‘कचराबाद’ अशी ओळख मिळवलेल्या आपल्या शहराला पुन्हा औरंगाबाद बनवण्यासाठी आता वेंगुर्ला पॅटर्न राबवला जाणार आहे. शहरातील कचऱ्याची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वेंगुर्ला नगर परिषदेत मुख्याधिकारी आणि वेंगुर्ला पॅटर्न यशस्वीरित्या राबवणारे रामदास कोकारे यांना अतिरक्त प्रभार देण्यात आला आहे. औरंगाबादेत तातडीने काम सुरू करण्यासाठी कोकारे औरंगाबादेत दाखल झाले असून त्यांनी सोमवारी अगदी सकाळपासूनच कामाला सुरुवातही केली आहे.
वेंगुर्ला शहराला काही वर्षांपूर्वी कचऱ्याच्या समस्येने वेढले होते. पण त्यानंतर त्याठिकाणी रामदास कोकारे हे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले आणि त्यांनी शहरातचा कायापालटच करून टाकला. त्यांनी प्रशासन आणि लोकसहभागातून कचरा व्यवस्थापनाचा आदर्श असा वेंगुर्ला पॅटर्न तयार केला. देशभरात या पॅटर्नचे कौतुक झाले. रामदास कोकारे यांनी राबवलेला हा पॅटर्न अनेक शहरांमध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासाठी वापरण्यात आला.
समस्या कचराकोंडीची नसून मानसिकतेची आहे. कचरा या विषयाकडे बघण्याची पध्दत बदलली पाहिजे.– रामदास कोकारे
औरंगाबादचा अतिरिक्त प्रभार
रामदास कोकारे हे वेंगुर्ला येथे मुख्याधिकारी म्हणून नियुक्त आहेत. औरंगाबादच्या कचरा समस्येवर काहीही तोडगा निघत नसल्याने रामदास कोकारे यांना या प्रश्नात लक्ष घालण्यात सांगण्यात आले. त्यांच्याकडे या कामासाठी विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ते तीन दिवस औरंगाबादेत कचराप्रश्न सोजडवण्यासाठी आणि तीन दिवस वेंगुर्ला येथे त्यांची मुख्याधिकारी पदाची जबाबदारी पार पाडतील.
काय आहे वेंगुर्ला पॅटर्न
वेंगुर्ला येथील कचऱ्याची समस्या पाहून त्याठिकाणी रुजू झाल्यानंतर रामदास कोकारे यांनी त्यावर तोडगा काढण्याचे ठरवले. कचऱ्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन करून त्यातून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी एक कार्यक्रम आखला. त्यानुसार कचरा गोळा करताना त्याचे चार भागांत वर्गीकरण केले जाते. ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक आणि धातू किंवा काच अशा चार भागांत वर्गीकरण केले जाते. त्यापैकी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून मिथेन वायूची निर्मिती करून त्यापासून वीज उत्पादन केले जाते. प्लास्टीकचा चुरा भुसा तयार करून त्यापासून काही ठिकाणी रस्ते तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला. त्याशिवाय सुक्या कचऱ्यातून माती,राख वेगळी करून त्याचा खत तयार करण्यासाठी वापर केला जातो. यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या पॅटर्नच्या माध्यमातून वेंगुर्ल्याची कचऱ्याची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यात आली.
GIPHY App Key not set. Please check settings