तीन नवीन रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; एक रुग्ण घाटीत, दोन मिनी घाटीत
गुरुवारी शहरात तीन नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली असून औरंगाबादमधील एकूण रुग्ण संख्या २८ वर गेली आहे. जिल्हा रुग्णालयात (मिनी घाटी) दाखल रुग्णांपैकी दोघा जणांचा अहवाल कोविड 19 विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे मिनी घाटीचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. तर घाटीत प्रकृती गंभीर असलेल्या 65 वर्षीय महिला रुग्णाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोना बाधित असलेली ६५ वर्षीय महिला बिस्मिला कॉलनी येथील रहिवाशी असून, त्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत होत्या, 13 एप्रिल पासून ती शासकीय रुग्णालयाच्या मेडीसीन विभागात भरती करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह मुलाची गरोदर आईही पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर किराडपुरा येथे आणखी एक २२ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. मंगळवारी सायंकाळी बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. १० एप्रिल रोजी हा मुलगा आई-वडिलांसह शहरात आला. यानंतर बुधवारी मुलाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला. या १७ वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह मुलाच्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आईचाही स्वब घेण्यात आलेला होता. हा अहवाल काय येतो, याकडे लक्ष लागले होते. अखेर हा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. तर किराडपुरा येथे आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची बाधा झाली आहे.
घाटीतून मिनी घाटीस 13 जणांचे कोविड (कोरोना) तपासणी अहवाल प्राप्त झालेत. या अहवालामध्ये चौदा दिवस पूर्ण करणाऱ्या एका अन्य रुग्णाचा देखील समावेश आहे. त्या व्यक्तीचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या रुग्णावर मिनी घाटीत उपचार सुरूच राहतील. मिनी घाटीत आज 72 रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी 17 जणांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. 52 जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत. घाटीकडून मिनी घाटीस आज प्राप्त झालेल्या अहवालांपैकी उर्वरित 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात एकूण 22 पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.
तर घाटीत 15 कोविड संशयित रुग्ण, 10 कोविड निगेटिव्ह व एक पॉझिटिव्ह असे एकूण 26 रुग्ण भरती आहेत. आज घाटीत 36 जणांची तपासणी करण्यात आली, त्यात तीन नवीन कोविड संशयित रुग्ण भरती झाले आहेत, असे डॉ. गायकवाड म्हणाले.
औरंगाबादमधील एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या : २८
उपचार सुरु असेलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या : २४
मृत्यू झालेले एकूण रुग्ण : २
बरे झालेले रुग्ण : २
GIPHY App Key not set. Please check settings