घाटीची दुरावस्था दर्शवणारा व्हायरल फोटो आणि त्यामागची कारण
आजारी वडिलांसाठी मुलीला हातात धरावी लागली सलाईनची बाटली. व्हायरल फोटोमुळे घाटीची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली.
कर्मचारी स्टँड आणेपर्यंत 5 मिनिटांसाठी मुलीने सलाईनची बाटली धरली होती, घाटी प्रशासनाचा खुलासा
गेल्या दोन दिवसात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोने पुन्हा एकदा घाटीची बिकट अवस्था सर्वांसमोर आली आहे. ऑपरेशन थियटरमधून वार्डमध्ये नेताना डॉक्टरांनी सलाईनची बाटली पेशंटच्या मुलीच्या हातात दिली. वार्डमध्ये आल्यावरसुद्धा आयव्ही स्टँड नसल्यामुळे, मुलीला सलाईनची बाटली हातातच धरावी लागली. कोणीही स्टँड आणून देत नसल्याचे बघून तिच्या भावाने बाजूच्या वॉर्ड मधून स्टँड आणला. अर्धा तास सलाईनची बाटली हातातच धरून उभी असणाऱ्या त्यांची होणारी गैरसोय तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने कॅमेरात टिपली.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यावर घाटी प्रशासनाने यावर खुलासा देण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी स्टँड आणेपर्यंत 5 मिनिटांसाठी मुलीने सलाईनची बाटली धरली होती. तेवढ्या वेळात फोटो काढण्यात आला, असे घाटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
मात्र, कर्मचाऱ्यांची अपुरी व्यवस्था लक्षात घेता हा प्रकार नेहमीच घडत असतो, यात काही नवीन नाही अश्या प्रतिक्रिया घाटीची कामकाज जवळून बघणाऱ्या व्यक्तिंनी दिल्या.
घाटीच्या या अवस्थेची जवाबदार कोण? येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता कर्मचारी भरती का करण्यात येत नाही? चिकलठाणा येथे 2 वर्षांपासून तयार असलेल्या पण चालू न झालेल्या रुग्णालयाचे भविष्य काय? चिकलठाणा येथील सिविल हॉस्पिटलमुळे घाटावर पडणारा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल, प्रशासन यावर तात्काळ निर्णय घेईल का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर आली आहेत.
GIPHY App Key not set. Please check settings