‘Hell-मेट’मय यातना!!

औरंगाबादमध्ये वाहतूक पोलीस सध्या फक्त आणि फक्त हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वाराला पकडण्यास प्राधान्य देत आहेत. त्यालाही आमची काहीच हरकत नाही. कायदाआहे, तो पाळायलाच हवा, न पाळल्यास कारवाई व्हायलाच हवी. पण.. वाहतूक पोलिसांचे काम फक्त बिना हेल्मेटवाला दिसला की पकड... इतकेच काम नसावे.

0
751

औरंगाबादमध्ये हेल्मेट सक्ती होवून दोन वर्षे उलटून गेली. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांनी ही सक्ती अंमलात आणो अथवा न आणो. आम्ही औरंगाबादकरांनी ती तंतोतंत पाळली. आता औरंगाबादच्या दुचाकी चालकांना बऱ्यापैकी या हेल्मेटची सवय झाली आहे. अर्थात ही सवय लावण्यासाठी पोलीस विभागाचे आभार मानायला हवे. मात्र औरंगाबादमध्ये वाहतूक पोलीस सध्या फक्त आणि फक्त हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वाराला पकडण्यास प्राधान्य देत आहेत. त्यालाही आमची काहीच हरकत नाही. कायदाआहे, तो पाळायलाच हवा, न पाळल्यास कारवाई व्हायलाच हवी. पण.. वाहतूक पोलिसांचे काम फक्त बिना हेल्मेटवाला दिसला की पकड… इतकेच काम नसावे, असे वाटते. त्याकडे बहुतेक वेळा सोयीस्कररित्या दुर्लक्ष होते. मुद्दा हा आहे कि, फक्त हेल्मेट न घालणारेच दोषी नसतात.याव्यातारिक्त वाहतुकीचे असंख्य प्रश्न आहेत. ज्याकडेही वेळात वेळ काढून वाहतूक पोलिसांनी लक्ष दिल्यास अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.अर्थातच याकामी नागरिकांचेही सहकार्य तितकेच महत्वाचे…

१) त्यापैकी सर्वात पहिला प्रश्न म्हणजे सिडको ते बाबा पेट्रोल पंप दरम्यान सिडको, हायकोर्ट, आकाशवाणी, अमरप्रीत, क्रांती चौक आणि बाबा पेट्रोल पंप हे प्रमुख सिग्नल लागतात.यातील बहुतांश सिग्नलच्या डाव्या बाजूला barigates लावलेले आहेत.माझ्या मते हे barigates डाव्या बाजूला जाणाऱ्या वाहनासाठी लावलेले असावेत, त्याचबरोबर इमर्जन्सी वाहनांना जाता यावे यासाठी त्याचा वापर होऊ शकतो, असा माझा समज आहे.अगोदरच हे barigates जवळपास फुटपाथला (अस्तित्व हरवलेल्या) लागून लावलेले आहेत. त्यामुळे मिळेल तिथून वाहनांना रस्ता काढावा लागतो. बहुतांशवेळा सरळ अथवा डाव्या बाजूला जाणारी वाहनेसुद्धा barigatesच्या आत येतात. त्यामुळेइतर वाहनांना अडथला निर्माण होतो. ही barigates मूळ हेतूसाठी वापरल्या गेल्यास वाहतूक सुरळीत होऊ शकेल अथवा मदत होईल.

२) जालना रस्त्यावर सकाळी ९ ते १ आणि सायंकाळी ५ ते ८ दरम्यान चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठी गर्दी असते.यावेळी प्रत्येकाला लवकर जाण्याची घाई असते. अशावेळी मिळेल तिथून विशेषत: दुचाकी वाहने रस्ता काढून समोरच टोक गाठतात. योग्य संधी साधून ही दुचाकी वाहने सिग्नल तोडून पसार होतात.मात्र त्याकडे किंचितही लक्ष दिले जात नाही. वाहनांनी रांगेची शिस्त पाळल्यास सिग्नल न तोडताहीकमी वेळेत आणि सुरक्षित घरी जाता येईल. या वाहनधारकावर काही कारवाई अथवा सुसूत्रता आणली जाईल का?

३) जालना आणि जळगावरोडवर अनेक ठिकाणी रॉंग साईडने जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.या रॉंग साईडने जाणाऱ्या वाहनामुळे इतर वाहनांना अडथला होतो.रॉंग साईडने जाणाऱ्या वाहनाविरोधात कधीही कडक कारवाई होतांना दिसत नाही.कारवाई झाल्यास औपचारिकता अधिक वाटते.त्याने किरकोळ अपघात असंख्य होतात. मोठा अपघात झाल्याखेरीज हे अपघात कोणत्याही कागदावर येत नाहीत.

४) प्रामुख्याने सिडको चौकात एपे रिक्षांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्याठिकाणी मागील वर्षी मोठा अपघात झाला होता. यात दोघांना जीव गमवावा लागला होता.मात्र ती कोंडी सोडविण्यासाठी अद्याप कोणालाही प्रामाणिक प्रयत्न आवश्यकता वाटली नाही. सिडकोप्रमाणेच कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती शहरातील अनेक चौकात आहे. या रिक्षावर चाप बसविणे आतापर्यंत सर्वांनाच अशक्य झालेले आहे. त्यांची अर्वाच्च भाषा आणि वर्तवणूक हा वेगळा मुद्दा ठरू शकतो. काही प्रमुख चौकात सायंकाळी सहानंतर मद्याची दुकाने सजतात. त्यामुळे होणारी माणसांची आणि वाहनांची गर्दी कमी झाल्यास अधिक चांगले होईल असे वाटते.

५) प्रामुख्याने बँक, हॉस्पिटल आणि मार्केटमध्ये लावलेली वाहने वाहतूक पोलिसाकडून सर्रासपणे उचलली जातात. तो तुमचा अधिकार आहे. मात्र, पार्किंगला जागा देण्याचीही सूचना तुम्ही संबंधित महापालिका, बँक, रुग्णालय अथवा बाजारपेठ यांना करावी. जर त्यांनी पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून न दिल्यास त्या संबंधितावर कारवाई करा. त्यापलीकडे जाऊन वाहनधारक नियमांचा भंग करीत असल्यास तुम्ही जरूर दंडात्मक कारवाई करावी.विशेष म्हणजे वाहन उचलतांना ती काळजीपूर्वक उचलली जात नसल्याचा अनुभव मी स्वत: घेतलाय. साईड मिरर तुटल्याने २०० रुपयांचा भुर्दंड सहन केलाय.

(टीप: बघा जमतंय का.. आम्ही आमच्या परीने नियमांचे पालन करतो आहोतच,जे नियम पाळत नाहीत त्यांना शिस्त लावण्याचे काम तुमचेच आहे. नाहीतर’Hell-मेट’मय यातनाऔरंगाबाद्कारांच्या पाचवीला पुजलेल्या आहेतच.)

Previous articleऔरंगाबाद शहरातील कचऱ्याचा प्रश्न कृतीबध्द कार्यक्रमानुसार मार्गी लावा- मुख्य सचिवांचे निर्देश
Next articleState to frame tourism policy; An independent tourism plan has been created and ₹440 crore allocated for Aurangabad: Tourism Minister

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here