मराठवाडा विकास महामंडळ हे मराठवाड्याच्या विकासासाठी एक नोडल एजन्सी म्हणून कार्यरत झाले पाहिजे, तसे आदेश सरकारी पातळीवरून दिले जावे. स्थानिक जिल्हा नियोजन समिती आणि मराठवाडा विकास महामंडळ यांचे संबंध प्रस्थापित झाले पाहिजेत, असे मत सेवानिवृत्त विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी व्यक्त केले. ‘मराठवाडयाचा विकास’ विषयावर पद्मविभूषण गोविंद भाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत मंगळवारी आयोजित व्याखानामध्ये कृष्णा भोगे यांनी हे मत मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस.बी. वराडे होते.
या प्रसंगी कृष्णा भोगे म्हणाले, मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र या तिन्ही भागाचा समतोल विकास साधण्यासाठीच विकास मंडळाची स्थापना झाली. पण, या मंडळाचा फारसा उपयोग झाला नाही. मंडळाची नेमकी भूमिका काय हे अनेकांना कदाचित माहिती नसावे. मराठवाड्यात विद्यापीठे आहेत. अनेक नामांकित शैक्षणिक संस्था आहेत. अनेक तज्ज्ञ मंडळी तेथे कार्यरत आहेत. संशोधन होते, पण अधिक चांगले काम होण्यासाठी मंडळाने त्यांच्याशी किती संबंध प्रस्थापित केले, असा सवाल भोगे यांनी उपस्थित केला. महामंडळाला मिळालेला निधी इतरत्र वळता करता येत नाही. गेल्या २५ वर्षांत काय झाले? महानगर – जिल्हा नियोजन समिती याचे कार्यही विकास आराखडा तयार करायचा आहे. महामंडळ आणि नियोजन समिती यांच्यात संबंध प्रस्थापितच झाले नाही, असे मतही भोगे यांनी व्यक्त करत मंडळाचा अध्यक्ष हा नियोजन समितीचा सहअध्यक्ष असला पाहिजे, तसा निर्णय शासनस्तरावर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मराठवाडा, विदर्भासाठी पॅकेज जाहीर झाले. त्यावेळी महामंडळाशी विचारविनिमय झाला का ? तसे झाले नसेल तर ते योग्य नाही. विकास महामंडळ आपले काम परिणामकारक करू शकले नाही. त्याच्या कार्याच्या रुपरेषेबाबत पुनर्विचार व्हायला पाहिजे. खरंतर मराठवाड्याचा विकास साधण्यासाठी महामंडळ एक नोडल एजन्सी म्हणूनच कार्यरत व्हायला पाहिजे, तसे आदेश काढले जावे, अशी मागणी त्यांनी केली.
GIPHY App Key not set. Please check settings