ऐतिहासिक वारशाने समृद्ध अशी ही नगरी. कलाकुसर, इतिहास, संस्कृती असं देण लाभलेलं औरंगाबाद म्हणूनच महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून गौरवप्राप्त आहे. 52 दरवाजांचे शहर म्हणून परिचित या शहरातील ऐतिहासिक वैभव आजही मुग्ध करून टाकतात. मध्य हिंदुस्तानातील हे केंद्र सातवाहन, वाकाटाक आणि यादव या कालखंडातील आपले नाते सांगते. चौदाव्या शतकातील मुघल सल्तनीने एकेकाळी दिल्लीहून थेट देवगिरी किल्ल्याला आपली राजधानी हलवली. सोळाव्या शतकामध्ये निझामशाहीतील पंतप्रधान मलिक अंबरने औरंगाबादचा चेहरा मोहरा बदलून टाकला. एकंदरीत औरंगाबादमध्ये मिश्र संस्कृतीची झलक बघायला मिळते. सुफी आणि शास्त्रीय रागदारीचा संगम येथे आहे. कलेचा वारसा सांगणारी पैठणी, हिमरु कारागिरी, बिदरी सारखे नाजुक कलाकुसरीच्या नक्षीकामाची भांडी आणि वस्तुंचे हे माहेरघर. पैठण म्हणजेच पूर्वीचे प्रतिष्ठाणनगरी हे व्यापाऱ्यांचे मोठे केंद्र. संमिश्र संस्कृतीची झलक जशी वास्तु आणि कलेत दिसते, तशी ती पेहराव आणि खाद्यपदार्थांच्या वैविध्यातही दिसून येते. अजिंठा आणि वेरुळ लेण्यांच्या रुपाने युनेस्कोच्या यादीतील दोन जागतिक वारसास्थळे सुद्धा औरंगाबादमध्ये आहेत. त्यामुळे जगभरातून हा ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी वर्षभर गर्दी कायम बघायला मिळते.
1वेरुळ लेणी

औरंगाबादपासून 26 किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध वेरुळ लेणी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे संरक्षीत स्मारक आहे. याठिकाणी 34 लेण्या असून त्यात 13 बौद्ध, 16 हिंदु आणि पाच जैन धर्मीय लेण्या आहेत. आधी कळस, मग पाया या स्थापत्य कलेतील जागतिक उत्कृष्ट नमुना म्हणजे कैलास लेणी, क्रमांक 16 होय. येथून एक किलोमीटर अंतरावर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वराचे पवित्र स्थान आहे. त्याशिवाय गणेशाच्या आद्यपीठापैकी लक्ष्मीविनायक मंदिर व शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांच्या गढीचे अवशेषही बघायला मिळतात. येथे जैन मंदिर असून खुलताबाद पाच किलोमीटर, तर पितळखोरा व गौताळा अभयारण्य अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे.