अज्ञात पेडका किल्ला
प्राचीनकाळापासूनच औरंगाबाद जिल्हा आणि लगतचा प्रदेश दक्खनच्या पठारावर प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशमार्ग म्हणून ओळखला गेला आहे. उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या उत्तरसीमेवरील अजिंठा-सातमाळा डोंगररांगांनी ठासून उभ्या आहेत. इथले डोंगर हिमालयाएवढे उंच नसतील किंवा सह्याद्रीइतके बेलाग, अवघड नसतील. परंतु त्यांचे भौगोलिक स्थानच त्यांना महत्त्वपूर्ण आहे. ह्या डोंगररांगांना अजून बळ मिळाले ते इथे वेगवेगळ्या शतकात बांधल्या गेलेल्या अंतूर, जंजाळा, लोंझा, कण्हेरगड, पेडका, सुतोंडा आणि वेताळवाडीसारख्या किल्ल्यांमुळे. स्थापत्यरचनेच्या दृष्टीने दक्षिण मराठवाड्यातील प्रत्येक किल्ल्याला जसे वैशिष्ट्यालंकार लाभले त्यामानाने औरंगाबाद जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवगिरी किल्ला सोडला तर इतर किल्ल्यांच्या रचना अगदी साध्याच आहेत. अजिंठा-सातमाळा डोंगररांगांमधील ह्या किल्ल्यांची निर्मिती मुख्यत्वे टेहळणीसाठी झाल्याचे दिसते. अंतुर, जंजाळा किल्ल्यांवर काही प्रमाणात वस्ती होती तर काही किल्ले फक्त टेहळणीसाठीच असल्याचा कयास तिथे सापडलेल्या पुरावशेषांवरून बांधता येतो. दुर्दैवाने त्यांच्याविषयी फार ऐतिहासिक अभ्यास झालेला नसल्याने आपल्याला त्यांच्या स्वरूपाविषयी संपूर्ण कल्पना बांधता येत नाही. म्हणूनच आपल्या अभ्यासाचा प्रयत्न पुढे असाच सुरु ठेवत आपल्या आधीच्याच वाटेवर औरंगाबाद जिल्ह्यात मार्गक्रमण सुरु ठेवताना आज आपण पेडका किल्ल्याकडे वळूया.
कन्नड तालुक्यात गौताळा अभयारण्याच्या दक्षिण सीमेवर समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फूट उंचीवर २०°१४’४६” उत्तर अक्षांश व ७४°५७’४९.६” पूर्व रेखांशांवर वसलेला हा डोंगरी किल्ला. कन्नड ह्या तालुका ठिकाणाहून आतमध्ये जेऊरकडे जाणाऱ्या मार्गावर पेडकावाडी गावातून एक रस्ता पेडकावाडी धरणाकडे जातो. ह्या धरणाच्या पश्चिमेकडे चालत राहिले की किल्ल्याच्या दक्षिणेकडील दोन सोंडांच्या मधल्या घळीतून पाउलवाट वर किल्ल्याकडे आपल्याला नेते. छोट्याशा चढाईनंतर एक पठार लागते. तीन वेगवेगळ्या उंचीवर तयार झालेल्या पठारांमुळे किल्ल्याची विभागणीही तीन भागात झाली आहे. ह्या पठारावरून अजून घळीतून पुढे चालत गेल्यावर डोंगराच्या एका सोंडेवर काही दगडी पायऱ्या चढत गेल्यावर उन्हा-पावसाला तोंड देत उभे असलेले पडके पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार लागते.
प्रवेशद्वारातून आत गेल्या गेल्या असलेल्या छोट्या पठारावर दोन पाण्याची टाकी, म्हसोबाची घुमटी आणि काही चौथरे सोडून इतर काहीच अवशेष आज शिल्लक नाहीत. तिथून चढून वरच्या भागात एक बांधीव तळे आणि त्याच्या काठावर २-३ मोठ्या गुहा लागतात. ह्याच भागात बुरुज व त्याजवळ काही चौथऱ्यांचे अवशेष आणि पीराचे ठाणे दिसते. जंजाळा आणि वेताळवाडी किल्ल्यांसारखाच तळे आणि टाक्यांमध्ये पाणी साठवून किल्ल्यावरील पाण्याची गरज भागवली गेलेली आहे. ह्या भागात अजून २-३ पाण्याचे साठे सोडले तर अक्षरशः काहीही पुरावशेष आज शिल्लक नाहीत.
ह्या किल्ल्याची निर्मिती कुणी का आणि कधी केली असेल हा प्रश्न अजूनतरी अनुत्तरीतच आहे. मात्र पाण्याची टाकी आणि गुंफा किल्ल्याच्या निर्मितीचा काळ पूर्व-मध्ययुगीन असावा असे दर्शवितात. इतिहास संशोधकांनुसार सतराव्या शतकात मुघल बादशाह शाहजहानच्या आदेशानुसार मुघल सैन्याच्या एका तुकडीने हा किल्ला आपल्या कब्जात घेतला. त्या आधीचा आणि नंतरचा इतिहास. तसेच इतिहासातील ह्या किल्ल्याची कामगिरी आपल्याला अजून ज्ञात नाही. त्यासाठी अधिक अभ्यास होणे गरजेचे आहे. मात्र निसर्गसौंदर्याने नटलेल्या ह्या किल्ल्याला जरूर भेट द्यावी असाच हा किल्ला आहे.
– तेजस्विनी आफळे
Photo © Trekshitiz.com
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
पेडका किल्ला
Photo © Trekshitiz.com
GIPHY App Key not set. Please check settings