in

माझे गाव औरंगाबाद : शहागंज… शहरातील सर्वात जुनी वसाहत 

माझे गाव औरंगाबाद : शहागंज … शहरातील सर्वात जुनी वसाहत
by Usha Gokhale pathak

इसवी सन १६१० मध्ये मलिक अंबरने मुघल बादशाह जहांगीर च्या सैन्याचा पराभव करून खडकी ह्या गावावर कब्जा केल्यानंतर तिथे स्वतःला राहण्यासाठी नौखंडा महाल हे इमारत संकुल बांधले तसेच अहमदनगरच्या निझामशहासाठी मोठा बादशाही महाल बांधला. विस्तीर्ण जागेवर पसरलेल्या ह्या महालात एकूण पाच इमारती होत्या. त्यापैकी राजमहल खुद्द बादशाहसाठी, रंगमहल, रूपमहल हे राज परिवारातील लोकांसाठी, आणि गगनमहल, दीपमहल हे बादशहाच्या दरबारातील लोकांसाठी अशी व्यवस्था होती. मलिक अंबरला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान होते. त्याने दिलेली ही नावे त्याच्या रसिकतेची साक्ष देतात.

इतके सगळे लोक इथे राहायला आल्यानंतर त्यांच्यासाठी रोजच्या जरुरीच्या वस्तूंसाठी बाजार असणे आवश्यक होते, त्यासाठी त्या परिसरात बाजार वसविला. त्याचे नाव शाहीगंज ( गंज म्हणजे बाजार) म्हणजेच आजचे शहागंज !! ह्या ठिकाणी प्रामुख्याने धान्य बाजार, भाजी बाजार, आणि कापड बाजार होता. पुढच्या काळात कधीतरी इथला धान्य बाजार मोंढा येथे स्थलांतरित झाला. कापड बाजार मात्र अजून आहे. शहर वाढत गेले तशी बाजारपेठ विस्तारत गेली. शहागंजचा बाजार मात्र आपले महत्व टिकवून आहे. रमजान ईद पूर्वी इथे एक महिनाभर मीना बाजार भरतो त्यासाठी पूर्ण भारतातून व्यापारी आपला माल घेऊन येतात. कापड, सुका मेवा आणि इतर उपयोगाच्या वस्तू इथे मिळतात त्यावेळी बाजार रात्रंदिवस गजबजलेला असतो.

या भागाचे मुख्य आकर्षण असते ते रात्री भरणारा खाद्य मेला !! तऱ्हे तऱ्हेच्या मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांचा दरवळ पट्टीच्या खवैयाना इथे खेचून आणतो.इथे मिळणारा औरंगाबादचा खास पदार्थ म्हणजे नान खलिया म्हणजे मटणाचा रस्सा आणि त्यासोबत विशिष्ट प्रकारे भाजलेले नान! हा पदार्थ मुहम्मद तुघलक च्या काळात निर्माण झाला असे म्हणतात.

बादशाही महल मध्ये अहमदनगरच्या निझामाचे वास्तव्य होते. मलिक अंबरच्या मृत्यू नंतर मुघलांनी परत हा प्रांत जिंकून घेतला. दख्खनचा सुभेदार म्हणून औरंगझेब इथे आल्यानंतर काही काळ तो ह्या महालात राहिला. पुढे त्याने किलेअर्क इथे आपले बस्तान हलविले. इसवी सन १७२४ मध्ये दख्खनचा सुभेदार मीर कमरुद्दीन खान सिद्दिकी ह्याने बंडखोरी करून निझाम उल मुल्क फतेह्जंग ( ही खरंतर मुघलांनी त्याला दिलेली पदवी) या नावाने स्वतःचे राज्य घोषित केले आणि तो ह्या महालात राहिला. त्याच्या चौथ्या पिढीने निझामशाही हैदराबाद येथे हलविल्यानंतर त्यांचे दिवाण महाराजा चंदुलाल यांनी हा परिसर निझामाकडून विकत घेतला. त्यांचे वंशज महाराजा किशन प्रसाद यांनी ह्या परिसरात भाजी मंडी वसविली. तिथे भाजीचा घाऊक बाजार अजूनही भरतो. रविवारचा बाजार ह्या नावाने तो ओळखला जातो.

काळाच्या ओघात महालाचे सर्व वैभव नष्ट 
आज या महालाची एकही खूण शिल्लक नाही. ह्या जागेवर १९७५ पर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन चा मुख्य बस थांबा होता. १९७५ मध्ये हा थांबा सध्याच्या जागेवर म्हणजे आजच्या सिध्दार्थ उद्यानाशेजारी गेला. शहागंजची जागा रिकामीच पडली आहे.

