in ,

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करा पालकमंत्री सुभाष देसाई

  • रेड झोन मधील चाचण्या अधिक वाढवा
  • लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा
  • रुग्णांचा वाढती संख्या कमी करण्याचे आवाहन

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासन स्तरावरून लागणारी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली. तसेच औरंगाबाद शहरातील 13 रेड झोनमधील चाचण्या अधिकाधिक वाढवून रुग्णांची संख्या वाढणार नाही, यासाठी सर्वोतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पोलिस प्रशासनाने अधिक कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही श्री. देसाई यांनी यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोंदवले, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य् चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, औषधकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, मनपाच्या आरोग्य अधिकारी नीता पाडळकर, उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. किरवले यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, सध्या आरोग्य क्षेत्राला निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे इतर महत्त्वाच्या क्षेत्राबरोबरच प्राधान्याने आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक साधनसामुग्री यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढणार नाही यासाठी सर्व यंत्रणेकडून चोखपणे कार्य होते आहे. तरीही सध्या औरंगाबाद शहरातील 13 रेडझोनमध्ये अधिक वाढ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असल्याने या विषाणूचा प्रसार वेळीच थांबवावा. या कोरोनाचा प्रसार यापुढे अधिक होऊ न देता, यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वोतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागासाठी लागणारे मनुष्यबळ, इतर साधनसामुग्रीही तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) येथे करण्यात येत असलेल्या चाचण्या आणि त्यांची गती समाधानकारक व कौतुकास्पद आहे, असेही श्री. देसाई म्हणाले.

सुरूवातीला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्हयात करण्यात आलेल्या उपाययोजना, औरंगाबाद शहरातील कंटेंटमेंट झोन, कंटेंटमेंट क्लस्टर, लॉकडाऊनबाबतची अंमलबजावणी, विविध संस्थांनी घेतलेला पुढाकार, आरोग्य यंत्रणेत समन्वय असावा यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, अन्नधान्य वितरण आदींबाबत श्री. देसाई यांना सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनंतर मनपा आयुक्त श्री.पांडेय यांनी शहरात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, मनपा करत असलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या रूग्णांची संख्या, त्यांचा वयोगट, रुग्ण वाढण्याची कारणे, कोरोनाबाधित परिसर, मनपा कडून क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरविण्यात येत असलेली सुविधा, संस्थात्मक क्वारंटाईन सुविधा, पाणी पुरवठा, रूग्ण शोधण्यासाठी वापरण्यात येत असलेली पद्धत, चाचणींची संख्या, पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी बसचा वापर, त्यात घेण्यात येत असलेली काळजी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात येत असलेल्या सुविधा, रुग्ण सापडण्यासाठी वापरण्यात येत असलेली पद्धत आदींबाबत सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तर रेड झोन परिसरात मोठ्याप्रमाणात मोबाइल स्वॅब कलेक्शन करण्यात येत आहेत, असेही श्री. पांडे यांनी सांगितले.

ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील लोक जागृत झालेले आहेत. लॉकडाऊनचे मोठ्याप्रमाणात सकारात्मकपणे पालन ग्रामीण भागात होते आहे. आतापर्यंत केवळ दौलताबाद येथे केवळ दोन रुग्ण आढळलेले आहेत, असे श्री. गोंदवले यांनी सांगितले.

शहरात सुरूवातीला रात्री सातनंतर, त्यानंतर पाचनंतर मग दुपारी एकनंतर आणि आता केवळ सकाळी 11 नंतर पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी पोलिस विभागासह एसआरपीएफच्या जवानांचीही मदत यासाठी घेण्यात येत आहेत. कंटेंटमेंट झोन, क्लस्टर या ठिकाणी कडकपणे अंमलबजावणी होत आहे. तसेच शहरात इतरत्रही चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कंटेंटमेंट झोन, क्लस्टरच्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू तिथेच उपलब्ध करून देत आहोत, असे पोलिस आयुक्त श्री. प्रसाद यांनी सांगितले. तर औरंगाबादच्या ग्रामीण भागास नगर, नाशिक जिल्ह्याच्या सीमा असल्याने छुप्या पद्धतीचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. सुरूवातीलपासूनच लॉकडाऊन अत्यंत कडकपणे ग्रामीण भागात पाळण्यात येत आहे, असे श्रीमती पाटील यांनी सांगितले.
डॉ.येळीकर म्हणाल्या, सध्या घाटीमध्ये आवश्यक त्या सुविधा पुरविलेल्या आहेत. लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलही चालू करण्यात येईल. परंतु घाटी प्रशासनासमोर मनुष्यबळांची कमतरता आहे. म्हणून 50 डॉक्टर्स, 100 परिचारिका, 50 चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच घाटीतील डेडिकेटेड कोविड रुग्णालय, त्यात रुग्णांना देण्यात येत असलेले उपचार, या शिवाय नॉन कोविड रुग्णांसाठी रुग्णालयाकडून देण्यात येणारी सुविधा याबाबतही सविस्तर माहिती त्यांनी श्री. देसाई यांना दिली. घाटीच्या डॉ. भट्टाचार्य यांनीही कोविड आजार, सारी आजार त्यांची लक्षणे आदीबाबत माहिती दिली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी यांनीही रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांबाबतच्या सुविधा, उपचार पद्धती, रुग्णालयाची क्षमता आदींबाबत माहिती दिली. तसेच मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगितले. मनपाच्या डॉ.पाडळकर यांनी शहरात आतापर्यंत 277 सारीच्या रुग्णांची कोविड चाचणी केली. त्यापैकी केवळ दोन कोरोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाल्याचे सांगितले. मनपाच्या अपर्णा थेटे यांनीही कोरोनाबाधित रुग्ण शोधून काढण्यासाठी चमूकडून करण्यात येत असलेल्या कार्याबाबत सविस्तर माहिती दिली. तर श्री. किरवले यांनी पुरवठा ‍विभागाकडून वितरीत करण्यात येत असलेल्या अन्नधान्य वितरणाबाबत माहिती दिली.

What do you think?

Written by Admin

CityKatta : Aurangabad's own social media platform

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

आज दिवसभरात ४७ नवीन रुग्ण; औरंगाबादेत कोरोना रुग्णांची एकूण संख्या १७७

शहरातील कोरोना बाधितांची संख्या दोनशे पार: आज दिवसभरात ३२ नवीन रुग्णांची भर