इंडियन एअर लाईन्स चे दिल्ली – जयपूर – उदयपूर – औरंगाबाद – मुंबई हे आईसी ४९१ विमान २६ एप्रिल १९९३ रोजी आपल्या नियमित वेळेनुसार औरंगाबाद विमानतळावर उतरले आणि त्यातून औरंगाबाद पर्यंत येणाऱ्या प्रवाशांनी उतरण्यास सुरुवात केली. त्याचवेळी विमानात इंधन भरणारे कर्मचारी, प्रवाश्यांचे सामान उतरविणारे कर्मचारी आणि इंडियन एअर लाईन्सचे औरंगाबाद येथील अधिकारी यांची हवाई पट्टीवर लगबग सुरु झाली. वैमानिक श्री एस.एम.सिंग आणि सह वैमानिक कु.मनीषा मोहन हे देखील उतरून फ्रेश होण्यासाठी विमानतळाच्या मुख्य इमारतीकडे रवाना झाले. विमानातील एक हवाई सुंदरी विमानातून खाली उतरून पुढे मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाश्यांच्या स्वागतासाठी विमानाच्या प्रवेशद्वारा जवळील शिडीच्या पायथ्याशी सुस्मित चेहऱ्याने उभी राहिली.
इकडे विमानतळाच्या मुख्य इमारतीमध्ये मुंबई ला जाणारे प्रवासी चेक इन करून विमानात बसण्यासाठी रांगेत उभे होते आणि त्यांना सोडण्यासाठी आलेले त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवार परत शहराकडे जाण्याच्या तयारीत होते. हवाई पट्टीवर इंधन भरणे आणि विमानाच्या आतील साफ सफाई आणि तांत्रिक दृष्ट्या इतर सर्व बाबींची शहनिशा झाल्यावर तेथील अधिकार्याने चेक इन केबिन कडे इशारा करून मुंबई ला जाणाऱ्या प्रवाशांना विमानात बसण्यासाठी बोलाविण्यात आले. मुंबई साठी जाणाऱ्या प्रवाशांनी विमानात प्रवेश केला त्यावेळी कोणाच्याही मनात त्यांच्या भावी आयुष्यासंबंधी काहीच शंका नव्हती. नियमितपणे हवाई प्रवास करणारे प्रवाश्यामध्ये प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रातील अतिशय महत्वाच्या व्यक्ती, मोठे उद्योगपती, काही राजकारणी, आणि थोड्या फार व्यापाऱ्यांचा समावेश होता.
एव्हाना वैमानिक आणि सह वैमानिक देखील फ्रेश होऊन आपापल्या सीट वर जाऊन बसले. इंधन भरणारी गाडी परत फिरली. विमानास उड्डाणाच्या दृष्टीने सर्व व्यवस्थित असल्याचे संदेश एअर ट्राफिक कंट्रोल वरून वैमानिकास करण्यात आले आणि ग्राउंड स्टाफ च्या इशाऱ्यानुसार वैमानिकाने एक एक करून दोन्ही पंखे सुरु केले. विमानाच्या चाकाजवळ लावण्यात आलेले लाकडी ओंडके काढण्यात आले आणि विमान धावपट्टी कडे निघाले. उड्डाणासाठी आवश्यक गती प्राप्त होण्यासाठी विमानाने धावपट्टीवर एक चक्कर टाकली आणि गती गती वाढवत नेत आकाशाकडे झेप घेतली.
औरंगाबाद विमानतळाला लागूनच असलेल्या बीड रोड वर ज्यावेळी विमान उड्डाण करते त्यावेळी विमान उडे पर्यंत वाहतूक थांबविण्यात येते परंतु २६ एप्रिल १९९३ या दिवशी हि वाहतूक रोखण्यात आली नव्हती आणि एक ट्रक गवताच्या पेंद्ध्याने मर्यादेपेक्षा अधिक उंची ने भरलेल्या अवस्थेत नेमका त्याच वेळी या बीड रोड वरून जात होता. विमानाने अजून अपेक्षित उंची गाठली नव्हती आणि विमानाची चाके हि आत गेलेली नव्हती. काळ जवळ आलेला होता, विमानातील प्रवासी आपले सीट बेल्ट बांधलेल्या अवस्थेतच होते, अजून हवाई सुंदरीने ते सोडण्याचे निर्देश दिले नव्हते आणि इथेच घात झाला !
