महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची अनेक वर्षांची मागणी लवकरच मार्गी लागणार आहे. औरंगाबाद शहरात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी दोनशे ते अडीचशे एकर जागा लागणार आहे.
औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्यादृष्टीने चाचपणी करण्यात येत आहे. त्यासाठी क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकारी शहरात येऊन गेले. क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी किमान दोनशे ते अडीचशे एकर जागा लागणार आहे. जागेची उपलब्धता पाहण्यासाठी हे अधिकारी आले होते. जागेची उपलब्धता झाल्यानंतर क्रीडा विद्यापीठाचा आरखडा तयार करण्यात येणार असल्याचे समजते. खेळापुरताच क्रीडा विषय मर्यादित राहिलेला नाही. खेळाला अन्य विविध विषय जोडले गेले आहेत. त्यादृष्टीने क्रीडा विद्यापीठाची गरज आहे. औरंगाबाद शहर हे महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी येते. त्यामुळेच क्रीडा विद्यापीठ औरंगाबादेत व्हावे यावर राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सहमती दर्शवल्याचे समजते. क्रीडा विद्यापीठाला जागा मिळाल्यानंतरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जागा उपलब्ध होणे हाच मुख्य विषय आहे. त्यानंतरच विद्यापीठ स्थापनेविषयी हालचाली सुरू होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
सिडकोचे क्रिकेट मैदान क्रीडा खात्याकडे
सिडकोतर्फे गोलवाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येत आहे. क्रिकेट स्टेडियम उभारणी झाल्यानंतर ते मैदान क्रीडा खात्याकडे सुपूर्द केले जाणार आहे. या प्रस्तावाला क्रीडा खात्याने मंजुरी दिली आहे. न्यूझीलंडच्या धर्तीवर हे स्टेडियम उभारण्यात येत आहे. या ठिकाणी अन्य सुविधाही निर्माण करण्यात येणार आहेत.
क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागेविषयी चर्चा झाली. संबंधितांनी औरंगाबाद शहर, परिसरात जागा उपलब्धेविषयी विचारणा केली. अद्याप हा विषय प्राथमिक स्तरावर आहे.
– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी.