‘स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर’ची पळवापळवी..

0
452

‘स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर’ची पळवापळवी..

मराठवाड्याला दिले काय हो तुम्ही?
एक प्रकल्प जो साडेतीन वर्षात मराठवाड्याला मिळाला आणि त्याची उभारणी डोळ्यांना सुखद वाटेल अशी आहे. सगळा पळवापळवीचा खेळ सुरू आहे. याची सुरुवात झाली भारतीय खेळ प्राधिकरणातून. येथे १०८ एकरचा विस्तीर्ण परिसर असताना नागपूरच्या उजाड मैदानात हे केंद्र नेले गेले. आयआयएम देतो म्हणून सांगितले आणि हळूच डोक्यात दगड पडावा तसे हे शैक्षणिक केंद्र विदर्भाकडे नेले गेले. अनेक दिवसांनी एक सुखद बातमी आली, स्कुल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर ही शैक्षणिक संस्था औरंगाबादेत येण्यासाठी आपण पाठपुरावा करू याचे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले. याला पुरता पंधरवडा उलटत नाही की, सरकारनेच नवी जखम दिली. ही संस्था पुण्यात होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच केंद्राला पत्र दिल्याची वार्ता अगदी कानात तापलेले शिसे ओतणारी ठरली.

सरकार म्हणून दिलंय काय हो तुम्ही आम्हाला?

धुळे सोलापूर मार्ग काँग्रेस सरकारच्या काळातला, त्या रस्त्यावर एक औट्रम घाटाचा एक बोगदा अजून मंजूर होत नाही तुमच्याकडून.. डीएमआयसी प्रकल्प युपीए सरकारने दिलेला, तिथे येऊ घातलेले उद्योग नागपूर आणि गुजरातला पळवले गेले… शांघाय, कियासारख्या कंपन्या ओरबाडून नेताना जनाची नाही तर मनाची सुद्धा नाही राहिली हो तुम्हाला…. खड्डेमुक्तीचा विडा उचलणारे मंत्री कधी मराठवाड्याकडे पाहितील का, की येथील खड्डे ६० टक्क्यांपेक्षा अधिक का नाही भरले गेले नाही? शहरालगतचा बायपास एक हजार कोटींचा असला तरी त्या आयत्या पिठावर रेगोट्याच आहेत हे विसरू नका.
जालना रोडचे रुपडे पालटावे एवढी माफक अपेक्षा शहरवासीयांना ठेवलेली असताना या शहराला १०० कोटी रुपये देण्यासाठी तुम्ही अजूनही टाचा घासायला लावताय. ते देऊन उपकार नाहीत केले तुम्ही, जकात बंद केलीये तुम्ही आमची, हक्क आहे मागण्याचा आणि देणे हे तुमचे कर्तव्य होते. नागपूरला मेट्रोसाठी नेलेले ७५०० कोटी आम्हाला दिसले नाहीत, असे का तुम्हाला वाटते? अगोदरच्या राज्यकर्त्यांनी मराठवाडा नागवला जरूर पण असे पाप ते निदान उजळ माथ्याने तरी करत होते. तुमच्या सारखी ‘बोली भजन आणि नियत कवाली’ असे धंदे तर त्यांचे नाहीत. अगोदरच्या राज्यकर्त्यांचे आभार मानावेत विधी विद्यापीठासाठी. (किती वेदना होत असतील ना अशी चांगली संस्था मराठवाड्याच्या पदरी पडली यासाठी…) विकासाशी ते जेवत असताना त्यांचे खरकटे थोडे तरी खाली सांडत होते, पण तुम्ही तर या पळवापळवीचे मुकुटमणीच निघालात. आश्चर्य तर याचे आहे की, तुमच्या पक्षाचे इथले लोक हा तोंड दाबून होणारा बुक्क्यांचा मारा कसा झेलतात, की बौद्धिकातून त्याची पण सवय लावलीये का तुम्ही?..

यंदाचे हिवाळी अधिवेशन महाराष्ट्राचे होते की फक्त विदर्भाचे हे कोडे अजून सुटत नाही. दररोज जिल्हानिहाय प्रकल्पाच्या आढावा बैठका तुम्ही घेतल्या पण ते सगळे जिल्हे विदर्भाचे होते हे तुमचे ट्विट सांगतात की हो, मागासलेले असलो तरी थोडेफार वाचतो आम्ही. अहो आम्ही महाराष्ट्राचा भाग आहोत याचा भास होईल अशी एखादी तुमची कृती नजरेस पडू द्या आमच्या.

असो.. दारी आलेल्या भिकाऱ्यालाही मायेने आपल्या भाकरीतील तुकडा मराठवाडा देत आला आहे. खिलजी, तुघलग, मुघल, निझाम राजवटी आम्ही सहज पचवल्या आहेत, त्यात तुमची एक भर.. आज आम्ही अंगावरचे कपडे पण काढून ठेवावे म्हणतोय.. कमी पडले तर अवश्य येऊन घेऊन जा…!!

आदित्य वाघमारे

Previous articleSchool of Architecture and Planning going to Pune from Aurangabad?
Next articleAurangabad Airport gear up for UDAN scheme with new instruments
CityKatta : Aurangabad's own social media platform

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here