भाभाट्रॉन-२ युनिटमुळे कर्करोगाच्या रुग्णांना अद्ययावत व जलदगतीने उपचार मिळण्यास मदत होणार असल्याने औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालय हे कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जे.पी. नाड्डा यांनी आज व्यक्त केला.
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय येथे भाभाट्रॉन -२ युनिटचे उदघाटन आणि राज्य कर्करोग संस्था इमारतीच्या इमारतीचे भूमीपूजन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, आमदार सुभाष झांबड, आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. एस.के. शर्मा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव संजय देशमुख, सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, सहसचिव सुरेश बारपांडे, माजी महापौर भागवत कराड, नवदिप यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय आरोग्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, औरंगाबाद येथील कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाल्याने तसेच भाभाट्रॉन-२ युनिट कार्यान्वित झाल्याने मराठवाड्यासह आजुबाजूच्या जिल्ह्यातील कर्करोग रुग्णांना याचा लाभ होणार आहे. औरंगाबाद येथील कर्करोग रुग्णालयात अद्ययावत साधनसामुग्री उपलब्ध झालेली आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी रिक्त पदे भरण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचे वेळीच निदान झाले तर तो वेळीच बरा होऊ शकतो. यासाठी केंद्र आणि राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहे. यासाठी देशात आणि राज्यात विविध ठिकाणी कर्करोग निदान व उपचार केंद्रे सुरु करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या ‘आयुष्यमान भारत’ अभियानांतर्गत देशातील दीड लाख आरोग्य केद्रांना ‘वेलनेस सेंटर’ मध्ये रुपांतरीत करुन नागरिकांची युनिव्हर्सल स्क्रिनिंग करणार आहोत. या माध्यमातून गर्भाशय, स्तन, मुख, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या कर्करोगाची पुर्वतपासणी करण्यात येणार असल्याने कर्करोग रुग्णांना दिलासा मिळणार आहे. देशात कर्करोग रुग्णांचे प्रमाण वाढत असून अशा रुग्णांना स्वस्त उपचार पध्दती देण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
शासन नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द आहे. पण नागरिकांनीही आपल्या आरोग्याप्रती जागरुन राहण्याची अपेक्षा व्यक्त केली.
विधानसेभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, माणसाने चांगले दिसण्याबरोबरच चांगल्या आरोग्यासाठी जागरुक असले पाहिजे. त्यासाठी आहार व व्यायाम आवश्यक आहे. आरोग्यासंदर्भातील जनजागृतीसाठी नागरिक म्हणून त्यांचे कर्तव्य पार पाडावे. औरंगाबाद येथे उपलब्ध झालेल्या कर्करोगाच्या उपचारांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले
GIPHY App Key not set. Please check settings