित्त्वावर सातत्याने आघात करणार आहे. त्यामुळे आजच्या व भविष्यातील आरोग्य विषयक महासंकटांना सामोरे जायला विज्ञान व तंत्रज्ञानाला काम करावे लागणार आहे. यासाठी विद्यापीठ आणि संशोधन संस्थांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी पडलेली असेल. आता फक्त कोरोना विषाणूवर लस शोधून भागणार नाही, तर प्राणीजन्य विषाणूमुळे यापुढेही जो प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, त्याला प्रतिबंधक लस शोधण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेला आपल्या संशोधनाचा आपला कस लावावा लागणार आहे.
मानव व प्राणी यांच्यातील असंतुलन…
हे भविष्यातील मानवी जमातीसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तेथेच उच्चशिक्षण क्षेत्रातील विद्यापीठे व संशोधन संस्थांना आव्हानात्मक काम करण्याची संधीही आहे. या सर्वांहून अधिक महत्त्वाची बाब म्हणजे हे असे का घडत आहे याचे मूळ कारण संयुक्त राष्टीय संघाच्या पर्यावरण शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. हे मूळ कारण म्हणजे पर्यावरणामध्ये मानवीय हस्तक्षेप व आक्रमण वाढल्याने पर्यावरणात निर्माण झालेले असंतुलन. त्यातूनच मानव आणि प्राणी यांच्यामधील जैविक संतुलन बिघडलेले आहे. ते संतुलन पुर्नस्थापित करणे व निसर्ग, पृथ्वीचे संरक्षण करणे हे मानवी समाजासमोरचे सर्वात मोठे काम आहे.
तथाकथित मानव प्रजाती नष्ट झाल्यास नवल वाटायला नको…
पर्यावरण व निसर्गाचे संवर्द्धन उपकारासाठी नव्हे, तर मानवी व जीवनसृष्टीच्या रक्षणासाठी हे सक्तीने करावे लागणार आहे. अन्यथा जगातील तथाकथित बुद्धिमान प्राणी जो तुम्ही आम्ही मानव आहोत, तो पुढच्या काही दशकांनी अथवा शतकांनी नष्ट झाला तर नवल वाटायला नको. त्यामुळेच आता शिक्षण क्षेत्रावर फार मोठी जबाबदारी आलेली आहे. मग ते शालेय, माध्यमिक वा उच्च शिक्षण असो. तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्यास आता आपल्याला निसर्ग आणि मानव, पर्यावरण संतुलन, हवामान बदल, जैवविविधता, जंगल रक्षण व संवर्द्धन, प्रदुषण नियंत्रण व हरित सवयी यासंदर्भात जीवन कौशल्य शिकविणारा अभ्यासक्रम शिकवावा लागणार आहे. हे न शिकविल्यास मानवी जमात आत्मनाशक ठरेल. यात काडीचीही शंका नाही.

Vice Chancellor , MGM University

शिक्षक, शिक्षणसंस्थेसमोर आव्हान
कुलुपबंद काळात शाळा, महाविद्यालये तीन ते चार महिने बंद राहिल्यास पर्यायी शिक्षण व दूर शिक्षणाचा विचार व कृती वेगाने वाढलेली आणि आत्मसात केलेली दिसून येत आहे. ज्याला दूरशिक्षण अथवा ओपन अँड डिस्टन्स एज्यकेशन (ओडीई) म्हणतात. उत्तम दर्जाचे शिक्षण सर्वसामान्य माणसाला वाढत्या शुल्कामुळे अशक्यप्राय होत आहे. या काळात मुक्त व दूरशिक्षण एक समर्थ पर्याय म्हणून पुढे येत आहे. डिजिटल तंत्रज्ञान ही संधी नसून ते एक आव्हान झालेले आहे. आजमितीला आभासी शिक्षण, आभासी विद्यापीठ, आभासी प्रयोगशाळा, आभासी महाविद्यालयांची निर्मिती होत आहे. हा प्रवास असाच सुरु राहिला तर थेट शिक्षण देणाऱ्या संस्थांचे भवितव्य काय असेल, याबद्दलची अनिश्चितता जाणवते आहे. आजची व पुढची पिढी ही डिजिटल तंत्रज्ञानाच्या वातावरणात वाढलेली असणार आहे. त्यामुळे पारंपारिक व प्रस्थापित शिक्षण पद्धतीत त्यांना कालबाह्य व योग्य वाटणार नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष विद्यापीठ व महाविद्यालयात शिक्षण देतांना प्रत्यक्ष शिक्षणाचे शिक्षकाद्वारे शिक्षणाचे सामर्थ्य व महत्त्व पटवून द्यावे लागणार आहे. आपल्या अध्यापनाच्या शैलीतून मानवी मैत्रीभाव निर्माण करणारे, फिलॉसॉफर आणि गाईड नव्या काळाचे व तंत्रज्ञानाचे भान असणारे शिक्षक लागतील. कारण, प्रत्यक्ष शिक्षकाकडून शिकणे आणि शिक्षकाच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव मिळणे. त्याचे संस्कार, दृष्टीकोन अजून मानवी प्रभावात आहे. हा प्रभाव तंत्रज्ञानाने काहीही केले तरीही साधता येणार नाही.

शिक्षण औपचारिक की अनौपचारिक?
एकीकडे रोबोट टीचर येताहेत तेव्हा या मानवी वैशिष्ट्यांच्या शिक्षकांनी आपले वेगळेपण जपले पाहिजे, ठसवले पाहिजे व नव्या पिढीवर महत्त्व बिंबवले पाहिजे. तरच शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ ही पुढील काळात मुख्य प्रवाहातील शिक्षण देणाऱ्या संस्था म्हणून टिकतील अन्यथा नाही. आजचे अनौपचारिक शिक्षण उद्याचे औपचारिक शिक्षण झाल्यास संभाव्य धोका समजून घेण्यासाठी हा कोरोनाचा कुलूपबंद काळ पुरेसा आहे. आज जगभरातले दिडशे कोटी विद्यार्थी घरी आहेत. या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत, महाविद्यालयात किंवा विद्यापीठात न गेल्यामुळे अस्वस्थता वाटते आहे का? त्यांच्या जीवनात फारसा फरक पडलाय का? हा ही एक संशोधनाचा विषय आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांशिवाय शाळा व महाविद्यालयांशिवाय अनौपचारिकरित्या ज्ञान संपादन करता येत असेल. हे अनौपचारिक शिक्षण विद्यार्थ्यांना आनंददायी वाटत असल्यास मुख्य प्रवाहाच्या शिक्षण क्षेत्राला कोरोना कुलूपबंद काळाने एक नवे आव्हान उभे केले आहे, असे म्हणता येईल. तरीही शिक्षक, शिक्षण संस्थेतील परिसर, मित्रमंडळी आणि तेथे निर्माण होणोर चैतन्य अशा गोष्टी कोणत्याही विद्यार्थ्याला आकर्षित करायला पुरेशा आहेत. पण काळानुसार आपल्यात योग्य ते बदल करणे हे निसर्गातल्या सर्व घटकांना आवश्यक असते. हे किमान स्वतःला बुद्धिमान प्राणी समजणाऱ्या मानवाला तरी समजायला हवे.

What do you think?

Written by Abhijeet Hirap

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

Corona Update: आनंदवार्ता ; औरंगाबामध्ये आणखी एक महिला कोरोनामुक्त, दोन आठवड्याच्या उपचारानंतर आज रुग्णालयातून डिस्चार्ज

जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे अत्यावश्यक