जाधववाडीतील भाजीपाला बाजारात होत असलेली गर्दी रोखण्याच्या अनुषंगाने जाधववाडीत फळे व भाजीपाला बाजारात केवळ ठोक (घाऊक/होलसेल) स्वरुपात खरेदी-विक्री होईल. याबाबत महापालिका आयुक्त, कृषी उत्पन्न बाजार समिती व पोलिसांनी आवश्यक ती कार्यवाही पार पाडण्याचे बैठकीत ठरले.
औरंगाबाद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जाधववाडी येथे घाऊक व किरकोळ (रिटेल) भाजीपाला खरेदी-विक्रीच्या दैनंदिन व्यवहाराच्या अनुषंगाने होत असलेल्या नागरिकांच्या गर्दीस तत्काळ आळा घालणे व सुरळीतपणे खरेदी-विक्री व्यवहार व्हावेत, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, अपर आयुक्त विजयकुमार फड, सहकार उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उपस्थितीत होते.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय व उपायुक्त (पुरवठा) यांना निर्देश देऊन, संबंधितांसह बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सदरील बैठक घेण्यात आली.
दैनंदिन स्वरुपात जाधववाडी येथे येणाऱ्या किरकोळ खरेदी-विक्री करणाऱ्यांची व्यवस्था औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे करावी. सदर ठिकाणावर नागरिकांत खरेदी-विक्रीच्या वेळी सामाजिक अंतर राखले जाईल, यासाठी महापालिकेने रितसर आखणी करुन द्यावी. आवश्यकतेप्रमाणे किरकोळ विक्री ठिकाणात वाढ करावी. फळे व भाजीपाला खरेदी-विक्रीच्या वेळी नागरिक योग्य ते सामाजिक अंतर राखतील यादृष्टीने पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी.
पूर्वीची किरकोळ भाजीपाला खरेदी-विक्री केंद्रे व्यवस्थितपणे चालू होणे आवश्यक असल्याने महापालिकेने जागेची निश्चिती, सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टिकोनातून आखणी करावी. जाधववाडीवाडी येथे कोणत्याही परीस्थितीत फळे व भाजीपाला ठोक स्वरूपात खरेदी-विक्री व्यतिरिक्त किरकोळ खरेदी-विक्री होणार नाही याची दक्षता कृषी उत्पन्न बाजार समितीने घ्यावी. कृषी उत्पन्न बाजार समिती व महापालिका तसेच पोलीसांनी याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी. पोलिसांनी ध्वनिक्षेपणाद्वारे विक्रेते व ग्राहकांना याबाबत माहिती द्यावी. बाजार समितीने फलक लावावेत. एखाद्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे किंवा गर्दी होत आहे असे निदर्शनास आल्यास, महापालिकेने गरवारे स्टेडियम, आमखास मैदान, तसेच इतर मोकळ्या मैदानाचा किरकोळ खरेदी-विक्रीच्या अनुषंगाने वापर करण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, असेही बैठकीत ठरले.
– जिमाका, औरंगाबाद
GIPHY App Key not set. Please check settings