उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता उद्योगमंत्री देसाई

0
148
उद्योगक्षेत्राला शिक्षणक्षेत्राची जोड महत्त्वाची आहे. या शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याने उद्योगक्षेत्रात सातत्याने संशोधनाची आवश्यकता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केले. तरुणांनी उद्योजक होण्यासाठी संशोधनावर भर देऊन उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीइएस) अभियांत्रिकी महाविद्यालयात चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि ॲग्रीकल्चर (सीएमआयए) च्यावतीने आयोजित चौथ्या ‘एनर्जी   कॉन्क्लेव्ह 2018 ’ मध्ये  श्री. देसाई बोलत होते. यावेळी पीइएसचे  प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, सीएमआयएचे अध्यक्ष प्रकाश कोकील, डॉ. बी.एन. चौधरी, राहुल देशपांडे यांची उपस्थिती होती.

श्री. देसाई म्हणाले, राज्य शासनाने नुकतेच महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात 25 हजारकोटींच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष गाठण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले.

सध्या राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यातून  प्रदूषण होते आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिती व वापराला प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्राने इ-व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. केंद्र सरकारने 2030 पर्यंत इलेक्ट्रिक व्हेईकल नेशन घडविण्याचा निर्धार केला आहे. या धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी लागणारी वीज निवासीदराने आकारण्याचा समावेश आहे.  या वाहनांना रस्तेकर, नोंदणी शुल्क पूर्णत: माफ असणार आहे. दुचाकी, तीनचाकी, कार आणि बसेससाठी विद्युत वाहन सार्वजनिक जलद चार्जिंग केंद्राच उपकरणे – यंत्रामध्ये गुंतवणुकीच्या 25 टक्के भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. राज्यात नोंदणी झालेल्या पहिल्या एक लाख इलेक्ट्रिक वाहनांसाठी खाजगी वाहतूक आणि वाहतूक खरेदीदारांना धोरणाच्या कालावधीत अंतिम वापरकर्ता अनुदान देखील मिळणार असल्याचेही श्री. देसाई म्हणाले.

मराठवाड्यातही अधिकाधिक प्रमाणात चांगले उद्योग येतील, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. औरंगाबादेत निर्मित होत असलेली ऑरिक सिटी आदर्शवत अशी भारतातील सर्वोत्कृष्ट उद्योगनगरी असेल, असेही श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले. औरंगाबादेतच असलेल्या इंडो- जर्मन टूल रूमला आज भेट दिली. या माध्यमातून दरवर्षाला 10 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते. सिपेट, विविध क्लस्टर यांच्या माध्यमातूनही उद्योग वाढीसाठी  पूरक प्रयत्न होत असल्याचे सांगत डॉ. देसाई यांनी आनंद व्यक्त केला.

राज्याच्या इ-व्हेईकल धोरणाबाबत बदल, सूचना, सुधारणा करावयाचे असतील तर त्या सूचविण्याचे स्वागत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधानही श्री. देसाई यांनी केले. परिषदेसाठी आयआयटीचे प्रोफेसर के.मुन्शी, इलेक्ट्रिककारचे संस्थापक डॉ. रुशेन चेहल, डिजीटल सोल्यूशन ग्रुपच्या प्रमुख मिताली मिश्रा यांची यावेळी उपस्थिती होती. सीएमआयएचे श्री. कोकीळ, पीइएसचे डॉ. वाडेकर यांनी विचार मांडले. सूत्रसंचालन राहुल देशपांडे यांनी  केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here