खरंतर शिवाजी महाराजांचा इतिहास शोधत गेले तर तो खूप खोलवर सापडतो. पण, शिवाजी महाराजांच्या इतिहासाची खरी सुरुवात होते ती त्यांच्या पंजोबांपासून. बाबाजीराजे भोसले हे औरंगाबाद शेजारी असलेल्या वेरूळ या गावात पाटीलकी सांभाळत होते. बाबाजीराजे यांना २ मुले होती. मालोजी आणि विठोजी हे दोन्हीही मुले कर्तबगार आणि शूर होते. या दोघांनीही नगरच्या निजमशाहीकडे मोठ्या हुद्द्यावर चाकरी स्वीकारली होती. दोघांच्याही पराक्रमावर निजामशाही खूप खुश होती. पण, इतिहासाची पाने आणखी उलगडायची बाकी होती. ती शहाजी राजांच्या निमित्ताने…
स्वराज्यात पुरंदरचा अवघड तह झाला आणि त्या तहानंतर शिवाजी महाराजांना बादशाह औरंगजेबाने दिल्लीला बोलवले. मिर्झाराजे जयसिंग यांच्या विनंतीवरून १६६५ रोजी शिवाजी महाराज दिल्लीला जाण्यास निघाले. शिवाजी महाराजांचा मार्ग रायगडावरून नगर-शेवगाव-पैठण आणि औरंगाबाद असा होता. संभाजी महाराज हेही सोबत होतेच. औरंगाबाद जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा पहिला मुक्काम पडला तो पैठणला. पैठणला मुक्काम झाल्यानंतर शिवाजी महाराज बिडकीन बाभूळगाव या मार्गे औरंगाबादेत दाखल झाले. शिवाजी महाराज औरंगाबादेत दाखल झाले तेव्हाचे वर्णन भीमसेन सक्सेना या समकालीन इतिहासकाराने नमूद करून ठेवलेले आहे आणि ते फार रोमांचक सुद्धा आहे. शिवाजी महाराज हे ५०० घोडदळ आणि ५०० पायदळ आणि इतर पूरक मनुष्यबळासह शहरात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांचा लवाजमा हा डोळ्यात भरण्यासारखा होता.
शिवाजी महाराजांचे मूळ वंशज याच भागातले होते. त्यामुळे त्यांचे चाहतेही औरंगाबाद आणि परिसरात खूप होते. त्यातच शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची किर्तीही सर्वदूर पोहोचली होती. शिवाजी महाराज औरंगाबाद शहरात प्रवेश करत असताना भीमसेन सक्सेना संगतात त्याप्रमाणे, शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी शहरातील आणि आसपासच्या खेड्यातील नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. अनेक किलोमीटर चालून लोक शिवाजी महाराजांना पाहण्यासाठी आले होते. औरंगाबाद शहराची गल्ली-बोळ माणसांनी फुलून गेला होता. इतकी तोबा गर्दी झाली होती. तशी त्यांना भेटण्यासाठी हितचिंतकांचीही प्रचंड गर्दी राजवाड्यात झाल्याचा उल्लेख या समकालीन इतिहासकाराने केलेला आहे.
शिवाजी महाराज हे औरंगाबाद शहरात दाखल झाल्यानंतर त्यांचा मुक्काम हा जयसिंग पुऱ्यातील मिरझा राजे जयसिंगच्या वाड्यात होता. त्या वाड्याच्या ठिकाणी आता श्रीकृष्ण अपार्टमेंट उभे असल्याचे अनेक इतिहासकार सांगतात. यानंतर तब्बल ३ दिवस शिवाजी महाराज हे औरंगाबाद शहरात मुक्कामी होते. या मुक्कामात त्यांनी आसपासचा बराचसा परिसर फिरला असल्याचेही अनेक दाखले उपलब्ध आहेत. यानंतर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाने प्रवासासाठी उपलब्ध करून दिलेले १ लाख रुपये औरंगाबाद येथून घेऊन आग्र्यासाठी रवाना झाले.
या ३ दिवसांशिवाय शिवाजी महाराज पुन्हा औरंगाबादला आल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. मात्र, आग्र्याहून आक्रमण केले होते आणि सुरत प्रमाणेच जालन्याचीही बाजारपेठ लुटून नेल्याचे इतिहासात नमूद आहे.
औरंगाबाद शहाराला पवित्र करून टाकणाऱ्या त्या ३ दिवसानंतर शिवाजी महाराज पुन्हा कधीही औरंगाबादेत आले नसले. तरी, त्यांची मुळे मात्र याच मातीतली होती. आजही वेरूळ या ठिकाणी मालोजीराजे यांची गढी अस्तित्वात असून, त्याठिकाणी आता एक छोटेखानी स्मारकही उभे करण्यात आले आहे.
GIPHY App Key not set. Please check settings