औरंगाबाद जिल्ह्यात इथेनॉलच्या नावाने भेसळ?? भेसळीचा लपंडाव सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता

0
381

औरंगाबाद जिल्ह्यात इथेनॉलच्या नावाने रोज ३० लाखांची लूट

जिल्ह्यातील १४० पेट्रोलपंपांवर रोज अंदाजे ७ लाख लिटर पेट्रोलचा खप होत असून, त्यामध्ये १० टक्क्यांच्या तुलनेत ७० हजार लिटर इथेनॉल पानेवाडी टर्मिनल येथूनच मिश्रण करून पाठविण्यात येत आहे. तेथे मिश्रित केले जाणारे ३० लाख रुपयांचे इथेनॉल आहे की पाणी, याबाबत किरकोळ वितरकांना काहीही माहिती नसून हा सगळा भेसळीचा लपंडाव सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता आहे.

महिन्याकाठी औरंगाबादकरांच्या खिशातून सुमारे ९ कोटींच्या आसपास इथेनॉलची रक्कम उकळली जात असून, त्याचा फायदा होण्याऐवजी ग्राहकांची वाहने रस्त्यामध्ये कुठेही बंद पडत आहेत. पेट्रोल टँकमध्ये गॅ्रव्हिटीने साचलेले इथेनॉल पाण्याच्या रूपाने बाहेर पडत असल्याने ही सगळी भेसळ कधी थांबणार, असा प्रश्न आहे. इथेनॉल मिश्रणाने राष्ट्राला कमी प्रमाणात इंधन आयात करावे लागेल. देश सक्षम होईल; परंतु इथेनॉल हे पेट्रोलच्या तुलनेत किती शुद्ध आहे, याचा कुठलाही डेमो राज्यातील पंपचालकांना, ग्राहकांना जनजागृती म्हणून दाखविण्यात आलेला नाही.

२ ते ३ महिन्यांपासून इथेनॉल मिश्रित पेट्रोल येत असल्याचा दावा जिल्हा पेट्रोलपंप असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी केला. कंपन्यांच्या मनमानी विरोधात इंधन विक्रेत्यांचा संताप अनावर झाला असून, १ फेबु्रवारीपासून त्यांनी १२ तास पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अपघाताला निमंत्रण
इथेनॉल मिश्रणाला पेट्रोलपंप चालकांचा विरोध नाही; परंतु ते इथेनॉलच आहे, याची काहीही माहिती ग्राहकांपर्यंत आजवर दिलेली नाही. इथेनॉलमिश्रित पेट्रोल दुचाकी, चारचाकीमध्ये भरल्यानंतर दिवसाआड बंद पडण्याचे प्रकार समोर येत आहेत.
पेट्रोल टँकमध्ये पाणी निघत असल्याची प्रकरणे नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये उघडकीस आली. वाहन चालताना मध्येच बंद पडले आणि पाठीमागील वाहनाने धडक दिल्यास होणार्‍या अपघातास कोण जबाबदार राहणार, असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो आहे. इथेनॉल भेसळयुक्त मिश्रित होत असेल, तर त्याचे परिणाम सामान्य ग्राहकांच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इथेनॉलचे प्रमाण आणि किंमत
प्रत्येक पेट्रोलपंपावर येणार्‍या पेट्रोलमध्ये एकूण साठ्याच्या १० टक्के इथेनॉल (गॅसाहोल) टर्मिनलमधूनच मिश्रित होऊन येते. साधारणत: ४२ रुपये लिटर इथेनॉल आहे. ते ८२ रुपये प्रति लिटर पेट्रोलमध्ये मिश्रित करून विकले जात आहे.
१ लिटर पेट्रोलमध्ये १०० एमएल इथेनॉल मिश्रित होण्याचे प्रमाण आहे. त्यामुळे किमान ४ रुपये प्रतिलिटर पेट्रोल स्वस्त असले पाहिजे; परंतु ४२ रुपये लिटरचे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून ८२ रुपये लिटर विकले जात आहे. ही सर्वसामान्य ग्राहकांची एकप्रकारे लूटच आहे. शिवाय ते इथेनॉल आहे की पाणी, याचे प्रमाण देण्यास ना कंपन्या पुढे येत आहेत, ना पेट्रोलियम मंत्रालय.

आम्ही आता थकलो आहोत 
जिल्हा पेट्रोलपंप असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी कंपन्यांवर खापर फोडले. इथेनॉल मिश्रणाबाबत कंपन्यांनी वितरकांना काहीही सूचना दिल्या नाहीत, शिवाय डेमोसुद्धा दाखविलेला नाही. जनजागृती करण्यासाठीदेखील कंपन्या पुढे आलेल्या नाहीत. याबाबत जाहिराती करण्यासाठीदेखील कंपनी पुढाकार घेत नाही. आम्ही आता कंपन्यांच्या अरेरावीला थकलो असल्याचे अब्बास यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. याप्रसंगी पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्यानंतर इथेनॉल, पेट्रोल वेगळे होत असल्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

वाहन खराब झाल्यास काय?
ग्राहक इथेनॉलमिश्रित पेट्रोल वाहनात भरत आहेत; परंतु त्यामध्ये पाणी असल्याची प्रकरणे समोर येत असल्यामुळे पेट्रोलपंपचालकांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहावे लागत आहे. वाहन खराब झाल्यास कोण जबाबदार, असा प्रश्न पेट्रोल पंप असोसिएशनला पत्रकारांनी केला. यावर असोसिएशन म्हणाले, ग्राहकांनी पेट्रोलची टाकी स्वच्छ करून घ्यावी. टाकीतून बाहेर काढलेल्या पेट्रोलमध्ये तळाला साचलेले पाणी फेकून द्यावे. नंतर उरलेले पेट्रोल वाहनात वापरता येईल. पेट्रोलमध्ये इथेनॉलच मिश्रित केले जाते की दुसरे काही, याबाबत वितरकांना काहीही माहिती नसल्याचे अब्बास यांनी सांगितले.

 

SOURCELokmat
Previous articleकेंद्रीय अर्थसंकल्प 2018-19:‘भारता’ला द्या; आरोग्य वाढवा
Next articleState bats for HRIDAy scheme for Aurangabad
CityKatta : Aurangabad's own social media platform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here