शहागंज मस्जिद

शहागंज परिसरातील एक महत्वाचे ठिकाण म्हणजे शहागंज मस्जिद होय. सुमारे सव्वाशे फूट लांब आणि पन्नास फूट रुंद अशी ही भव्य मस्जिद चारशे वर्षापूर्वी हसन अली आणि हुसैन अली या दोघा भावांनी बांधली. जगभरच्या सर्व मस्जिद प्रमाणेच इथली मेहराब म्हणजे नमाज पढण्याची जागा मक्केच्या दिशेला आहे आणि मक्के कडे तोंड करून इथे नमाज पढली जाते. इथल्या संगमरवरी खांब आणि कमानींवर सुंदर नक्षी आहे आणि वरच्या बाजूला कुराणातील वचने लिहिलेली आहेत. जमिनीपासून दहा बारा फूट उंचावर बांधलेली ही मस्जिद इस्लामी स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. समोर वजू करण्यासाठी पाण्याचे टाके आहे. आणि त्यामध्ये एकाच दगडातून कोरलेले संगमरवरी कारंजे आहे. दोन्ही बाजूनी उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि खाली दोनशे फूट लांब आणि शंभर फूट रुंद पाण्याचा हौद आहे. आज हा हौद कोरडा असला तरी एकेकाळी पाण्याने भरलेला असायचा आणि ते पाणी आसपासच्या लोकांना वापरण्यासाठी मिळत असे. भरलेल्या हौदाचे दृश्य कल्पनेने डोळ्यासमोर आणल्यावर अचंबा वाटल्याशिवाय रहात नाही.
मशिदीच्या पूर्वेला चमन आहे. चमन म्हणजे बगीचा मात्र इथे आज बगीचा शिल्लक नाही. एकेकाळी इथे लोक संध्याकाळी फिरायला येत असत. ह्या चमन मध्ये भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा अर्ध पुतळा आहे.
शहागंज परिसरातील आणखी एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे बने मियां यांचा शंभर वर्ष जुना दर्गा ! हिंदू मुस्लीम ऐक्याचे ते जिवंत उदाहरण आहे. बने मियां हे सुफी संत मूळ सिंध प्रांतातले. ते जन्मतः “वली” होते. ( वली म्हणजे अर्धवट मंदबुद्धी). सैन्यात असलेल्या आपल्या मोठ्या भावा सोबत ते औरंगाबादला आले. त्यांच्या भावाने त्यांना वारंगळ येथील एका गुरूकडे नेले आणि गुरुकृपेने त्यांच्यात सुधारणा झाली. औरंगाबादला परतल्यावर ते शहरात फिरत असताना त्यांची भेट संत बाळकृष्ण महाराज (शहरात नागेश्वरवाडी येथे त्यांचा मठ आणि समाधी आहे) यांच्याशी झाली. दोघांची मैत्री झाली आणि दोघे तासंतास एकमेकांशी बोलत बसत. इथे दर्शनाला येणाऱ्या मध्ये हिंदू भाविकांची संख्या खूप आहे. इथून बाळकृष्ण महाराज यांच्या मठात प्रसाद पाठविला जातो आणि तसाच तिथून इकडे येतो.

शहागंज येथील घड्याळाच्या मनोऱ्याचा उल्लेख केल्याशिवाय शहागंज चे वर्णन पूर्ण होणार नाही. मस्जिद आणि चमन यांच्या मधल्या जागेत हा मनोरा आहे. हैदराबादचे सहावे निझाम मीर महबूब अली खान यांच्या राज्यारोहणाच्या रौप्य महोत्सवा निमित्त हा मनोरा १९०१ ते १९०६ या काळात बांधला गेला. याचे बांधकाम गोथिक शैलीचे आहे आणि वरती असलेला घुमट इस्लामी स्थापत्याची खूण दाखवतो. याच्या प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूला वेरूळच्या कैलास लेण्यातील गजांत लक्ष्मीची प्रतिमा कोरलेली आहे.

औरंगाबादच्या बहुरंगी संस्कृतीचे हे प्रतिक म्हणायला हरकत नाही.

बाजारपेठ वसल्यानंतर थेट गुजरात आणि मारवाड येथून व्यापारी समाज येथे आला आणि त्यांनी शहागंज च्या आसपासच्या परिसरात धावणी मोहल्ला, कुंवार फल्ली आणि खाराकुंवा इथे वसती केली. त्याबद्दल पुढील लेखात !

Photo credit : Abhay Kolte

What do you think?

Written by Admin

CityKatta : Aurangabad's own social media platform

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

Ahead of the rail budget, the railway activists have reiterated the demands for better rail connectivity to Mumbai, Nagpur and Pune

Nirmala Sitharaman at FICCI: Goverment looking at joint ventures in ordnance sector