मराठा क्रांती मोर्चाच्या गुरुवारच्या अांदाेलनादरम्यान वाळूज एमअायडीसीतील सुमारे ६० ते ७० कंपन्यांत झालेली जाळपोळ आणि तोडफोडीमुळे देशाच्या औद्योगिक नकाशावर औरंगाबादची माेठी बदनामी झाली. या घटनेने आम्ही भयभीत झालेलो असलो तरी उमेद सोडली नाही. आम्ही अाैरंगाबाद साेडून कुठेही जाणार नाही. विदेशी कंपन्यांनादेखील धीर देऊ.
आतापर्यंत आम्ही समाजासाठी काम केले आहे आणि यापुढे करतच राहू,’ अशा भावना वाळूजमधील उद्योजकांच्या बैठकीत शुक्रवारी व्यक्त करण्यात अाल्या. ‘आमचा कोणत्याही आंदोलनाला विरोध नाही, पण प्रत्येक आंदोलन हे लोकशाही मार्गानेच झाले पाहिजे असा आमचा आग्रह आहे,’ असेही हे उद्योजक म्हणाले.
सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले यांच्या अध्यक्षतेखाली वाळूजमधील उद्योजक आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. प्रचंड भीतीने ग्रासलेलो असलाे तरी हिंमत न हरता फीनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घेण्याचा निर्धार बैठकीत उद्याेजकांनी व्यक्त केला. ‘यापुढे असा प्रसंग होणार नाही याची काळजी नक्कीच आम्ही घेऊ. आता सकारात्मक मनाने कंपनीत जा आणि पोलिसांना सहकार्य करा. पोलिसांना तक्रार द्या. पोलिसांनी वाळूज वाचवले म्हणून ते एक दिवसाच्या दंगलीवर निभावले. त्यांनी संयम सोडला असता तर आणखी आठ दिवस वाळूज पेटत राहिले असते,’ असे राम भोगले म्हणाले. आम्ही सर्व कर भरतो, पण आमच्या कंपन्या जाळताना कोणीच आले नाही, अशी खंत उद्योग भारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य यांनी व्यक्त केली.
दंगलखाेरांना कुठेच राेजगार मिळणार नाही
दंगलखोरांना आम्ही कदापि क्षमा करणार नाही. हे दंगेखोर जर आमच्या कंपन्यांतील असतील तर त्यांना कामावरून काढू टाकू आणि नसतील तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कुठेच रोजगार मिळणार नाही याची काळजी घेऊ,’ असा इशाराही वाळूजमधील उद्याेजकांच्या बैठकीतून देण्यात अाला.
वाळूजमध्ये CCTV फुटेजमधून ओळख पटवून अटकसत्र सुरू; औरंगाबादेत 20 जणांना अटक
वाळूज परिसरात कंपन्याची तोडफोड करणाऱ्या जमावावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून गुरुवारी सायंकाळी घडलेला हा प्रकार ९३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला आहे. या फुटेजमधून ओळख पटवून पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. याच्या तपासासाठी विशेष तीन पथके तयार केली आहेत. विशेष म्हणजे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद शुक्रवारी दिवसभर वाळूज पोलिस ठाण्यात होते. त्यांनी उद्योजकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना फिर्याद देण्यास सांगितले.
सीआयडी चौकशीची मागणी
दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी वाळूजमध्ये कंपन्यांवर झालेला हल्ला व तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा काहीही संबंध नाही. या घटनेची सरकारने सीआयडी चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे.
GIPHY App Key not set. Please check settings