औरंगाबादमध्ये अल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करणार: सुधीर मुनगंटीवार

0
94

औरंगाबादमध्ये अल्पसंख्याक कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्र्यांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच लवकरच याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याच्या सुचना त्यांनी केल्या असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. नुकतीच याबाबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आ. वारिस पठाण, इम्तियाज जलील, अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत आमदार जलील यांनी, ‘औरंगाबादला डीएमआयसी प्रकल्प होत आहे. उद्योजकांना कुशल मनुष्यबळ मिळावे यासाठी औरंगाबादलाच कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करावे,’ अशी मागणी केली. या मागणीला बैठकीत मंजुरी देण्यात आली. या विद्यापीठासाठी जागा निश्चित करून, प्रस्ताव तयार करण्याचे देण्याचे आदेश देण्यात आले. हा प्रस्ताव मिळाल्यानंतर शंभर कोटी रुपये केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाकडून आणण्याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी दिली. या विद्यापीठासाठी जागा देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम तसेच अल्पसंख्यांक विभागाचे सचिव श्याम तांगडे यांना दिले आहेत.

अल्पसंख्याक विकासाच्या विषयांबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा होणे आवश्यक असून राज्यातील सर्व अल्पसंख्याक विधिमंडळ सदस्यांसमवेत केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. तसेच अल्पसंख्याक कौशल्य विकास विद्यापीठासाठी जागेचा शोध घेण्यात यावा, या विद्यापीठास तसेच यातील कौशल्य विकास विषयक कार्यक्रमासाठी निधी देण्याबाबत केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्र्यांनी स्वत:हून तयारी दर्शविली असल्याचे ते म्हणाले. सदर कार्यक्रम यशस्वी झाल्यास देशातील पहिले अल्पसंख्याकांसाठीचे स्वतंत्र कौशल्य विकास विद्यापीठ स्थापन करण्याचा बहुमान महाराष्ट्राला मिळणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here