गुजरात डायरी : इलेक्शन २०१७
by Shrikant Deshpande
१४ डिसेंबर | औरंगाबाद
‘विकास गांडो थयो छे’ विरुद्ध ‘हूं छु विकास, हूं छु गुजराथ’
यंदाची ‘गुजरात निवडणूक ‘ सर्वार्थानं गाजते आहे.’विकास गांडो थयो छे’ विरुद्ध ‘हूं छु विकास, हूं छु गुजराथ’ ची घोषणा, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर,जिग्नेश मेवाणी या HAJ हज (हार्दिक अल्पेश, जिग्नेश मेवानी) फॅक्टर नक्की काय परिणाम घडवू शकतो,गुजरातेतला मतदार नक्की काय विचार करतोय याचा शोध घेण्याच्या उत्सुकतेतून गुजरातला जायचं नक्की केलं. माध्यमातून, आणि खासकरून समाजमाध्यमातून जे चित्र रंगवल्या जातंय की या तीन तरुणांनी भाजपाच्या नाकात दम आणलाय. पाटीदार अनामत आंदोलन समिती मुळे भाजपा अडचणीत सापडलाय त्याच बरोबर गोरक्षकांनी केलेली उनाची दलित मारहाण प्रकरण, अल्पेश ठाकोर यांनी उभारलेले ओबीसी आंदोलन यामुळे गुजरात ढवळून निघालाय. त्याचबरोबर काँग्रेसने आणि खासकरून राहूल गांधींचे देवदर्शन करून सॉफ्ट हिंदुत्वाच्या वाटेवर असल्याचे संकेत,पंतप्रधानांना गुजरातेत तळ ठोकून घ्याव्या लागत असलेल्या ३० ते ३५ सभा. या सगळ्या गोष्टी गुजरात निवडणूक आजवरच्या निवडणुकीत सर्वार्थाने वेगळी ठरते आहे. या पाश्र्वभूमीवर ही निवडणूक आपण जवळून पाहिलीच पाहिजे. यासाठी एक ते आठ डिसेंबर दरम्यान दक्षिण गुजरात, उत्तर गुजरात, सौराष्ट्र या भागांचा दौरा केला. या संपूर्ण प्रवासात सर्वसामान्य मतदारांच्या बरोबरीने विविध पक्षांचे नेते व पत्रकार,राजकीय अभ्यासक व प्राध्यापक यांच्या भेटी घेऊन गुजरातेत सध्याची परिस्थिती नक्की काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अॅन्टी इंन्कबंसीचा धोका
१९९५ पासून गुजरातमध्ये भाजपाचे सरकार सत्तेवर आहे. तर २००२ पासून ते २०१४ पर्यंत सलग १२ वर्षे नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते. या संपूर्ण काळात नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलचा देशभर बोलबाला झाला. हे गुजरात मॉडेल नक्की काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. हि निवडणूक जवळून पाहताना अनेक गोष्टी जाणवल्या. कुठल्याही एका पक्षाची सत्ता सलग वीस-पंचवीस वर्षे असेल तर स्वाभाविक तिथे अॅन्टी इंन्कबंसीचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. गुजरातमध्येही ती शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. १९९५ ते २०१४ च्या लोकसभा निवडणूकीपर्यंत भाजपा व काँग्रेस यांना मिळणाऱ्यामतांची टक्केवारी पाहता या दोन्ही पक्षांमध्ये कायम ९ ते १० टक्क्यांचा फरक राहिलेला आहे. अपवाद फक्त २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूकीचा. जिथे हा फरक २६ टक्के होता. विधानसभा निवडणूकीत या १० टक्क्यांच्या फरकाने भाजपाला काँग्रेसपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या व भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होत राहिली. यामागे जसा भाजपाच्या निवडणूक रणनितीचा भाग होता तसा काँग्रेसच्या काही घोडचुकांनीही भाजपाला सत्तेत येण्यास मदत केली, असे म्हणणे चुकीचे ठरु नये. उदाहरण द्यायचे झाल्यास `मौत का सौदागर’ हे विधान असेल किंवा `खुन की दलाली’ हे विधान असेल या विधानांचा पुरेपूर राजकीय लाभ भाजपने व खासकरुन नरेंद्र मोदी यांनी उचलल्याचे मागील निवडणूकांवरुन दिसून येते. त्यामुळे यावेळी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कुणीही वादग्रस्त वक्तव्य करु नये अशा लेखी व तोंडी सुचना दिल्या होत्या. मात्र मतदानाच्या पहिल्या टप्प्याला अवघे दोन दिवस बाकी असतांना मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांसाठी `नीच’ हा शब्द वापरुन भाजपला नवसंजिवनी दिली असे माझे एकंदर मत बनले.
