तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाचे काम येत्या मार्चमध्ये सुरू करणार असून तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. २४ जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग राज्यासाठी अत्यंत महत्वाचा असून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची समृद्धी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस परिषदेत व्यक्त केला.
जागितक आर्थिक परिषदेतील वातावरण भारतकेंद्रित झाले असतानाच महाराष्ट्रही त्यात अग्रेसर राहिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या परिषदेत राज्यातील परिवर्तन प्रक्रियेची विविध माध्यमांतून माहिती करून दिली.
भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) यांच्यावतीने दावोसमध्ये ‘इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स इन इंडिया डिमांड लेड प्लॅनिंग अॅण्ड फायनान्सिंग’ या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नीति आयोगाचे मुख्याधिकारी अमिताभ कांत यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस व इतर मान्यवरांनी सहभाग घेतला. नागपूर मुंबई महाराष्ट्र समृद्धी कॉरिडॉरचा आराखडा यावेळी सादर करण्यात आला. चोवीस जिल्ह्यंना जोडणारा हा कॉरिडॉर संपूर्ण राज्यासाठी विशेषत: शेतकरम्य़ांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कृषी केंद्रांच्या विकासातून कृषी उत्पादनांची वाहतूक, पुरवठा आणि कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी शीतगृहांमध्ये त्यांची साठवणूक करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या सादरीकरणात दिली. भारतातील सर्वात मोठा आणि सुनियोजित असा हा कॉरिडॉर तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. मार्चमध्ये या प्रकल्पाचे काम सुरु करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीपैकी ८५ टक्के जमीन थेट खरेदीतून पुढील महिन्यापर्यंत सरकारला मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पाचे कौतुक करताना कांत म्हणाले, महाराष्ट्राने जमीन संपादन करताना सहमतीने केलेल्या वाटाघाटी, त्यामध्ये भूधारकांचे पूर्णपणे झालेले समाधान, चांगला मोबदला, प्रकल्पामध्ये प्राप्त केलेला सर्वोत्कृष्ट सहभाग आणि या सर्व प्रक्रियेमुळे टळलेले कायदेशीर पेचप्रसंग या बाबी उल्लेखनीय आहेत.
GIPHY App Key not set. Please check settings