रशियामधील सर्वात मोठी स्टील कंपनी नोव्होलिपटेस्क स्टिल (एनएलएमके) महाराष्ट्रात सुमारे सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रशियाचे वाणिज्यदूत ए. शार्वालेव्ह उपस्थित होते.
इलेक्ट्रिक स्टील निर्मितीसाठी एनएलएमके कंपनीची जगभर ओळख असून ही कंपनी महाराष्ट्रात प्रथमच आपला प्रकल्प सुरू करणार आहे. औरंगाबादच्या डीएमआयसीमध्ये (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर)शेंद्रा किंवा बिडकीनमध्ये या कंपनीने प्रकल्पासाठी जागा पाहिली असून ती देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 2022 मध्ये दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होईल. त्यावेळी सुमारे सहा हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
औरंगाबादच्या ‘ऑरिक’मध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) हा प्रकल्प होणार असून प्रकल्प सुरू करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून कंपनीचे प्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. कंपनीच्या प्रतिनिधींनी आतापर्यंत तीन वेळा वरील जागेची पाहणी केली असून संबधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर लवकरच कंपनीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
कंपनीच्या वरिष्ठ संचालकांसह रशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत ए. शार्वालेव्ह यांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन प्रस्तावित प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. तसेच शासनाच्या विविध विभागाकडून कंपनीच्या नियोजित प्रकल्पास सोयी-सुविधा मिळाव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने श्री. देसाई यांच्याकडे केली. दरम्यान, या कंपनीमुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होण्यास मदत होणार असून अनेकांना रोजगार मिळणार आहे, त्यामुळे या कंपनीला शासन स्तरावर सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही श्री. देसाई यांनी दिली.
भारतात मागील तीस वर्षांत वीजेची मागणी अत्यंत वेगाने वाढलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक सबस्टेशनची गरज तीस पटींनी वाढलेली आहे. वीज वहन व ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशेष दर्जाचे स्टील एनएलएमके कंपनी तयार करते. एनएलएमके सध्या भारताला 20 टक्के ट्रान्सफॉर्मर स्टील पुरवत आहे. ही कंपनी महाराष्ट्रात सुरू झाल्यास देशांतर्गत स्टील उपलब्ध होणार आहे, अशी माहिती यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरणाद्वारे दिली.
यावेळी डीएमआयसीचे संचालक गजानन पाटील, एनएलएमके कंपनीचे संचालक व्ही. शेव्हलेव्ह, ए. काव्होसीन, कार्यकारी संचालक एन. गुप्ता, प्रकल्प व्यवस्थापक पी. रिचॉकॉव्ह, आदी उपस्थित होते.
GIPHY App Key not set. Please check settings