शहरी विरुद्ध ग्रामीण
या संपूर्ण निवडणूकीच्या दरम्यान `विकास गांडो थयो छे’ विरुध्द `हुं छु विकास, हुं छु गुजरात’ चे नारे बुलंद होते. गुजरामध्ये खरोखरच विकास झाला आहे काय? गुजरातची जातीय समीकरणे जी आजवर भाजपला अनुकूल होती (ज्यात पटेल समाजाचा भाजपकडे असलेला एकतर्फी कल) संपूष्टात येऊन हा समाज काँग्रेसमागे जाऊ शकेल अशी स्थिती खरोखरच आहे काय? असे अनेक प्रश्न घेऊन मी हि शोधयात्रा केली. विकासाचा विचार करता गुजरात हा महाराष्ट्राच्या किमान दहा वर्ष पुढे आहे, हे मान्य करावे लागेल. उत्तम रस्ते (आपल्याकडचे रस्ते पाहिल्यानंतर उत्तम रस्ते हेच विकासाचे मॉडेल हे मी मनोमन मान्य करुन टाकले),वीजेची उपलब्धता, गुन्हेगारीचे कमी असलेले प्रमाण,उद्योगधंद्यांमध्ये घेतलेली आघाडी, गुंतवणूकदारांसाठी अंथरलेले रेड कारपेट, नर्मदेचे पाणी थेट कच्छच्या आखातात पोहचविण्याची केलेली व्यवस्था यासर्व बाबी गुजरातेत चौफेर विकास झाल्याचे निदर्शक आहेत. पण… `आहे मनोहर तरीही गमते उदास’ या ओळींप्रमाणे गुजरातमध्ये हि संपन्नता प्रामुख्याने शहरी भागात दिसते. ग्रामीण भागातला शेतकरी शेतमालाला भाव नसल्याने मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. शेती व्यवसाय हा आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे अशी सार्वत्रिक भावना दिसून आली. व हा शेतकरी प्रामुख्याने पाटीदार समाजातून येतो हे लक्षात घेतले म्हणजे हार्दिक पटेल याच्या आरक्षणाच्या मागणीला पाटीदार समाजातून मोठ्या प्रमाणावर समर्थन का मिळते हे लक्षात येईल.
या निवडणूकीत एक फरक स्पष्टपणे दिसून येतो की, शहरी भागात भाजपचे वर्चस्व आजही कायम आहे, मात्र ग्रामीण भागात काँग्रेसला पसंती देणारा मतदार अधिक संख्येने आढळून आला. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी ९८ जागा ग्रामीण भागातून येतात. मागील वेळी २०१२ च्या विधानसभा निवडणूकीत ९८ पैकी काँग्रेसला ४२.१ मत टक्क्यांसह ४९ जागी विजय मिळाला होता. भाजपाला ४२.९ टक्क्यांसह ४४ जागी विजय मिळाला होता तर ५ जागी अन्य उमेदवार विजयी झाले. गुजरात विधानसभेच्या निमशहरी भागातून ४५ जागा येतात यापैकी भाजपाला ४९ टक्के मते मिळून ३६ जागी विजय मिळाला होता तर काँग्रेसला ३७.१ टक्के मतांसह ८ जागी विजय मिळाला होता तर एका जागी अन्य उमेदवार विजयी झाला. गुजरात विधानसभेत शहरी भागातून ३९ जागा येतात मागील वेळी ५९.५ टक्के मते मिळवून भाजपा ३५ जागी विजयी झाली तर काँग्रेस ३२.८ टक्के मते घेत ४ जागी विजयी झाली होती. शहरी व निमशहरी भागात भाजपाचे वर्चस्व आजही आहे तर ग्रामीण भागात भाजपाला अॅन्टी इंन्कबंसीचा सामना करावा लागू शकतो अशी परिस्थिती दिसून येते आहे.
