भारतीय तसेच परदेशी पर्यटकांसाठी पर्वणी ठरणारा वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव यंदा फेब्रुवारी महिन्यांत होणार असून ९ ते ११ फेब्रुवारी या संभाव्य तारखा राहणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.
६ जानेवारीपर्यंत महोत्सव आयोजन समितीकडून बीबी का मकबरा, सोनेरी महल, वेरुळ तसेच कलाग्राम या कार्यक्रमस्थळांना भेटी देण्यात येऊन आवश्यक त्या मंजुरी घेण्यात येतील. या संदर्भात ६ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात येऊन महोत्सवाची निश्चित तारीख ठरवण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी सांगितले.
शासनाने औरंगाबाद जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे. अजिंठा-वेरूळ यासारखी जगप्रसिद्ध स्थळे जिल्ह्यात आहेत, तसेच बिबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, म्हैसमाळ, पानचक्की अशी अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी वेरूळ-अजिंठा महोत्सव आयोजित करण्यात येत होता. मात्र काही कारणास्तव या महोत्सवाच्या आयोजनाकडे दुर्लक्ष केले गेले होते मात्र गेल्यावर्षी तत्कालिन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी पाठपुरावा करून वेरूळ-अजिंठा महोत्सवाच्या आयोजनाची खंडित परंपरा पुन्हा सुरू केली होती.
कमी खर्चात यंदाचा महोत्सव
गेल्यावर्षी शहरात आयोजित करण्यात आलेल्या वेरुळ महोत्सवासाठी ३ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता मात्र यंदा महोत्सवाच्या खर्चाला कात्री लावण्याचा प्रशासन विचार करत आहे. मोठ्या कलाकारांनी या महोत्सवात कमीत कमी मानधनात हजेरी लावावी. यासाठी आवाहन करण्यात येईल. खर्च मोठा असल्यामुळे पैसेविरहित महोत्सव व्हावा, अशा नियोजनावर भर देण्यात येत आहे. कलाकारांनी स्वत:हून हजेरी लावल्यास मोठी मदत होऊ शकेल. खर्चाचे नियोजन करणे अवघड आहे. त्यामुळे प्रायोजक व इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी ६ जानेवारी रोजी होणाºया बैठकीत महत्त्वाचा निर्णय होईल, असे आयुक्त म्हणाले.