लोकांना माहिती देऊन, लोकजागृती धडविण्याचे कार्य वृत्तपत्रे करतात. एवढेच नव्हे तर लोकांना आपले कर्तव्य पालन करण्यास ती प्रवृत्त करतात. बदलत्या जगात वृत्तपत्रापुढील विविध प्रश्नांचे, आव्हानांचे स्वरूपही बदलत जाते. नव्या सामाजिक व्यवस्थेसाठी संघर्ष करतांना वृत्तपत्रांनी केलेल्या प्रबोधनाच्या पाऊलखुणा या समाजाला मार्गदर्शक ठरत असतात.
मराठवाड्यातील वृत्तपत्रांनी समाजाला दिशा देण्याचे कार्य प्रारंभापासून कसे केले आहे हे पाहणे उदुबोधक ठरेल. मराठवाड्यातील वृत्तपत्र सृष्टीच्या वाटचालीचा मागोवा घेता येथील पत्रसृष्टीला वळण देणारे पाच मोलाचे दगड दृष्टीपथात येतात. या टप्प्यावरुन मराठवाड्यातील वृत्तपत्राच्या विकासाच्या चार कालखंडात विभागणी करता येईल. हे कालखंड असे.
पहिला कालखंड (१८८६ ते १९३६)
दुसरा कालखंड (१९३७ ते १९५७)
तिसरा कालखंड (१९५७ ते १९८१)
चौथा कालखंड (१९८२ ते १९९८- २००० पर्यंत)
पहिला कालखंड (१८८६ ते १९३६ )
मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचे लेखन करणारे रा.के. लेले, रा.गो. कानडे सारखे वृत्त इतिहासकार, न्या. नरेंद्र चपळगावकर, स.मा. गर्गे, डॉ. सुधाकर पवार, द.पं. जोशी, डॉ. वि.ल. धारुरकर सारख्या जाणकारांनी केलेल्या लेखनावरुन एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मराठवाड्यात मराठी वृत्तपत्रांचा उदय झालेला नव्हता ही बाब स्पष्ट होते. १८८६ मध्ये ‘औरंगाबाद समाचार’ हे वृत्तपत्र सुरु होईपर्यंत हैद्राबाद-मराठवाडा प्रांतात इंग्रजी व उर्दू पत्रेच प्रामुख्याने निघत होती, त्यामुळे औरंगाबाद समाचाराच्या जन्मापासूनच मराठवाड्यातील वृत्तपत्रसृष्टीचा पहिला कालखंड सुरु झाला असे मानने उचीत होईल. मराठवाडा प्रदेशात ज्या वृत्तपत्राचा अभिमानाने उल्लेख करता येईल. असे वृत्तपत्र म्हणजे “निजाम विजय’ होय. अत्यंत विषम परिस्थितीत आणि मराठी भाषा बोलणाऱ्या ३२ लाख जनतेसाठी अव्याहत वीस वर्षे हे चाललेले स्वातंत्र्यपूर्व काळातील हे एकमेव वृत्तपत्र होते.
दुसरा कालखंड (१९३७ ते १९५७)
१९३८ साली कै. आ.कृ. वाघमारे यांनी सुरु कलेल्या ‘मराठवाडा’ साप्ताहिकाने मराठवाड्याच्या वैचारिक जीवनात एक नवा कालखंड सुरु झाला . संस्थांनी प्रजेच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कै, आ.कृ. वाघमारे यांनी वृत्तपत्र सुरु करण्याचे धाडस केले. निजामशाहीच्या दडपशाही धोरणावर कुरघोडी करण्यासाठी कै. वाघमारे यांना हे साप्ताहिक नवे नवे नाव देऊन. अकरा वेगवेगळ्या नावानी काढावे लागले, अवघ्या दहा महिन्यात वेगवेगळ्या नावानी हे साप्तांहिक काढण्याचा कै. आ.कृ. वाघमारे यांचा प्रयत्न वृत्तपत्रसृष्टीत एक विक्रमच आहे. ‘साप्ताहिक मराठवाडा’ व आ.कृ. वाघमारे यांचे नाव मराठवाडा मुक्ती संग्रामाशी अभिन्नपणे निगडीत आहे.
तिसरा कालाखंड १९५८ ते १९८१
मुक्ती संग्रामानंतर १९४८ मध्ये हैदराबाद संस्थानातून मराठवाडा अलग झाल्यानंतर मराठवाड्यासमोर स्वत:च्या विकासाच्या अनेक समस्या होत्या. मुक्ती संग्रामात सहभागी झालेले कार्यकर्ते व लोकनेते ही जुळवाजुळव करीत असतानांच ३ डिसेंबर १९५९ रोजी मराठवाड्यात अजिंठा दैनिकाचा प्रारंभ झाला.
मराठवाड्यातील पहिले दैनिक म्हणून या पत्राचा उल्लख करावा लागेल ‘अजिंठाच्या आगमनाने मराठवाड्यातील वृत्तपत्र सृष्टीला बळकटी आली. अजिंठ्याचा शुभारंभ मराठवाड्यातील वृत्तपत्रसृष्टीला वेगळे वळण देणारा आहे. ह्या कालखंडात मराठवाडा साप्ताहिकाचे रुपांतर दैनिकात झाले. संपूर्ण मराठवाड्यात १९८२ पर्यंत म्हणजे लोकमतच्या आगमनापर्यंत तब्बल चार दशकाहून अधिक काळ ‘अजिंठा आणि ‘मराठवाडा’ या दोनच दैनिकांचे अधिराज्य होते. या दोन वृत्तपत्राच्या वाटचालीचा आढावा या कालखंडात घेतला आहे.
चौथा कालखंड १९८२ ते २०००
मराठवाड्यातील पत्रकारितेला दैनिक लोकमतच्या ९ जानेवारी १९८२ च्या आगमनानंतर एक नवे परिमाण प्राप्त झाले. अत्याधुनिक साधनांनी वृत्तपत्रसृष्टी समृद्ध, संपन्न बनली आणि वृत्तपत्र सृष्टीचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलून गेला.
(क्रमशः)
Source:
मराठवाड्यातील वृत्तपत्रे : एक चिकित्सक अभ्यास
प्रकरण चौथे
GIPHY App Key not set. Please check settings