HAJ फॅक्टर आणि जातीय समीकरणे
या निवडणूकीत काँग्रेस, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर या समीकरणाच्या बळावर निवडणूकीला सामोरी जात आहे. मात्र जमिनीवर कार्यकर्ताचा अभाव, आधुनिक निवडणूक यंत्रणेचा अभाव, बुथनिहाय कार्यकत्र्यांची फळी उभारण्यात आलेले अपयश व याविरुध्द भाजपाकडे असलेली कार्यकर्त्यांची फळी, बुथनिहाय यंत्रणा, आपला हक्काचा मतदार ओळखून तो निश्चित करुन त्याला मतदानकेंद्रापर्यंत नेण्याची व्यवस्था व निवडणूकीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या भाजपाच्या जमेच्या बाजू आहेत. आज जातीय समीकरणे काँग्रेसला अनुकूल आहेत मात्र आजवर दलित व ओबीसींपैकी ठाकोर समाज कायम काँग्रेससोबत राहिला आहे तर आदिवासी समाज काँग्रेसकडून भाजपाकडे सरकताना दिसत आहे. संपूर्ण पटेल समाज काँग्रेसकडे जाईल अशी शक्यता कमी आहे. मात्र पाच टक्के मतांचा शॉर्टफॉल भाजपाला सत्तेपासून वंचित करु शकतो हि वस्तूस्थिती आहे. त्यामुळे भाजपानेही नवीन समीकरणे तयार करण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे व त्यात काही अंशी यश येऊ शकेल अशी परिस्थिती आहे. क्षत्रिय समाजाचा कल भाजपाकडे असल्याचे जाणवते. मतदारांमध्ये असलेली अॅन्टी इंन्कबंसी मतपेटीत परावर्तीत करणे हे काँग्रेसपुढील मुख्य आव्हान असेल जर तसे करण्यात काँग्रेसला यश आले तर गुजरातमध्ये सत्ता परिवर्तन अटळ आहे. मात्र गृहराज्यात पराभव म्हणजे २०१९ च्या पतनाची नांदी ठरु शकते हे हि बाब अमित शहा पक्के जाणून आहेत.
आजवरच्या गुजरातच्या निवडणूका या धार्मिकध्रुवीकरण झाल्या. विकास हा मुद्दा होताच मात्र यावेळी पहिल्यांदाच जातीय समीकरणे प्रबळ होताना दिसत आहे. माधवसिंह सोलंकी मुख्यमंत्री असताना त्यांनी खाम (KHAM) समीकरणाने १४९ जागांवर विजय मिळविला होता. हा रेकॉर्ड आजही अबाधित असून कुठल्याही पक्षाला एवढ्या जागा आजवर मिळविता आल्या नाहीत. या खाम समीकरणात K – क्षत्रिय, H – हरिजन, A – आदिवासी व M – मुस्लिम समाविष्ट होते. पाटीदार समाज यात कुठेही नव्हता. १९९५ पासून पाटीदार समाज एकतर्फी भाजपाच्या बाजूने उभा ठाकला. व हे समीकरण संपूष्टात येऊन भाजपाची एकहाती सत्ता येत गेली. मात्र २०१५ नंतर प्रथमच पाटीदार समाज काही प्रमाणात काँग्रेसकडे गेल्याचे चित्र आहे. २०१५ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकात सहा महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता आली म्हणजे शहरी भागात भाजपाचा प्रभाव कायम राहिला. मात्र ग्रामीण भागात झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकांत भाजपाचे पानिपत होऊन बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसची सत्ता आली. हि बाब काँग्रेससाठी एक प्रकारची नवसंजिवनी ठरली.
निकालाचा अंदाज
जर मतदारांनी ठरविले की, भाजपाचा पराभवच करायचा तर कुठल्याही यंत्रणेची गरज काँग्रेसला पडणार नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या २०१४ च्या निवडणूकीत जसे मतदारांनी सत्ता परिवर्तन करायचे ठरवूनच मतदान केले, अनेक ठिकाणी भाजपाचे उमेदवार नवखे होते, अपरिचित होते, अन्य पक्षातून ऐनवेळी आले होते. मात्र जनतेने स्वत:हुन घराबाहेर पडत परिवर्तनासाठी मतदान केले. असेच गुजरातमध्ये घडेल काय ? हा मोठा प्रश्न आहे. मात्र एकंदर मी, जिथे जिथे फिरलो, मतदारांशी बोललो त्यावरुन मतदार भाजपावर नाराज आहे हे जाणवले. मात्र हि नाराजी मतांमध्ये परावर्तीत होईल असे मला व्यक्तीश: वाटत नाही. कारण काँग्रेसला मतदान करु असे म्हणणाऱ्यानाही गुजरातेत भाजपाचीच सत्ता येईल असे वाटत असल्याचे ठाम सांगितले. पहिल्या टप्प्यात २०१२ च्या तुलनेत कमी झालेले मतदानही या मताला पुष्टी देणारे आहे. माझा अंदाज असा आहे की, भाजपाला गुजरातेत ९६ ते ११० जागी विजय मिळेल तर काँग्रेस ७० ते ८० च्या घरात असेल. अर्थात यासाठी १८ डिसेंबरचीच वाट पहावी लागेल.
Author Details
Name: Shrikant Deshpande
Phone-: 8007315418
Email: shrikantdeshpande7573@gmail.com
( Author of the article is renowned political analyst from Maharashtra)
GIPHY App Key not set. Please check settings