अजिंठा लेण्यातील चित्रांचा पुनर्जन्म
अजिंठा लेणीमधील चित्रे म्हणजे समृद्ध भारतीय चित्रकलेचा उत्कृष्ट्र नमुना आहे. त्यातील नैसर्गिक रंग आजही मनाला भुरळ घालतात. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा हा सांस्कृतिक ठेवा अबाधित असला तरी त्यातील चित्रे मात्र बरीचशी पुसट व खराब झाली आहेत, पण ही कला पुढच्या असंख्य पिढ्यांसाठी कायम टिकावी म्हणूनच त्यातील चित्रे पूर्ण रूपात चितारण्याचे काम औरंगाबादेतले चित्रकार एम. आर. पिंपरे यांनी केले आहे. गेल्या 55 वर्षांपासून त्यांचे हे काम अव्याहतपणे सुरू आहे. शहरात या चित्रांचे खास संग्रहालय उभारावे, अशी त्यांची इच्छा आहे, त्या साठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी इच्छा त्यांनी सिटीकट्टा सोबत बोलतांना मांडली.
चित्रकार एम. आर. पिंपरे यांनी जणू अजिंठा लेणीसाठीच जन्म घेतलाय, असे वाटते. पिंपरे हे मूळचे विदर्भातील वाशीमचे रहिवासी. शाळेत असताना 1951 मध्ये त्यांची सहल अजिंठा लेणीत आली होती. या लेणी व त्यातील चित्रे पाहून ते भारावले. जातक कथांवर आधारित असलेली ही चित्रे पाहून त्यांनी वयाच्या 14 व्या वर्षी उभं आयुष्य या लेणीवर काम करण्याचा संकल्प केला. त्यासाठीच त्यांनी इतर कुठलाही व्यवसाय किंवा क्षेत्र न निवडता चित्रकलेतच करिअर करण्याचे ठरवले. शाळा संपल्यावर त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. तेथे शिक्षण घेऊन ते औरंगाबादेत आले. अनेक नोक-या केल्या, पण त्यांचे मन अजिंठा लेणींकडे आकर्षित व्हायचे.
असा झाला अजिंठा लेणींचा पुनर्जन्म
योगायोगाने चित्रकार पिंपरे यांना केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे काम मिळाले. पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक एस. आर. राव यांनी लेणींतील चित्रे कागदावर चित्ररूपाने काढण्यासाठी पिंपरे यांची निवड केली. हा काळ होता 1963 सालचा. त्याकाळात लेणींत फोकस नेण्यास परवानगी होती. तब्बल पाचशे वॅटचे फोकस लावून अंधा-या लेणींत लखलखाट केला जायचा. यामुळे अनेक चित्रकार हुबेहूब पेंटिंग काढायचे. या सर्व लोकांमध्ये चित्रकार पिंपरे यांनी जगावेगळे काम केले ते म्हणजे अर्धवट चित्रे पूर्ण रूपाने काढण्याचे. लेणी क्र. 1 आणि 2 लेणी तसेच क्रमांक 16 व 17 या लेणीत जातक कथांवर आधारित सुंदर चित्रे आहेत. ती चित्रे दोन हजार वर्षांत पुसली गेली. ती आणखी खराब होऊ नये म्हणून पुरातत्त्व खात्याने सिमेंटचे पॅचेस लावले आहेत. सध्या लेणींतील 70 टक्के चित्रांवर पॅचेस आहेत. केवळ 30 टक्के चित्रे सुस्थितीत आहेत. जेथे जेथे पॅचवर्क होते त्या चित्रांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करून पिंपरे यांनी मूळ चित्र कसे असेल हेच त्यांच्या चित्रातून दाखवले. अशी एक, दोन नव्हे तर तब्बल 350 चित्रे पिंपरे यांनी जिवंत केली आहेत.गेली 55 वर्षे काम केले व आज 80 व्या वर्षीही माझे काम चालूच आहे. पुढच्या पिढीला पूर्वीची अजिंठा लेणी कशी होती हे या चित्रांतून दिसेल. काही काळाने मी नसेन, पण चित्ररूपाने माझे काम राहील. औरंगाबाद शहरात या चित्रांची गॅलरी व्हावी. त्यात अजिंठा लेणींची मूळ चित्रे व त्या बाजूला पिंपरे यांनी काढलेले चित्र ठेवावे, अशी पिंपरे यांची अपेक्षा.
१० नंबर लेणीचे साकारलेले ५ फुट x ७५ फुट चित्राची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
चित्रे आणि जातक कथा पुस्तक स्वरूपात प्रदर्शित
1998 मध्येच पिंपरे यांच्या चित्रांवर सुंदर ग्लेझ पेपरवर्क असलेले पुस्तक तयार झाले आहे. अजिंठ्यातील त्यांनी पूर्ण केलेली 1 ते 17 या लेणींतील चित्रे अन् त्यांच्यावर आधारित जातक कथा त्यात आहेत. अजिंठा लेणींतील पद्मपाणी हे चित्र जगभरात प्रसिद्ध आहे, पण पिंपरे यांच्या कुंचल्यातून पद्मपाणीप्रमाणेच इतर अनेक चित्रे प्रकाशात आली आहेत. दोन हजार वर्षांपूर्वीची कपड्यांची फॅशन, राहणीमान, कपड्यांचे फॅब्रिक, बहुमजली इमारती, सौंदर्य प्रसाधने ,आताच्या आधुनिक काळापेक्षाही पुढारलेली होती हेच या चित्रांतून पिंपरे यांनी दाखवले आहे. एक म्हातारी व्यक्ती स्वत:चे नेत्रदान करतानाचे चित्र अजिंठा लेणीत आहे. तेही पिंपरे यांनी चितारले आहे. पिंपरे यांचे हे छोटेसे पुस्तक 103 पानांचे असून ते इंग्रजीत आहे. त्याचे लेखन शहरातील प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांनी केले आहे. पत्नी वत्सला आणि मुलगी मयुरा यांच्या पाठिंब्यामुळेच आपण हे काम करू शकलो, असे पिंपरे सांगतात.