in

किलेअर्क: वैभवशाली इतिहास आणि भग्न वर्तमान!!

किलेअर्क: वैभवशाली इतिहास आणि भग्न वर्तमान!! By Sanket Kulkarni

मुघल शहजादा औरंगजेब 1653 मध्ये दुसऱ्यांदा सुभेदार म्हणून दख्खनेत आला. त्यावेळच्या “फतेहनगर’लाच त्याने मुख्य ठाणे निश्‍चित करून त्याचे नाव “औरंगाबाद’ केले. राहण्यासाठी किलेअर्क बांधला. आमखासपासून सुभेदारीपर्यंत पसरलेला हा किल्लेवजा भाग चहुबाजूंनी बंदिस्त तटबंदीने सुरक्षित केलेला होता. त्याला रंगीन दरवाजा, काळा दरवाजा, नौबत दरवाजा, आमखास दरवाजा आणि आदिल दरवाजा अशी पाच प्रवेशद्वारे होती. हिमायत बागेला पाठीशी ठेवून विस्तीर्ण परिसरात मर्दाना महाल, जनाना महाल, मोती मस्जिद, जनाना मस्जिद, कचेरीच्या इमारती, पामेर कोठी, आदिल कोठी, रंगबारी, नहरी, कारंजी, बागबगीचे असे एकापेक्षा एक सुंदर स्थापत्य असलेल्या इमारती बांधल्या.

बादशहा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर निजाम उल मुल्क आसफजहा याने स्वतःची राजवट घोषित करीत या संपूर्ण भागावर आपला अंमल घोषित केला. किलेअर्क तेव्हापासून 1948 पर्यंत निजामाच्या ताब्यात राहिला. 1923 मध्ये या इमारतींमध्ये इंटरमिजिएट कॉलेज स्थापन झाले. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा शंखनाद करणारे वंदे मातरम्‌ आंदोलन याच कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी केले.

सध्या आदिल कोठीत वसतिगृह आहे. पामेर कोठी आणि मर्दाना महलमध्ये शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय चालते. तर एका कोठीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे. भग्न जनाना महलमध्ये अनेक वर्षे शासकीय कला महाविद्यालय होते. जागोजाग दर्गे, पत्र्याचे शेड आणि घरे बांधून अनेकांनी अतिक्रमण केले आहे.

हे सगळे पाहण्यासाठी आदिल कोठीपासून सकाळी सातला हेरिटेज वॉक सुरू झाला. आदिल दरवाजा, पामेर कोठी, मोती मस्जिद, मर्दाना महल, जनाना महलचा इतिहास आणि स्थापत्याची इतिहासप्रेमी तज्ज्ञांकडून माहिती करून घेत होते. इतिहासतज्ज्ञ रफत कुरेशी, डॉ. दुलारी कुरेशी आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे उपअधीक्षक डॉ. शिवाकांत बाजपेयी यांनी येथील रंजकपणे इतिहास सांगितला.

येत्या काही वर्षांतच शंभरी पुरी करणाऱ्या या शासकीय महाविद्यालयाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संवर्धनाअभावी धोकादायक बनलेल्या इमारती, परिसरात बजबजलेली अतिक्रमणे, बाहेरील व्यक्तींचा वाढलेला वावर यामुळे येथील शैक्षणिक वातावरणाला बाधा निर्माण होते. परिसरातील तरुणांची टोळकी अनेकदा येऊन धुडगूस घालतात. महिला प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींना रोज त्रास सहन करावा लागतो. मैदानावर क्रिकेट, फुटबॉल खेळायला येणाऱ्या बाहेरच्या गुंड प्रवृत्तीच्या मुलांकडून होणाऱ्या भांडणाच्या भीतीने येथील विद्यार्थी मैदानावर येण्यास घाबरतात. याला आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढावी, सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन हा भाग संरक्षित करून द्यावा, अशी अपेक्षा हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

किलेअर्कच्या विविध इमारतींभोवतीची अस्वच्छता दूर करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेने पुढाकार घेतला. विद्यापीठाचे रासेयो समन्वयक डॉ. टी. आर. पाटील यांनी किलेअर्कमध्ये स्वच्छता कॅम्प लावण्याची घोषणा केली. पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पामेर कोठी, मर्दाना महल आणि परिसरात उगवलेले गवत, झुडपे काढण्यात येतील. आपणही यात सामील होऊ शकता.

What do you think?

Written by Admin

CityKatta : Aurangabad's own social media platform

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

Aurangabad – Jalna package gets environmental clearance

राज्याच्या स्टार्टअप धोरण समितीतून मराठवाडा बाद