विमानाची चाके बाहेर असल्याने आणि विमानाने अपेक्षित उंची न घेतल्याने बीड रोड वरून येणाऱ्या ट्रकच्या भल्यामोठ्या उंचीच्या पेंद्ध्याच्या मध्ये विमानाची चाके लागली आणि वैमानिकाचा विमानावरील ताबा सुटला अंन हेलकावे घेत विमान विद्युत तारांना स्पर्श करीत हवेत सैरावैरा फिरू लागले. वैमानिकाने विमान ताब्यात आणण्य्साठी सह वैमानिकासोबत खूप प्रयत्न केले पण ते आवाक्या बाहेर होत गेले. विमानाच्या आत बसलेल्या प्रवाशांना काहीच कळेना, हवाई सुंदरीला देखील काय करावे आणि काय सूचना द्याव्यात कळेनासे झाले. विमानाचा ताबा आता पूर्णपणे सुटला होता. वैमानिकाने तसे एअर ट्राफिक कंट्रोल च्या अधिकाऱ्यांना सांगेपर्यंत भरकटत असलेल्या विमाम्नाने चिकलठाणा या गावाच्या दिशेने वळण घेत एका ओबड धोबड जमीन असलेल्या शेतावर कोसळले, विमानाची गती अजूनही पूर्ण कमी झाली नव्हती त्यामुळे आधी विमानाचे नाक जमिनीत घुसले आणि विमानाचा समोरचा भाग तुटून पुढे भेलकांडत गेला आणि त्याने पेट घेतला. तश्याच अवस्थेत विमानाच्या शेपटा कडचा भागही विमानापासून तुटला गेला आणि एकाच हाहाकार माजला. विमानाचे तीन तुकडे झालेले होते, तिन्ही तुकड्यांनी पेट घेतलेला होता आणि जेथे जेथे विमांनाची शकले उडाली होती त्यातून प्रवासी बाहेर फेकले जात होते. त्यातील काहीना जखमा झाल्या तर काही भाजलेल्या अवस्थेत होते. काही जणानी प्रसंगावधान राखत विमानाच्या तुटलेल्या भागाकडून जमिनीवर उड्या टाकल्या त्यातले काही बचावले तर काही मृत्यूला सामोरे गेले.
एअर ट्राफिक कंट्रोल ने त्या दरम्यान अग्निशमन विभागाला खबर दिली आणि या दलाने ताबडतोब घटना स्थळाकडे धाव घेतली. विमान ऐन शेतात पडल्याने तिथे जाण्याचा रस्ता हि बरोबर नव्हता पण महत्प्रयासाने ते तेथे पोहोचले आणि छिन्न विछिन्न अवस्थेतील प्रवासी संपूर्ण शेतात विमानाच्या तुटलेल्या भागा बरोबर जळत होते. ज्यांनी हिम्मत करून विमानातून उड्या टाकूनही सही सलामत होते त्यांनी जखमींना वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला, चिकलठाणा गावातील नागरिकही मोठ्या संख्येने घटना स्थळी पोहोचून आपापल्या परीने मदत करण्याच्या प्रयत्नात लागले. अम्बुलस भरून भरून जवळच्या दवाखान्यात जखमींना भारती करून पुन्हा घटनास्थळाकडे धावत होत्या. संपूर्ण औरंगाबाद शहर हादरून गेले होते आणि मिळेल त्या वाहनाने त्या दुर्दैवी शेतात पोहोचत होते. मृतांचे नातेवाईक आणि मित्र परिवार आपल्या परीजनाचा शोध घेत अस्वस्थ पणे धावाधाव करीत होते.
शेतातील हे विदारक दृश्य पाहणेही अनेकांना शक्य झाले नाही ते भोवळ येऊन तेथेच पडले. अश्या भयानक घटनेचे वर्णन लिहिताना माझेही हात थरथरत आहेत यापुढे लिहिणेही शक्य होत नाहीये कारण ते दृश्य बघणारा मी देखील एक साक्षीदार होतो आणि मृतामध्ये सामील अनेक प्रवासी आमच्या कडून तिकिटे घेऊन गेलेले होते. एकंदर ५२ प्रवासी मृत्युमुखी पडले आणि चाळीस प्रवासी जखमी झालेले होते.विमानाचे ३ तुकडे होऊन देखील वैमानिक आणि सहवैमानिक जिवंत राहिले. मृतांमध्ये प्रामुख्याने व्हिडीओकॉन समूहाचे मुख्य संचालक श्री नंदलालजी धूत, त्यांचे सहकारी श्री जोशी, श्री पोकर्ण, दीपक जवहीरणी यांचे संपूर्ण कुटुंब, टीपिएच त्रावल्सचे बाबुभाई असे अनेक मोठ मोठे उद्योगपती आणि व्यावसायिक मंडळी होती. आज या घटनेला 27 वर्षे पूर्ण होत आहेत पण ते क्षण आठवले कि आज हि अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. दरवर्षी या मृतात्म्यांना शहराचे नागरिक श्रद्धांजली वाहतात आणि या कटू घटनेचे स्मरण करून मृतांचे नातेवाईक वाळलेल्या जखमाची खपली काढत असतात.
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो आणि इतके विदारक वर्णन पुन्हा लिहिण्याचा प्रसंग आयुष्यात पुन्हा कधी न येवो हि प्रार्थना.
Article by Rajan Houzwala
27 वर्षानंतर…
औरंगाबाद विमान दुर्घनेला आज 27 वर्षे पूर्ण झाली. या 27 वर्षात अनेक बदल झाली आहे. सुरक्षततेच्या बाबतीत अनेक पाऊले उचलली गेली. विमानतळासमोरून जाणारा बीड बायपास आज रेल्वेलाईन पलीकडे आहे. विमानतळ इमारतीचे 100 कोटी खर्च करून विस्तारीकरण करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यापुर्वी IC-491 मुंबई-औरंगाबाद- उदयपूर सेवा सुरवात झाली आहे. अन्य काही शहरांशी देखील औरंगाबाद विमानसेवेने जोडले गेले आहे. या सगळ्यात औरंगाबाद विमानतळ धावपट्टीचा विस्तार मात्र रखडला आहे. आगामी काळात औरंगाबादचे पर्यटन आणि औद्योगिक महत्व लक्षात घेऊन येथे सुविधा आणि विमानसेवा यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा करूया.
– टीम सिटीकट्टा
दोन वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात या दुर्दैवी घटनेसंदर्भात आलेल्या काही बातम्या
GIPHY App Key not set. Please check settings