नायगांवचा किल्ला: सुतोंडा

0
270
Photo © Saili Palande-Datar

औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ले म्हणले की यादी कदाचित देवगिरीपासून सुरु होऊन दौलताबादपर्यंत संपेल.. मात्र असा विचार करताना उत्तरेकडील कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांची सीमारेषा असणाऱ्या अजिंठा डोंगररांगा थोडया दुर्लक्षितच राहतात.. नाही!! ….. ह्या डोंगरपट्ट्यामध्ये जशी अजिंठ्यासारखी जागतिक वारसास्थळाचा दर्जा असलेली लेणी आहेत. अतिप्राचीन पितळखोरा, घटोत्कच लेणी आहेत, गौताळा अभयारण्याचा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भूभाग आहे. तसेच दक्खनच्या उत्तरेकडून येणाऱ्या आक्रमणांवर नजर ठेवायला मध्ययुगीन राज्यकर्त्यांनी येथील डोंगरांचा योग्य उपयोग करत बांधलेल्या वेताळवाडी, अंतुर, जंजाळासमान अनेक किल्ले आहेत. त्यांच्याविषयी मात्र आपल्याला फारच कमी माहिती आहे.

अशाच किल्ल्यांच्या मालिकेमधला एक गुढरम्य किल्ला म्हणजे आपला नायगावचा सुतोंडा, सितोंडा किंवा सायतोंडा. २०२८’११.७” उ. अक्षांश व ७५२१’१९.५” पू. रेखांशांवर आणि समुद्रसपाटीपासून ४३५ मी. उंचीवर असलेला हा किल्ला. सोयगाव तालुक्यातील हिवरा नदीच्या काठावर वसलेले बनोटी हे किल्ल्याजवळचे मोठ्या लोकसंख्येचे गाव. बनोटीहून दक्षिणेला काही अंतरावरील नायगाव, वाडी सुतोंडा गावांतून किल्ल्याकडे रस्ते जातात.

इतिहास:
त्रिकोणी आकाराचा हा गड कुणी, कधी आणि का बांधला ह्याबद्दल इतिहास अजून मौन बाळगून आहे. गड चढताना दिसणाऱ्या लेण्यांवरून बाराव्या-तेराव्या शतकातील यादव काळात ह्या डोंगरावर जाग होती हे समजते. मात्र त्या काळात किल्ल्याची निर्मिती झाली असावी का ह्यावर भाष्य करणे पुरातात्त्विक पुराव्यांअभावी अवघड आहे. कदाचित आजूबाजूच्या कुणा शूर मराठी सरदाराने ह्या प्रदेशावर हुकुमत गाजवण्यासाठी किल्ला बांधलेला असण्याची शक्यता आहे. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला किल्ला निझामशहाकडे असावा. १८८४ साली छापलेल्या औरंगाबाद दार्शनिकेत लिहिल्याप्रमाणे “बादशाहनामा” ह्या ग्रंथात लिहिल्यानुसार मुघल बादशहा शहाजहानच्या आज्ञेवरून मुघल सरदार सिपहंदरखानाने इसवी सन १६३०-३१ मध्ये मोठ्या फौजेच्या सहाय्याने सितोंडा किल्ल्यावर स्वारी केलेली पाहून तेथील किल्लेदार सिद्दी जमालला शरणागत पत्करण्याशिवाय इलाज राहिला नाही…. अजिंठा डोंगररांगांमधील ही किल्ल्यांची साखळी पाहता सुतोंडासारख्या किल्ल्यांनी मध्ययुगात उत्तरेतून दक्खनवर होणाऱ्या आक्रमण थोपविण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेली असणार. फक्त त्यांचे ऐतिहासिक दाखले मिळवण्यासाठी आणखी बरेच संशोधन आवश्यक आहे.


स्थापत्यरचना:

सुतोंडा चढताना “जोगणमाईचे घरटे” किंवा “जोगवा मागणारणीचे घर” अशा स्थानिक नावाने ओळखले जाणारे लेणे पाहायला मिळते. काही इतिहास संशोधक हे लेणे हिंदू असावे असे मानतात तर नवीन अभ्यासानुसार प्रवेशद्वारातील ललाटबिंबावरील तीर्थंकराची प्रतिमा आणि लेण्याच्या आतमध्ये आढळलेल्या मांडीवर मूल घेतलेली अंबिका यक्षी आणि सर्वानुभूती यक्षाच्या प्रतिमा हे ह्या लेण्याचे नाते जैन धर्माशी जोडते.

किल्ल्याचे पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार आणि त्याबाजूची तटबंदी आज अतिशय जीर्ण अवस्थेत उभे आहेत. ह्या तटबंदीतील फक्त ४ बुरुज आज आपल्याला दिसतात. इतर बाजूंची तटबंदी तर अगदीच अवशेषरूपाने उरलेली आहे. सुतोंडा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण बाजूचा डोंगर आणि किल्ला जोडणारा भाग चक्क कापून काढत बनवलेली खिंड आणि तीतून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठीचा छोटा दरवाजा. खिंडीचा किल्ल्याकडचा भाग कड्यासारखा तासून काढत त्यातच एखादा चोरदरवाजा असावा त्याप्रमाणे हे छोटे प्रवेशद्वार कोरून काढले आहे. अधिक संरक्षणार्थ कड्यावर विटांची एक भिंत बांधलेली आहे. तिथून आतमध्ये इंग्रजी “Z” सारख्या वळणावळणाच्या मार्गाने किल्ल्यात प्रवेशता येते. ह्या प्रवेशद्वारावरुन गडाच्या मध्ययुगीन सामरिक स्थापत्यरचनेविषयी पुसटशी कल्पना येते.

मशिदीचे अवशेष, दोन कबरी आणि एकेकाळच्या भव्य वाड्याचे जीर्णावशेष सोडल्यास किल्ल्यात इतर इमारतींचे बांधकाम आज शिल्लक नाही.

आजपर्यंत आपण पाहिलेल्या सर्व किल्ल्यांवर उत्तम जलव्यवस्थापनाची सोय आहे. सुतोंडासुद्धा ह्याला अपवाद नाही. ही पाणीव्यवस्था खापरी नळ, हौद अशी नसून चक्क किल्ल्यावर विविध ठिकाणी पाण्याची टाकी कोरलेली आहेत. त्यातील दोन टाकी तर लेण्याप्रमाणे कोरून काढलेली असून त्यांचे छत सुबक, थोडी नक्षी असलेल्या दगडी खांबांनी तोललेले आहे. अनेक टाक्यांचे मिळून बनलेले राख टाके, कवडी टाके, हिरव्याशार पाण्याने भरलेले टाके अशी एक ना अनेक. खरेतर इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याचे कारण मात्र समजत नाही.

असा हा सुतोंडा किल्ला आज कुणाच्याच अखत्यारीत नाही. हा किल्ला दुर्लक्षित असला तरी इथे भेट देऊन ह्या किल्ल्याचा अनुभव घेण्याचा आणि शक्य झाल्यास त्याचा अजून इतिहास शोधण्याचा जरूर प्रयत्न करावा.

Google Map:

Aurangabad to Sutonda:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here