कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार पसरू नये यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वसमावेशक ‘टास्क फोर्स’ची स्थापणा करुन सुक्ष्म नियोजनाव्दारे रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवावे. जिल्ह्यातील प्रशासन समन्वयाने काम करत असून प्रशासनाच्या या कामात लोकप्रतिनिधी , सामाजिक कार्येकर्ते आणि सामान्य जनता यांचे सहकार्य दखील तितकेच महत्वाचे आहे. जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलिस प्रशासन, आरोगय विभाग जोमाने काम करत असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनी यांच्यासमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री अंबादास दानवे, सतीष चव्हाण, हरीभाऊ बागडे, अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलिस अघीक्षक मोक्षदा पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. कुलकर्णी, आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरूवातीला खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील परिस्थितीची माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली. घाटीमध्ये केवळ कोविड बाधित रुग्णांवरच उपचार करण्यात यावेत तसेच जिल्ह्यातील खाजगी लॅबला तपासणीसाठी परवानगी देण्यात यावी असे त्यांनी मत मांडले.
डॉ. भागवत कराड यांनी शहरातील वाढता प्रादुर्भाव पाहता बाधित क्षेत्रासह इतर भागातही संचारबंदी कडक करावी अशा सूचना देत राजस्थानमधील भिलवाडा पॅटर्न आपल्या जिल्ह्यात राबवावा जेणेकरुन कारोना रुग्णांची संख्या कमी होईल असेही ते म्हणाले.
आमदार हरीभाऊ बागडे आपले मत मांडताना म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी सुध्दा लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. संचारबंदीच्या काळात नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असेही हरीभाऊ बागडे म्हणाले.
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी विभागात करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, शहरातील अनेक कन्टेंनमेन्ट भागाला मी स्वत: भेटी दिल्या असून तेथील नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती करुन घेऊन तशा प्रकारच्या उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचेही श्री केद्रेंकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी यांनी शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती देताना सांगितले की, शहरात जास्तीत जास्त तपासणी करण्यावर प्रशासनाचा भर आहे जेणेकरुन रुग्णांवर उपचार करणे सोपे होणार आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा कसून शोध घेऊन त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. तसेच कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांच्या चाचण्या घेण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांसोबत घेतला आरोग्यविषयक आढावा-
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यात वाढत चाललेल्या रुगणसंख्या आणि त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोविड बाधित गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र खाजगी रुग्णालयाची अथवा वार्डची निर्मिती करावी जेणेकरुन त्यांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेता येईल. तसेच घाटीमध्ये केवळ कोविड बाधित रुग्णांवर उपचार करावेत नॉन कोविड रुगण खाजगी रुग्णालयात भरती करावेत जे खाजगी रुग्णालय रुग्ण भरती करुन घेण्यास टाळाटाळ करतील त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी. तसेच ज्या कोवीड बाधीत रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे नाहीत त्यांच्यावर आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार उपचार करण्याच्या सुचना देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
कंटेन्मेंट भागातील नागरिकांशी साधला संवाद-
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी किलेअर्क परिसरातील अलगीकरण केंद्राला भेट दिली. येथील रुग्णांशी त्यांनी संवाद साधून त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. रुग्णांना नाष्टा, जेवण आणि इतर सोयी सुविधा वेळेवर मिळतात का याची विचारणा करताच सर्व रुग्णांनी ह्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर आरोग्यमंत्री किलेअर्क येथील कंटेन्मेंट भागात जाऊन तेथील नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. त्यानंतर जामा मशिद व्यवस्थापणाने 215 रुग्णांसाठी निर्माण करुन दिलेल्या व्यवस्थेविषयी आरोग्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी , विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता श्री पानझडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
GIPHY App Key not set. Please check settings