संत एकनाथ रंगमंदिर नूतनीकरणासाठी १ एप्रिलपासून सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाच्या खासगीकरणाची निविदा लवकर काढण्याचे आदेश देखील प्रशासनाला देण्यात आले.
संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रंगमंदिराच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्याशिवाय महापालिकेने ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. अडीच कोटी रुपये खर्च करून रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे. या कामाला १ एप्रिलपासून सुरुवात होईल, असे महापौरांनी घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट झाले. नूतनीकरणाच्या कामासाठी संत एकनाथ रंगमंदिर सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
सिडकोमधील संत तुकाराम नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी खासगीकरणाचे टेंडर लवकर काढण्याचे आदेश बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आले. संत तुकाराम नाट्यगृहाच्या खासगीकरणाची निवीदा लवकरच निघेल, असे मानले जात आहे.